dr sarvepalli radhakrishnan information in marathi
भारतीय संस्कृती, वैदिक हिंदू धर्म, भारतीय तत्त्वज्ञान यांचा परिचय जगाला करून देण्याचे फार मोठे कार्य डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन् यांनी केले आहे. डॉ. राधाकृष्णन हे आधुनिक जगातले एक श्रेष्ठ दर्जाचे विचारवंत होते, तत्त्वज्ञ होते. परकीय इंग्रजी सत्तेने राजकीय स्वातंत्र्य तर हिरावून घेतलेच होते परंतु इतरही क्षेत्रात भारताची पिछेहाट चालू होती. अशावेळी भारतीय तत्त्वज्ञान कसे श्रेष्ठ आहे, हे डॉ. राधाकृष्णन यांनी जगाला पटवून दिले. शुद्ध चारित्र्य, विशाल बुद्धिमत्ता, सर्व धर्माच्या विचारांबद्दल सहिष्णुता आणि जगभर फिरून आपल्या प्रभावी वाणीने जगाला घडविलेले भारताचे खरेखुरे दर्शन यामुळे त्यांना श्रेष्ठ ऋषिमनींप्रमाणे मान दिला जातो.
dr-sarvepalli-radhakrishnan-information-in-marathi |
ते जसे थोर तत्त्वज्ञ होते तसे उत्कृष्ट शिक्षणतज्ज्ञही होते. अविरत ज्ञानोपासना व कुशाग्र बुद्धिमत्ता यामुळे डॉ. राधाकृष्णन हे चालताबोलता ज्ञानकोशच होते. म्हणूनच आपण त्यांचा जन्म दिवस · शिक्षकदिन ' म्हणून साजरा करतो. या दिवशी गुरुजनांचा सत्कार करुन आपण या ज्ञानयोग्याला, तेजाचा वारसा सांगणाऱ्या महान पुरुषाला आदरांजली वाहतो.
डॉ. राधाकृष्णन यांचा जन्म ५ सप्टेंबर १८८८ रोजी तिरुपतीजवळ असणाऱ्या तिरुतानी या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी झाला. त्यांच्या घरचे वळण कट्टर वैष्णवपंथी, श्रद्धाळू, होते. त्यांचे वडील वीरस्वामी आणि आई सीताम्मा, दोघेही धार्मिक श्रद्धाळू, सत्त्वशील होते. घरच्या धार्मिक संस्कारांचा ठसा डॉ. राधाकृष्णन यांच्या विचारसरणीवर पडलेला दिसतो. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तिरुपती येथे झाले. पंधराव्या वर्षी ते मॅटिक झाले. त्यांना अध्यात्माची गोडी होती व वाचनाची खूप आवड होती. आपला सर्व वेळ ते ग्रंथांच्या सहवासात घालवीत असत. त्यांनी उच्च शिक्षण वेल्लोर व मद्रास येथे घेतले.
अवघ्या विसाव्या वर्षी त्यांचा वेदांतातील नीतिशास्त्र' हा ग्रंथ प्रसिद्ध झाला. राधाकृष्णन एम्. ए. झाले आणि उत्कृष्ट अध्यापक म्हणून प्रसिद्धीस आले. मद्रासच्या प्रेसिडेन्सी कॉलेजने त्यांना तत्त्वज्ञानाचे प्राध्यापक नेमले. १९२१ मध्ये मैसूर विद्यापीठाने त्यांना तत्त्वज्ञान विषयाचे प्रमुख नेमले. मैसूर विद्यापीठात असताना त्यांनी हिंदू धर्माचे श्रेष्ठत्त्व सांगणारे ग्रंथ इंग्रजी भाषेत लिहिले. या ग्रंथांनी त्यांना भारताबाहेरच्या जगात प्रसिद्धी दिली. १९२६ मध्ये ऑक्सफर्ड येथे व्याख्याते म्हणून त्यांना बोलावण्यात आले.
१९२६ साली इंग्लंडमध्ये आंतरराष्ट्रीय तत्त्वज्ञान परिषद भरली. तेथे कलकत्ता विद्यापीठाने डॉ. राधाकृष्णन यांना आपले प्रतिनिधी म्हणून पाठविले. त्यांनी ही परिषद आपल्या ओजस्वी व वक्तृत्त्वपूर्ण भाषणांनी गाजविली. उंच शरीरयष्टी, स्वच्छ तलम धोतर, बंद पद्धतीचा पांढरा शुभ्र फेटा, सोनेरी फ्रेमचा चष्मा अशी डॉ. राधाकृष्णन यांची तेजस्वी मूर्ती ओघवत्या इंग्रजी भाषेत धर्माबद्दल विवेचन करू लागली की श्रोते दंग होऊन जात. इंग्लंडच्या विद्यापीठातील त्यांची हिंदूंचा जीवनाकडे पाहण्याचा दृष्टीकोण ' ही व्याख्यानमाला फार गाजली. पुढे ती पुस्तकरूपाने प्रसिद्ध झाली. परदेशातील लोकांना त्यांनी हिंदूधर्म आणि तत्त्वज्ञानाचे श्रेष्ठत्त्व प्रभावीपणे पटवून दिले.
ब्रिटीश सरकारने त्यांना 'सर' हा किताब देऊन त्यांचा गौरव केला. परमेश्वर आपल्या हृदयात आहे, त्यासाठी आपण अंतर्मख बनले पाहिजे, असे ते सांगत. आंध्र विद्यापीठाने त्यांना डी. लिट. ही मानाची पदवी दिली व त्यांचा गौरव केला. त्याचप्रमाणे ब्रुसेल्स, झेकोस्लोव्हाकिया या विद्यापीठांनीही त्यांना डॉक्टरेटची पदवी दिली.
१९३१ मध्ये डॉ. राधाकृष्णन आंध्र युनिव्हर्सिटीचे उपकुलगुरु म्हणून निवडले गेले. तेथे त्यांनी आंध्र युनिव्हर्सिटीची खूपच भरभराट केली आणि तिचा शैक्षणिक दर्जा वाढवला. डॉ. राधाकृष्णन कलकत्ता, आंध्र व बनारस या विद्यापीठांचे उपकुलगुरु होते. भारत सरकारने नेमलेल्या 'युनिव्हर्सिटी कमिशन ' चे ते अध्यक्ष होते. नवीन पिढीला मानवता व प्रेम यांचे संस्कार देणारे शिक्षण व उत्तम शिक्षक पाहिजेत त्याकरिता शिक्षण आयोग स्थापन झाले पाहिजेत, असे त्यांचे मत होते.
'पूर्व आणि पश्चिम', 'धर्म, स्वातंत्र्य आणि संस्कृती', हिंदुस्थानचे अंत:करण' ( भारतीय धर्म व संस्कृतीवरची व्याख्याने ) असे त्यांचे अनेक ग्रंथ प्रसिद्ध आहेत. प्रो. मूरहेड यांच्याबरोबर 'आधुनिक भारतीय तत्त्वज्ञान' हा ग्रंथ त्यांनी संपादित केला आहे. १९३६ मध्ये ऑक्सफर्ड येथे ‘पौर्वात्य धर्म आणि नीति ' या विषयाकरीता त्यांना प्रोफेसर म्हणून नेमण्यात आले. तिथल्या मुक्कामात विशेष परिश्रमपूर्वक अभ्यास करून “ पौर्वात्य धर्म आणि पाश्चिमात्य विचार" हा अभ्यासपूर्ण ग्रंथ तयार केला. १९३६ ते १९३९ या काळात त्यांनी 'म. गांधी गौरवग्रंथ ' तयार केला. भगवद् गीतेवरही त्यांनी अभ्यासपूर्ण ग्रंथ लिहिला आहे. १९३९ मध्ये ते बनारस हिंदू विद्यापीठाचे मानद कुलगुरू झाले. येथे त्यांनी विद्यापीठाच्या प्रगतीसाठी अपार कष्ट घेतले. १९४२ मध्ये स्वातंत्र्यचळवळीचा
आंदोलनाचा महत्त्वाचा काळ होता. त्यावेळी राधाकृष्णन यांनी विद्यापीठ बंद ठेवले. पुढे हे विद्यापीठ त्यांनी अतिशय भरभराटीस आणले.
१९४६ मध्ये देशात काळजीवाहू सरकार स्थापन झाले होते. त्यावेळी नेहरूंनी डॉ. राधाकृष्णन यांना युनेस्कोच्या पहिल्या परिषदेकरिता 'भारताचे प्रतिनिधी ' म्हणून पाठवले होते. १९४७ ला भारत स्वतंत्र झाल्यावर विद्यापीठ शिक्षण आयोगाची स्थापना झाली ती, त्यांच्याच अध्यक्षतेखाली. १९४९ मध्ये पंडित नेहरू यांनी डॉ. राधाकृष्णन यांची नेमणूक मॉस्कोमध्ये राजदूत म्हणून केली. तेथेही त्यांनी राजदूत म्हणून आपली स्वतंत्र शैली निर्माण
केली, भारत व रशिया यांच्यातील मैत्री व सहकाराचा पाया घातला. १९५२ मध्ये त्यांची उपराष्ट्रपती म्हणून नेमणूक झाली.
अनेक परदेश दौरे करून त्यांनी साऱ्या जगाला हिंदूधर्म व तत्त्वज्ञान यांचे श्रेष्ठत्त्व पटवून दिले. पुरातन वैदिक धर्माची तत्त्वे आधुनिक जगात उपयुक्त ठरतील, त्यांचा स्वीकार सर्वांनी केला पाहिजे असे त्यांनी सगळ्यांना शिकवले. त्यांच्या शिकवणुकीला जगभर मान्यता मिळाली. साऱ्या जगभर फिरून त्यांनी जगात भारताची शान वाढवली. त्यांचे सारे कार्य लक्षात घेऊन सरकारने १९५८ मध्ये त्यांना 'भारतरत्न' हा सर्वोच्च किताब दिला. १९५६ मध्ये त्यांच्या पत्नी शिवकामम्मा मृत्यु पावल्या. हे दुःख त्यांनी धीराने सहन केले. १९५७ मध्ये ते दुसऱ्यांदा उपराष्ट्रपती झाले.
१९६२ ला ते भारताचे राष्ट्रपती बनले. सरकारच्या हालचाली, विरोधी पक्षांची टीका या साऱ्यांची ते माहिती करून घेत असत. त्यांच्या राहणीत भपका वा दिखाऊपणा नव्हता. राष्ट्रपती झाल्यावरही त्यांची राहणी अगदी साधी होती. लोकसभेच्या सभासदाना ते भेटत असत. पंडित नेहरू त्यांच्याशी सल्लामसलत करीत असत. अशा त-हेने त्यांच्या कारकीर्दीत राष्ट्रपतीपदाला वेगळेच महत्त्व प्राप्त झाले. आपल्या कारकीर्दीत त्यांनी अनेक राष्ट्रांना भेटी देऊन जगात भारताला प्रतिष्ठा मिळवून दिली आणि अनेक मित्र मिळवून दिले.
भारत चीन युद्धानंतर पंडित नेहरू व डॉ. राधाकृष्णन यांच्यातील संबंधांना तडा गेला. १९६४ साली पंडित नेहरूंचा मृत्यु झाला. त्यानंतर गुलजारीलाल नंदा यांना हंगामी पंतप्रधान म्हणून शपथ देवविली. १९६५ मध्ये भारत-पाक युद्ध सुरु झाले. या युद्धातील विजयानंतर मात्र त्यांना खरा आनंद झाला. परंतु लालबहादूर शास्त्रींचे अचानक निधन झाले.
१९६६ - ६७ च्या सुमारास इंदिरा गांधी यांच्या नेतृत्त्वाखाली काँग्रेसमध्ये राष्ट्रपतीपदावर दुसरी व्यक्ती असावी, असा मतप्रवाह चालू झाला. तेव्हा १९६७ मध्ये डॉ. राधाकृष्णन निवृत्त झाले. त्यानंतर ते मद्रासला आपल्या ‘गिरीजा ' या निवासस्थानी राहू लागले. १९६८ मध्ये भारतीय विद्याभवनने त्यांना 'ब्रह्मविद्याभास्कर' अशी पदवी दिली. ते आपल्या घरी सतत पुस्तकातच रमले. पुढे प्रकृती ताप देऊ लागली आणि १७ एप्रिल १९७५ रोजी एका ऋषीतुल्य आयुष्याची समाप्ती झाली.
डॉ. राधाकृष्णन यांना हृदयविकाराचा झटका आला अन् त्यातच त्यांचे निधन झाले. सौजन्य, साधेपणा व शालीनता तसेच विद्वत्ता लाभलेल्या या श्रेष्ठ तत्त्वचिंतकाचा आत्मा अमरत्त्वात विलीन याला डॉ. राधाकृष्णन स्वत: मोठे शिक्षक असल्याने त्यांचा जन्मदिन आपण शिक्षक दिन ' म्हणून पाळतो, गुरुजनांचा आदर करतो. त्यांचे कार्य त्यांच्या ग्रंथांच्या स्वरुपात चिरस्थायी झाले आहे. त्यांनी भारतीय संस्कृतीच्या अमर मूल्ल्यांची सतत महती गायली आहे. एक थोर तत्त्वज्ञ, विचारवंत, शिक्षणतज्ज्ञ, मुत्सद्दी आपल्यातून निघून गेला असला तरी आधुनिक भारतातील या ज्ञानयोगी ऋषीची प्रतिमा आपल्या अंत:करणावर सतत कोरलेली राहील. त्यांचे चिरंतन स्वरूपाचे ग्रंथ आपल्याला सतत ज्ञानदान करीत राहतील.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत