Dr apj abdul kalam information in marathi
ए. पी. जे. अब्दुल कलाम हे भारताचे अकरावे राष्ट्रपती आहेत. ते भारताला लाभलेले सर्वस्वी वेगळ्या प्रकारचे, एकमेवाद्वितीय असे वैज्ञानिक आहेत. अत्यंत गुंतागुंतीचे तंत्रज्ञान भारतात विकसित करण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते. 'टेक्नॉलॉजी इन्फर्मेशन फोरकास्टिंग अँड अॅसेसमेंट कौन्सिल ' या संस्थेचे अध्यक्ष या नात्याने भारतातल्या अनेक आधुनिक तांत्रिक प्रकल्पांना त्यांनी मार्गदर्शन केले आणि भारताला २१ व्या शतकात घेऊन जाण्यासाठी आवश्यक अशा मोहिमा त्यांनी आखल्या.
dr-apj-abdul-kalam-information-in-marathi |
'इस्त्रो' आणि 'डि. आर. डी. ओ. ' या महत्वाच्या वैज्ञानिक संस्थांमध्ये डॉ. कलाम यांनी उच्चपदे भूषविली आहेत. काही व्यक्तिमत्त्वेच लोकोत्तर असतात. ए. पी. जे. अब्दुल कलाम हे असेच एक व्यक्तिमत्त्व होय. १५ ऑक्टोबर १९३१ रोजी मद्रास राज्यातील रामेश्वरम् या छोट्या बेटासारख्या गावात अब्दुल कलाम यांचा जन्म झाला. त्यांच्या वडिलांचे नांव जैनलबदीन. हेमध्यमवर्गीय तमिळ नावाडी होते. ते व आई आशियम्मा यांच्याजवळ उदार, विशाल दृष्टीकोण होता. दोघेही सदैव दुसऱ्यांना मदत करण्यात तत्पर असत.
त्यांचे संस्कार घेऊनच कलाम लहानाचे मोठे झाले. वडिलांचा लाकडी नौका बांधायचा व्यवसाय होता. प्राथमिक शिक्षण गावात झाल्यावर पढील शिक्षणासाठी कलाम रामनाथपुरम्ला आले. त्यानंतर कॉलेज शिक्षणासाठी तिरुचिरापल्ली येथील सेंट जोसेफ कॉलेजमध्ये त्यांनी प्रवेश घेतला. येथेच त्यांना इंग्लिश साहित्याची गोडी लागली. टॉलस्टॉय, हार्डी, स्कॉट अशा जगप्रसिद्ध लेखकांचे साहित्य त्यांनी वाचून काढले. बी. एस्. सी. नंतर 'मद्रास इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी ' मध्ये इंजिनिअरिंग शाखेसाठी प्रवेश घेतला.
येथील शिक्षण संपल्यावर ते हिंदुस्थान एरोनॉटिक्स लिमिटेड' या संस्थेत प्रशिक्षणार्थी म्हणून आले. तेथे विमानांची देखभाल करण्याच्या कामात त्यांनी प्राविण्य मिळवले. एरोनॉटिकल अभियंता बनून त्यांनी आपल्या आकाशात विहार करण्याच्या स्वप्नाला प्रत्यक्षात आणले. शिक्षण संपल्यावर ते संरक्षण खात्याच्या विशेष विभागात काम करू लागले. ( १९५८ ) येथे त्यांनी 'नंदी' नावाचे हॉवरक्राफ्ट बनवले.
त्यानंतरच्या काळात त्यांनी भारतीय अवकाश संशोधन संस्थेत काम करायला सुरुवात केली. १९६२ मध्ये धुंबा या केरळमधील गावी अवकाशतळ उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. तेथे काम करीत असतानाच कलाम यांना 'नासा' या अमेरिकेतील संस्थेत अवकाशयान उड्डाणाच्या तंत्रज्ञानाच्या अभ्यासासाठी पाठविण्यात आले. हे शिक्षण पूर्ण करून कलाम परतले, आणि नोव्हेंबर १९६३ मध्ये नाइके अपाची ' हे धुंबा येथे जुळणी केलेले पहिले अंतराळयान अवकाशात सोडण्यात आले व ते यशस्वीरीत्या कार्य करू लागले.
यानंतर 'रोहिणी साऊडिंग रॉकेट ' हे पृथ्वीजवळच्या वातावरणाचा अभ्यास करणारे यान पाठवण्यात आले. या दोन्ही ठिकाणी कलाम यांच्या देखरेखीखाली काम करण्यात आले. अशा त-हेने अवकाश संशोधनाच्या क्षेत्रात झपाट्याने विकास चालू झाला. धुंबा येथे कलाम यांनी विविध स्तरांवर काम केले व यश मिळवले. उदा. रॉकेटस् तयार करणे, त्यांची क्षमता तपासणे, रॉकेटस्च्या उड्डाणासाठी सहाय्यक ठरणारी यंत्रे बनवणे वगैरे.
यापुढच्या काळात लहान धावपट्टीवर विमाने उडविण्याचे तंत्रज्ञान विकसित करण्याचा प्रकल्प ( राटो) कलाम यांच्यावर सोपवण्यात आला. यापुढची पायरी म्हणजे भारताच्या संरक्षणखात्याने स्वतंत्रपणे क्षेपणास्त्रे बनवण्याचे ठरविले. हा प्रकल्पही कलाम यांच्या ग्रुपने १६ महिन्यात पूर्णत्वाला नेला. स्वदेशी बनावटीचा उपग्रह तयार करून अवकाशांत सोडायचा, ही पुढली पायरी होती. त्यासाठी श्रीहरीकोटा हे मद्रासजवळचे बेट ठरविण्यात आले.
१९६८ मध्ये इंडियन स्पेस रीसर्च ऑर्गनायझेशन ( इस्त्रो) ही संस्था अवकाश संशोधनाची धुरा वाहू लागली. इस्त्रोचा प्रमुख म्हणून अब्दुल कलाम यांची निवड झाली. 'राटो' सिस्टिम १९७२ मध्ये बरेली येथे हवाई दलाच्या केंद्रावर प्रत्यक्षात वापरली गेली आणि परकीय चलन वाचवल्याबद्दल कलाम यांचेवर अभिनंदनाचा वर्षाव झाला. विक्रम साराभाई स्पेस सेंटरवर एस्. एल्. व्ही ३ च्या कामाला वेग आला आणि हा ही प्रकल्प सुसूत्रपणे पार पाडण्यासाठी कलाम यांच्या हाती सोपविण्यात आला. या प्रकल्पातील अनेक यंत्रणा देशी माल वापरून व स्वदेशी तंत्रज्ञान वापरून बनविण्यात आल्या.
१८ जुलै १९८० ला श्रीहरीकोटाच्या अवकाश तळावरुन रोहिणी उपग्रह यशस्वीपणे सोडण्यात आला आणि उपग्रह अवतरणाची व्यवस्था असलेल्या काही मोजक्या देशांच्या पंगतीत भारताने स्थान मिळवले. देशाच्या इतिहासात नव्या पर्वाची सुरवात झाली. यातून पुढे 'अग्नी' ची निर्मिती झाली. 'इस्त्रो'मध्ये १८ वर्षे काम केल्यानंतर कलाम यांनी डी. आर. डी. एल्. ची जबाबदारी घेतली.
१९८१ साली त्यांना 'पद्मभूषण ' या पदवीने सन्मानित करण्यात आले. १९९० मध्ये ‘पद्मविभूषण' ही पदवी देण्यात आली. त्यानंतर १९९७ मध्ये 'भारतरत्न' या सर्वोच्च पदवीने त्यांचा सन्मान केला गेला. देशातील ३० विद्यापीठांकडून 'डॉक्टरेट ' मिळवलेले ते एकमेव गृहस्थ आहेत. १९८२ मध्ये अब्दुल कलाम ‘संरक्षण संशोधन आणि विकास ' संस्थेमध्ये काम करू लागले. आपल्याला दुसऱ्या देशांनी जे तंत्रज्ञान देण्याचे नाकारले, ते तंत्रज्ञान शून्यातून विकसित करण्याचे महत्वाचे काम या ठिकाणी करण्यात आले.
नोव्हेंबर १९९९ मध्ये भारत सरकारचा ‘प्रधान तंत्र सल्लागार ' म्हणून त्यांनी कार्यभार स्वीकारला. सामाजिक गरजा भागवण्यासाठी तंत्रज्ञानाचा विकास करणे आणि राष्ट्रासमोर एका नव्या दृष्टिकोनाची उभारणी करणे असे कार्य कलाम यांनी या काळात केले. 'अग्नि', 'आकाश', 'नाग', 'पृथ्वी ', ' त्रिशूल ' या क्षेपणास्त्रांचे अब्दुल कलाम हे सर्वेसर्वा आहेत.
तरुणांना प्रोत्साहित करण्यासाठी 'अग्निपंख ' हे आत्मचरित्र प्रज्वलित भने', 'इंडिया २०२० - ए व्हिजन फॉर मिलेनियम ' अशी पुस्तके त्यांनी लिहिली आहेत. यायोगे भारत हा एक विकसनशील देश न राहता त्याचे रूपांतर एका विकसित देशात व्हावे हा त्यांचा प्रयत्न आहे. २५ जुलै २००२ ' पासून ते राष्ट्रपती झाले. आपल्या देशातील नागरिकांकडे ताकद आहे आणि त्या ताकदीला कठोर परिश्रमांची जोड देऊन आपल्या सोनेरी युगाची स्वप्ने साकार करता यायला हवीत.
राजकारणाला छेद देऊन नव्या पिढीला प्रगतीचा मार्ग दाखविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. त्यासाठी देशवासियांच्या आत्मविश्वासाला आणि अंतस्थ प्रेरणेला ते साद घालतात. अनेक शाळांना भेटी देऊन त्यांनी हजारो मुलांबरोबर संवाद साधला आहे. मुलांच्या मनात विज्ञानाबद्दल प्रेम, आस्था निर्माण केली आहे. यायोगे भारताला एक विकसित देश म्हणून जगापुढे आणण्याची मोहिम त्यांनी आखलेली आहे. त्यांच्या स्वप्नाची पूर्ती व्हावी म्हणून आपल्या लाख लाख शुभेच्छा !!
डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा कार्यकाल २४ जुलै २००७ रोजी संपला.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत