indira gandhi information in marathi | इंदिरा गांधी माहिती
जन्म : 19 नोव्हेंबर 1917,इलाहाबाद (उत्तर प्रदेश)
मृत्यु :31 ऑक्टोबर 1984
वडिल :पंडित जवाहरलाल नेहरू
indira-gandhi-information-in-marathi |
INFORMATION 1
श्रीमती इंदिरा गांधी या पहिल्या स्त्री पंतप्रधान होत. भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या त्या कन्या ! आई कमला नेहरू यांची आर्त व्याकुळता व पित्याची तेजस्वी भव्यता यांचा संगम त्यांच्या ठायी झालेला आपल्याला आढळतो. देशाचा घडत असलेला इतिहास ती स्वत:च्या घरात पहात होती आणि पहाता पहाता तिनेही इतिहास घडविला. भारताची स्त्री पंतप्रधान म्हणून आपली कारकीर्द तिने जागतिक पातळीवर गाजवली.
इंदिराजींचा जन्म १९ नोव्हेंबर १९१७ ला अलाहाबाद येथे झाला. त्यांचे सुरवातीचे शिक्षण शांतिनिकेतन व नंतरचे स्वित्झर्लंडमध्ये झाले. आईच्या निधनानंतर १८ वर्षांची इंदिरा शिक्षणासाठी युरोपातच राहिली. पुढील शिक्षण ब्रिस्टॉल, ऑक्सफर्ड येथे झाले. परंतु मुख्यतः त्यांच्यावर संस्कार झाले ते घरात चालणाऱ्या राजकीय चर्चांचे ! १९१९ साली भरलेल्या काँग्रेस अधिवेशनाचेवेळी अध्यक्ष मोतीलाल नेहरू ( इंदिरेचे आजोबा ) यांनी जालियनवाला बाग अत्याचारांविरुद्ध आवाज उठविला.
त्यांनी व वडील जवाहरलाल यांनी वकिली सोडली, ऐष आरामाचे आयुष्य सोडले व साधे जीवन जगू लागले. आजोबांजवळ बसून इंदिरा काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीतल्या गोष्टी ऐकत असे. 'इंदिरेस पत्रे' मधून जवाहरलालांनी तिला सांगितले होते की देशाची सेवा करण्याची घराण्याची परंपरा तिने पुढे चालू ठेवायची आहे. जवाहरलाल कोणालाही भेटायला गेले की इंदिरेला बरोबर घेऊन जात असत. इंदिराजींना स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्याची इच्छा होती, पण लहान वयामुळे त्यांना काँग्रेसमध्ये प्रवेश मिळाला नाही. तेव्हा त्यांनी लहानमुलांची वानरसेना' स्थापन केली होती. यातूनच त्यांची देशसेवेची उर्मी दिसून
येते
इंदिरा गांधींचे पिताजी जवाहरलाल यांचा एक पाय सतत तुरुंगात असे. त्यांच्याचप्रमाणे इंदिरेनेही अनेकदा तुरुंगवास भोगला. १९४२ मध्ये इंदिराजींचा विवाह फिरोझ गांधी यांच्याशी झाला. १९४४ मध्ये राजीव व १९४७ मध्ये संजीव या दोन मुलांना जन्म दिला. परंतु तरीही इंदिराजी स्वातंत्र्य लढ्याशी जवळून संबंध ठेवून होत्या. १४ ऑगस्ट १९४७ ला मध्यरात्री भारताला स्वातंत्र्य मिळाले, तेव्हा ८ महिन्यांच्या संजयला घरी ठेवून इंदिराजी संसद भवनात हजर होत्या. देशाची फाळणी झाली, त्यानंतर झालेल्या दंगलीत निर्वासित झालेल्या लोकांमध्ये त्यांनी काम केले. १९४९ मध्ये त्यांनी वडिलांबरोबर पहिला परदेश दौरा केला तो अमेरिकेला. भारतातील दौऱ्यांमध्येही इंदिराजी पित्याबरोबर जात असत, आदिवासींमध्ये मिसळत असत, खेड्यातील प्रश्न समजावून घेत असत.
२४ जानेवारी १९६६ ला इंदिराजी भारताच्या पंतप्रधान झाल्या. अत्यंत कठीण, संघर्षमय पर्वात त्यांना पंतप्रधानपद मिळाले होते. १९६७, १९७१, १९७७ व १९८० या चार निवडणुकांमध्ये त्या यशस्वी ठरल्या. अन्नधान्य, विज्ञान, तंत्रज्ञान, लष्करी आघाडी या महत्वाच्या बाबतीत भारताचा कणा ताठ करण्याचे कार्य त्यांनी आपल्या पंतप्रधानकीच्या कारकीर्दीत केले. भारताला स्वयंपूर्ण बनवण्याचे स्वप्न साकार केले. पंतप्रधान झाल्यावर त्यांनी घेतलेला महत्वाचा निर्णय म्हणजे बँकांचे राष्ट्रीयीकरण केले.
याचे देशभरात स्वागत झाले. याशिवाय पंजाबचे पंजाबी भाषिक व हिंदी भाषिक असे विभाजन केले. त्यामुळे हरीयाणाचा जन्म झाला. यावेळी पंतप्रधानांच्या समोर रुपयाचे अवमूल्यन, सतत दुसऱ्या वर्षी पडलेला दुष्काळ, वाढती महागाई, भाषेच्या प्रश्नांवरुन दंगली, गोहत्या बंदी आंदोलनामुळे हिंदू मतदार चिडलेले, अशा अनेक समस्या होत्या. त्यातच पं. बंगालमध्ये नक्षलवादी कारवाया सुरु होत्या. यातून हळूहळू पंतप्रधान व काँग्रेसमधील ज्येष्ठ नेते यांच्यातील संघर्ष वाढत होता. १९६९ ला काँग्रेसपक्षात फूट पडली. फेब्रुवारी १९७१ ला मुदतपूर्व निवडणुका घेण्यात आल्या. त्यात इंदिरा गांधी विजयी झाल्या.
याच काळात पूर्व बंगालचा लढा झाला. पूर्व बंगाल पाकिस्तानात होता. पण पाकिस्तान त्याच्या न्याय्य हक्कांना वाव देत नव्हता. जनरल याह्याखान पूर्व बंगालमधील जनतेला चिरडून टाकण्याच्या प्रयत्नात होते. पूर्व बंगालचे स्वतंत्र राष्ट्र असावे यासाठी शेख मुजीबुर रहमान यांच्या नेतृत्वाखाली प्रखर आंदोलन चालू होते. २५ मार्च १९७१ ला याह्याखानच्या लष्कराने बंगालमधील जनतेवर हल्ला चढविला. बंगबंधू मुजीबूर यांना तुरुंगात टाकले. मुक्ति वाहिनी व पाक सैन्य यांच्यात संघर्ष सुरु झाला.
अमानुष छळाला कंटाळून लाखो निर्वासित भारतात दाखल झाले. इंदिराजींनी जगभर दौरे करून बांगला देशाची स्वातंत्र्याबाबतची भूमिका प्रमुख राष्ट्रांना पटवून दिली. याचवेळी ३ डिसेंबर १९७१ ला पाकने भारतावर दगाबाजीने हवाई आक्रमण केले. परंतु भारताने कराची बंदरात घुसून पाकला नामोहरम केले. भारतीय सैन्याने गनिमीकाव्याने पूर्व पाकिस्तानातही प्रवेश केला आणि घनघोर युद्ध करुन पाकिस्तानला भुईसपाट केले. पाक जनरल नियाझी १६ डिसेंबर १९७१ ला शरण आले आणि बांगला देश स्वतंत्र झाल्याची घोषणा इंदिराजींनी लोकसभेत दिली.
एकाकीपणे लढून इंदिराजींनी पाकिस्तानच्या संकटाचा मुकाबला केला. यामुळे त्यांची प्रतिमा सोन्यासारखी झळाळून निघाली. दुष्टांचा संहार करणाऱ्या 'दुर्गा' देवीशी इंदिरेची तुलाना होऊ लागली. त्यांना 'भारतरत्न' ही पदवी देण्यात आली. भारत पाक युद्ध संपले परंतु प. पाकिस्तानात अत्यंत असंतोष खदखदत होता. त्यामुळे भारत पाक यांच्यात शांतता नांदणे कठीण होते. १९७२ मध्ये पाकचे अध्यक्ष झल्फिकार अली भुत्तो व पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्यात सिमला येथे शिखर परिषद भरली. “भारत व पाकिस्तान यापुढे एकमेकांविरुद्ध लष्कराचा वापर न करता परस्परातील वाटाघाटींनी प्रश्न सोडवतील '' हे कलम भारताच्या दृष्टीने महत्त्वाचे होते. या सिमला कराराचे सर्वत्र स्वागत झाले.
एक दूरदृष्टी असलेली मुत्सद्दी नेता म्हणून इंदिराजींची प्रतिमा लखलखली. १९७३ मध्ये पावसाने पुन: दगा दिला. तेलाच्या किंमती भरमसाठ वाढल्या. भारतात चलनवाढीने उच्चांक गाठला. कारखाने बंद पडू लागले. या विरुद्ध योजलेल्या कडक उपायांमुळे अनेक मंडळी पंतप्रधानांना विरोध करु लागली. गुजरातेत आंदोलनाने हिंसक वळण घेतल्याने तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली. जॉर्ज फर्नांडिस यांनी रेल्वे संप सुरु
केला. संप मोडून काढण्यासाठी सरकारने निर्दयतेचा कळस गाठला.
देशाच्या बहुतेक भागात असंतोष वाढू लागला व बेशिस्तीचे वातावरण धुमसू लागले. त्यातच १९७१ च्या निवडणुकीत इंदिराजी एक लाख मते अधिक मिळवून निवडून आल्या होत्या. त्या निवडणुकीत अनुचित प्रकार केल्याबद्दल इंदिरा गांधी यांच्यावर खटला भरण्यात आला होता. त्याचा निकाल इंदिराजींच्या विरुद्ध लागला आणि १९७५ मध्ये आणीबाणी लागू करण्यात आली. जयप्रकाश, मोरारजी देसाई यांना अटक करण्यात आली. भारतात पूर्ण सेन्सॉरशिप लागू करण्यात आली.
हजारएक लोकांना अटक करण्यात आली. वृत्तपत्रे, सेन्सॉरशिप, जातीय संघटनांवर बंदी असे हुकूम काढले जाऊ लागले. देशात भीतीचे वातावरण पसरले आणि संतापाचे, प्रक्षोभाचेही उद्रेक होऊ लागले. सक्तीच्या नसबंदीचा अतिरेक झाला. अत्याचारांच्या घटना वाढू लागल्या आणि जनतेत कमालीचा असंतोष निर्माण झाला. अखेर १९७७ मध्ये अटक केलेल्या विरोधी पक्ष नेत्यांना सोडून देण्यात आले आणि निवडणुका जाहीर करण्यात आल्या. या निवडणुकीत इंदिरा गांधी व अनेक काँग्रेस नेते पराभूत झाले. जनता पक्षाची स्थापना झाली आणि मोरारजी देसाई यांची पंतप्रधान म्हणून निवड झाली.
जनता सरकारने इंदिराजींना अटक केली आणि त्यांच्यावर अनेक आरोप ठेवले. पण इंदिराजी डगमगल्या नाहीत. १९७८ च्या निवडणुकांसाठी प्रचारदौरा करुन त्या सगळ्यांना भेटल्या आणि निवडणुकीत चिकमंगळूरमधून प्रचंड बहुमताने निवडून आल्या. दरम्यानच्या काळात जनता पक्षात मोरारजी व चरणसिंग यांच्यातील मतभेद विकोपाला जाऊन जनता पक्ष फुटला.
१९८० च्या निवडणुकांमध्ये ५२४ पैकी ३५१ जागा इंदिराजींच्या पक्षाला मिळाल्या आणि त्या परत भारताच्या पंतप्रधान झाल्या. १९८० ते १९८४ ही आंतरराष्ट्रीय कामगिरीच्यादृष्टीने महत्त्वाची वर्षे होती. इंग्लंड, अमेरिका, रशिया यांच्या राष्ट्रप्रमुखांना त्या भेटल्या व भारताची भूमिका त्यांच्यापुढे मांडली. याचकाळात नव्या स्वरुपाच्या आर्थिकबाबींना प्राधान्य देणारा वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला.
आसाममधील परकीय घुसखोरीविषयी तोडगा काढण्यासाठी त्या आंदोलकांशी बोलल्या. अकाली दलाच्या आंदोलनासंदर्भात त्यांच्या नेत्यांशी चर्चा केली. याच काळात त्यांचा पत्र संजय याचे विमान अपघातात निधन झाले. त्यांच्यावरही प्राणघातक हल्ले करण्यात आले पण त्यांनी धैर्याने आपली वाटचाल चालूच ठेवली.
१९८३ मध्ये अलिप्तराष्ट्र शिखर परिषदेत अध्यक्ष झाल्या.
राष्ट्रकुल प्रमुखांची परिषद आयोजित केली आणि आंतरराष्ट्रीय शांततेचा जाहीरनामा तयार केला. भारताची एक सामर्थ्यवान प्रतिमा तयार केली. विकासाच्या मार्गावर अधिकाधिक स्वयंपूर्ण होण्याची जिद्द इंदिराजींनी बाळगली आणि देशाला प्रगतीपथावर नेले.
ऑपरेशन ब्लू स्टार हे त्यांच्या आयुष्यातील धैर्याची कसोटी पहाणारे प्रकरण होते. १९८१ पासून पंजाबमध्ये ' खलिस्तान'ची मागणी करणाऱ्या अतिरेकी शिखांनी हत्याकांड चालू केले होते. सुवर्ण मंदिरात पाक बनावटीची शस्त्रे सापडली. म्हणजेच हे राज्य फोडण्याचा पाकिस्तानचा डाव होता. देशाच्या एकात्मतेचा भंग होऊ नये म्हणून सुवर्ण मंदिरात इंदिराजींना लष्कर धाडणे भाग पडले. येथे त्यांच्या धैर्यशील व्यक्तिमत्त्वाचा आगळा आविष्कार दिसून आला. या निर्णयाविरुद्ध गदारोळ उठला. इंदिराजींना जीवे मारण्याच्या धमक्या येऊ लागल्या. परंतु न घाबरता इंदिराजी म्हणाल्या, “ मला दूर करण्याचे प्रयत्न होत आहेत.
परंत रक्ताचा शेवटचा थेंब असेपर्यंत मी या देशाची एकात्मता व अखंडता राखण्याची शिकस्त करीन. माझ्या सांडलेल्या रक्ताच्या प्रत्येक थेंबातून राष्ट्र वाढेल आणि हा देश शक्तिमान होईल." ३१ ऑक्टोबर १९८४ रोजी त्यांचे शरीररक्षक बिआंतसिंग व सतवंतसिंग यांनीच त्यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या केली. एका अभूतपूर्व पर्वाचा अस्त झाला.
जवळजवळ दोन दशके इंदिराजी भारतीय राजकारणाच्या केंद्रबिंदू होत्या. त्यांचे विविधरंगी व्यक्तिमत्त्व, विविध पैलूंनी घडलेले त्यांचे जीवन हा सगळाच एक रोमहर्षक कालखंड आहे. देशाची एकात्मता अखंड ठेवण्याच्या धडपडीत त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आर्यभट्ट उपग्रह, अंटार्क्टिका मोहीम, मे ७४ मध्ये पोखरण येथे केलेला अणुस्फोट, राकेश शर्माला रशियन अंतराळवीरांबरोबर अंतराळात जाण्याची संधी अशा अनेक महत्त्वपूर्ण गोष्टी इंदिराजींच्या कालखंडातच घडल्या आहेत. भारताच्या इतिहासातील हा एक तेजस्वी कालखंड होता. इंदिराजींची स्मृती कोट्यावधी भारतीयांच्या मनात कायम टिकून राहतील, यात शंका नाही.
INFORMATION 2
इंदिरा गांधी माहिती : १९ नोव्हेंबर १९१७ साली या वास्तूने एका नवजात बालिकेचे स्वागत केले. जवाहर - कमला यांच्या संसारवेलीवर उमललेलं. बहरलेलं पहिलंवहिलं पुष्प. त्या सुंदर प्रियदर्शिनी बालिकेचं नाव ठेवलं 'इंदिरा'.
इंदिरेला सौंदर्याचा वारसा तिच्या आजीकडून (स्वरूपराणीकडून) मिळाला होता. तसेच तिने पणजीप्रमाणे (इंदिराराणी) धाडसी, सामर्थ्यशाली बनावे अशी सर्वांना अपेक्षा होती. म्हणूनच की काय तिचे नामकरण 'इंदिरा' असे झाले.
इंदिरा आजीआजोबांची खूप लाडकी. एकुलती एक असल्यामुळे तिच्यावर लाडाचा, कौतुकाचा वर्षाव व्हायचा. पण कधीकधी मात्र कमालीची उपेक्षा वाट्याला यायची. खोडकर इंदू दिवसभर मनसोक्त हुंदडायची. आजोबा, वडील कामात असले तरी त्यांच्या खोलीत घुसायची. कळो वा न कळो त्यांची चर्चा, खलबतं ऐकायची. ती अवखळ, अल्लड असली तरी एक मात्र खरं. आपल्याला मोठ्या गोष्टीचं रक्षण करायचं आहे, ऋण फेडायचं आहे असं त्या बालजीवाला वाटायचं.
ती जेमतेम दोन वर्षांची असेल तेव्हा व्यक्तिस्वातंत्र्यावर घाला घालणारा 'रौलट कायदा' अस्तित्वात आला. या जुलमी कायद्याविरुद्ध देशभर निदर्शने झाली. १३ एप्रिल रोजी जालियनवाला बाग येथील हत्याकांड घडलं. ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध जनमत पेटून उठलं. असहकाराची चळवळ पुकारली.
गेली. मोतीलाल व जवाहरलाल यांना अटक झाली. इंदिरा चार वर्षाची असतानाची गोष्ट. ७ डिसेंबर १९२१ रोजी मोतीलाल, जवाहरलाल यांना अटक झाली होती. दंडाची रक्कम भरली नाही म्हणून ८ डिसेंबरला पोलिसांनी आनंदभवन वर धाड घातली. दोघी आत्या, आई असहाय होऊन निमूटपणे उभ्या होत्या. पण इंदिरेत कोणतं बळ संचारलं कोणास ठाऊक तिने 'वस्तू नेऊ देणार नाही' म्हणून पोलिसांना ठणकावलं. घरातल्या वातावरणाचा तिच्या संस्कारक्षम मनावर प्रभाव पडला. देशभक्तीचं बीज अंकुरलं. स्वदेशाभिमान जागृत झाला. ५ - ६ वर्षांची असताना तिने 'बाल चरखा संघ' स्थापन केला. ती स्वतः रोज चरख्यावर सूत कातायची. इंदिरा जशी मोठी होऊ लागली तसा तिच्यात एक अनपेक्षित बदल झाला. ती एकांतप्रिय झाली. एकाकीपणाची ओढ तिला वाटायला लागली. वृक्षांचा सहवास मात्र तिला फार आवडायचा. ती चपळाईने झाडावर चढे, ” झुडपात लपून बसे. नोकर लोक तिला धुंडून हैराण होत. झाडावर बसून परीकथा, साहसकथा, गूढकथा वाचताना ती देहभान विसरे. पक्षी, फुलपाखरं, मुंग्या, खारी यांचं निरीक्षण करण्याचा तिला भारी छंद. तिचं विरंगुळ्याचं स्थान म्हणजे तिची खोली. तिथे ती बाहुल्यांशी खेळे.
१९२४ मध्ये इंदिरा बाळाची 'दीदी' झाली. आता तिला एक सजीव खेळणं मिळालं. पण आठवडाभरातच काळाने बाळाचा ग्रास घेतला. कमलाला अतिशय दुःख झालं. इंदिरेच्या कोवळ्या मनावर आघात झाला. निष्ठुर दैवाला तिला भ्रातृसुख लाभू द्यायचं नव्हतं.
कमला साधी, सुस्वभावी होती. सासू, नणंदा तिला घालूनपाडून बोलत. ती ते मुकाट्याने सोसी. मग इंदिरा आईची बाजू घेऊन सर्वांशी भांडायची. पण त्याचा काही उपयोग होत नाही हे पाहून ती अबोल झाली. वरवर शांत वाटणारी इंदिरा आतल्या आत धुमसत राही. पण कोणालाच तिच्या भावना समजून घेण्याची गरज वाटली नाही.
दुर्दैवाने कमलाला क्षयरोग जडला. औषधोपचार होऊनही प्रकृतीस म्हणावा तसा आराम पडेना. तेव्हा तिला स्वित्झर्लंडला न्यायचं ठरलं. जवाहर, कमला, इंदिरा हे छोटं कुटुंब जिनेव्हाला रवाना झालं.
इंदिरेने लकोल इंटरनॅशनल मध्ये प्रवेश घेतला. कालांतराने कमलाला मॉन्टाना येथील सॅनिटोरियममध्ये दाखल केल्यामुळे तिला पुन्हा शाळा बदलावी लागली. लेकोला नूवेल शाळेत तिने नाव दाखल केले. आता ती वसतिगृहात राहू लागली. कमलाच्या प्रकृतीला उतार पडल्यावर हे त्रिकूट मायदेशी परतलं. एव्हाना इंदिरेत खूप बदल झाला होता. ती हट्टी, चौकस, धीट बनली होती. ती वाद घालायची. प्रश्न विचारुन अक्षरशः भंडावून सोडायची. तिच्या प्रश्नांची समाधानकारक उत्तरं देणं कठीण होतं, नव्हे अशक्यच होतं. _आपल्या मुलीने परीकथा वाचाव्या हे नेहरूंना पसंत नव्हतं. पण इंदिरेला त्या खूप आवडत. तिने त्यातून एक मार्ग काढला. स्नानगृहात किंवा डोक्यावर ब्लँकेट घेऊन परीकथा वाचण्याची भूक ती भागवीत असे. - अलाहाबादला आल्यावर 'कॉन्व्हेंट ऑफ जीझस अँड मेरी' मध्ये तिचं नाव टाकण्यात आलं. नेहरू प्रियदर्शिनी कन्येस पत्र पाठवीत. विशाल विश्वाची उत्पत्ती, त्याचं गूढ उकलून दाखविण्याचा प्रयत्न करीत. पृथ्वी, निसर्ग, स्थित्यंतरं याची माहिती देत. ही अनमोल पत्रे पुढे 'लेटर्स ऑफ अ फादर टु अ डॉटर' या नावाने प्रसिद्ध झाली.
१९२९ हे प्रचंड राजकीय घडामोडींचे वर्ष होते. जवाहरलाल यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी निवड झाली. पूर्ण स्वराज्यासंबंधीच्या मुख्य ठरावाचा मसुदा त्यांनी तयार केला. २६ जानेवारी १९३० रोजी सर्व देशभर स्वातंत्र्याची शपथ देण्यात आली. मीठाच्या सत्याग्रहा प्रतिसाद मिळाला. म. गांधी, जवाहरलाल व इतर काँग्रेसनेत्यांना अटक झाली. - महिला वर्गही पुढे सरसावला. यावेळेस कमलाने दाखविलेलं संघटन कौशल्य वाखणण्याजोगं होतं. या धकाधकीच्या काळात फिरोझ गांधी या पारशी तरुणाची कमलाला खूप साथ मिळाली. 'आनंदभवना'चं रूपांतर 'स्वराज्यभवना' त झालं. लाठीमारात जखमी झालेल्यांवर उपचार करायला. त्यांची सेवाशुश्रूषा करायला एक १२ वर्षाची मुलगी स्वराज्यभवनात रात्रंदिवस झटत होती. तिचं नाव होतं, 'इंदिरा जवाहर नेहरू'
स्वातंत्र्य आंदोलनात सहभागी होण्यास इंदिरा उत्सुक होती. परंतु वयाने लहान म्हणून तिच्या सदस्यत्वाचा अर्ज फेटाळला गेला. इंदिरेनं दुधाची तहान ताकावर भागवली. तिने ५ ते १८ वयोगटातील मुलांची 'वानरसेना' स्थापन केली. स्वयंपाक करणे, जखमींवर उपचार करणे, भूमिगतांना शुभसंदेश पोचविणे ही कामे ते बिनबोभाट पार पाडीत. १९३१ च्या प्रारंभी कमलालाही अटक झाली. इंदिरेला आता एकटं राहावं लागणार होतं
६ फेब्रुवारी १९३१ या दुर्दिनी नेहरू घराण्याचा आधारवड उन्मळून पडला. मोतीलाल यांनी जगाचा निरोप घेतला. आजवर इंदिरेला इतकं असुरक्षित, निराधार, एकाकी कधी वाटलं नाही.
संकटे एकटी येत नाहीत. कमलाच्या आजारपणाने पुन्हा उचल खाल्ली. जवाहरलाल यांचे एक पाऊल तुरुंगात तर एक पाऊल बाहेर होते. इंदिरेला पुण्याच्या 'पीपल्स ओन स्कूल' मध्ये पाठवायचं ठरलं. आजोबांच्या वियोगाचं दुःख, आईची काळजी, आत्या (विजयालक्ष्मी)चं कुत्सितपणाचं बोलणं (तिला कुरूप, मूर्ख म्हणून हिणवणं) यामुळे प्रसन्न, खेळकर इंदिरा अबोल, घुमी झाली. आत्मविश्वास हरवून बसली.
इंदिरेचं वाचन दांडगं होतं. त्यामुळे तिची विचारसरणी स्वतंत्र होती. ती अतिशय मानी स्वभावाची होती. नेहरू घराण्याचा तापटपणा वारसाहक्काने तिच्याकडे आला होता. तिच्या स्वभावात विसंगती जाणवे. कधी ती लाजरी, घुमी वाटे, तर कधी आक्रमक, धाडसी नि हट्टी. आपलं सर्वांनी कौतुक करावं ही तिची अपेक्षा असे. म. गांधी येरवडा तुरुंगात असताना ती त्यांची अनेकदा भेट घेई. आपल्या अडचणी, प्रश्न त्यांच्यासमोर मांडी. त्यांच्याशी वाद घालायलाही ती मागेपुढे पाहत नसे.
हळूहळू तिच्या स्वभावात मोकळेपणा आला. तिनं कुढणं सोडलं. 'चिल्ड्रेन्स सोसायटी' स्थापना केली. सचिवपदाचा भार तिने स्वतः सांभाळला.मोतीलाल यांच्या मृत्यूनंतर नेहरू कुटुंबात कोणी कमावतं राहिलं नव्हतं. वडील देशकार्याच्या व्यापात गुंतलेले. पैशाची चणचण भासू लागली. इंदिरा काटकसरीने राह लागली. मायेच्या, प्रेमाच्या आधाराशिवाय ती स्वतःच्या बळावर मोठी होत होती.
३१ ऑगस्ट १९३३ ला जवाहरलाल तुरूंगातून सुटले नि राजकीय कार्यात गुरफटले. आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यायला कुणालाच सवड नाही हे शल्य कमलाला डाचत होतं. आईच्या या मानसिक अवस्थेची, अस्वस्थतेची सर्वात जास्त झळ कोणाला पोचली असेल तर ती इंदिरेला. बिहारला भूकंपाचा धक्का बसला. तेथील मदतकार्यानंतर कमला अथरुणाला खिळली. तेव्हा डेहराडूनच्या तुरूंगातील एकांत जवाहरलालना खायला उठला होता, इंदिरा पुण्यात एकाकी आयुष्य कंठीत होती तर एकटी पडलेली, उपेक्षित कमला असाध्य व्याधीशी झुंज देत होती.
इंदिरा विवाहयोग्य झाली हे पाहून स्वरूपराणीने तिच्यासाठी अनुरूप स्थळं सुचवायला सुरुवात केली. पण इंदिरा लग्नाला तयार नव्हती. १९३१ साली फिरोझ गांधी तिला प्रथम भेटला. नेहरूंची ही प्रियदर्शिनी कन्या प्रथमदर्शनीच त्याला आवडली. तिच्याशी लग्न करण्याचा मानस त्याने पत्राद्वारे व्यक्त केला. त्यावर “आपण सर्वजण स्वातंत्र्याच्या लढ्यात गुंतलो असता कोणाच्याही मनात लग्नाचा विचार येणं शक्य नाही" असं कळवून इंदिरेनं तो विषय टाळला.
रवींद्रनाथ टागोरांच्या 'शांतिनिकेतन' ने उत्तमोत्तम शिक्षक व विद्यार्थी यांना मोहून टाकले होते. इंदिराही त्यापैकी एक होती. तेथील जीवन साधंसुधं, काटकसरीचं होतं. विद्यार्थी स्वतः सर्व कामे करीत. अनवाणी चालावं लागे. इंदिरा त्या जीवनाला सामोरी गेली. मुलींच्या मध्ये राहण्याची तिला सवय झाली. घरातील तणावापासून, राजकीय कोलाहलापासून दूर अशा निवांत, शांत ठिकाणी राहण्याचा हा तिच्या आयुष्यातील, पहिला (आणि कदाचित अखेरचाच) अनुभव होता. तिथे राहून तिने हिंदी, बंगाली, फ्रेंच, जर्मन इत्यादी भाषांचा अभ्यास करायचं ठरवलं. तिने कलाभवनात नांव दाखल केलं. चित्रकला, नृत्य व रंगभूमीचं आकर्षण तिला वाटू लागलं.
कलेची जाण आली. निसर्गाशी सुसंवाद साधला गेला. रवींद्रनाथाच्या व्यक्तिमत्त्वाने ती भारावून गेली होती.
नेहरूंच्या गैरहजेरीत घरचे लोक कमलाकडे दुर्लक्ष करीत, घर माणसांनी भरलं होतं पण माणुसकीचा अभाव होता. इंदिरा व्यथित झाली. न राहवून तिने पित्याजवळ अंतरीचं शल्य प्रगट केलं. शेवटी कमलाला हिमालयातील भोवाली या रमणीय पर्यटनस्थळी हलवायचं ठरलं. तिथे तिची तब्येत सुधरेल अशी वेडी आशा पितापुत्रीच्या मनात पालवली. जवाहरलाल यांची भोवालीजवळच्या अल्मोडा तुरूंगात खानगी झाली. तीन आठवड्यातून एकदा पत्नीला भेटायची परवानगी मिळाली.
कमलाला वैद्यकीय उपचारांसाठी युरोपला न्यायचं ठरलं. इंदिरेच्या शिक्षणाची हेळसांड होत होती पण इलाज नव्हता. बेक्स येथील शाळेत तिचं मन रमेना. गायन, नृत्य, फिरायला जाणे यात ती वेळ घालवू लागली.
२८ फेब्रुवारी १९३६ हा इंदिरेच्या जीवनातील काळाकुट्ट दिवस म्हणावा लागेल. त्या दिवशी कमलाचं जीवनपुष्प कायमचं मिटलं. तिचा अंत्यसंस्कार आटोपून जवाहरलाल भारतात परतले. इंदिरेने ब्रिस्टॉल येथील बॅडमिंटन स्कूलमध्ये प्रवेश घेतला. कामाच्या व्यग्रतेमुळे जवाहरलाल तिला फारसा वेळ देऊ शकत नव्हते. हक्काचं असं संवादाचं एक दार तिच्यासाठी बंद झालं.
पण दुसरं एक दार तिची आतुरतेनं प्रतीक्षा करत होतं. फिरोझ गांधी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स मध्ये दाखल झाला. तो दिलदार. लोकात मिसळणारा होता. त्याने इंदिरेला अभिजात संगीताची गोडी लावली. तिच्यातील आत्मविश्वास जागविला.
११ जानेवारी रोजी इंदिरेच्या आजीचं निधन झालं. इंदिरेच्या आयुष्यातला तो काळ अतिशय खडतर होता. ती कृश, रोगट, निराश झाली होती. मृत्यूच्या भीतीने तिच्या मनात थैमान घातले होते. जवाहरलाल यांना तिच्या अवस्थेचा अंदाज येत नव्हता. या परिस्थितीचा, मनःस्थितीचा सामना कसा केला ते तिचे तिलाच ठाऊक.
ते काही असो, ताणतणावाचं आयुष्य जगण्याचा तिला उबग आला होता. लग्न, नवरा, मुलंबाळं, घरसंसार अशा दिवास्वप्नात ती रमू लागली. २७ एप्रिल १९४१ रोजी तिने पित्याची तुरुंगात भेट घेतली आणि फिरोझशी विवाह करायचा मनोदय व्यक्त केला. नेहरूंना मात्र तिचं हे वागणं अपरिपक्वतेचं, अविचारीपणाचं वाटत होतं. इंदिरेनं शिक्षण संपवून प्रवास करावा, रशियाला जावं, परदेशी भाषा शिकाव्या आणि आपल्या कार्यात मदत करावी हे नेहरूंचं लाडकं स्वप्न होतं.
फिरोझच्या कुटुंबियांबद्दल नेहरूंना काहीच माहिती नव्हती. त्यांना मुलीच्या भवितव्याची चिंता वाटत होती. झोपडीलाही 'आनंदभवन' मानायची तिची तयारी होती. जवाहरलालनी नाइलाजाने का होईना विवाहास अनुमती दिली.
१६ मार्च १९४२ रामनवमीच्या मुहूर्तावर इंदिरा व फिरोझ विवाहबद्ध झाले. संस्कृत मंत्रांच्या घोषात, अग्नीच्या साक्षीने सप्तपदी झाली. नवदांपत्यावर गुलाब - पाकळ्यांचा वर्षाव झाला. अत्यंत साधेपणाने विवाह साजरा झाला.
लग्नानंतर दोघंही भाड्याच्या घरकुलात राहू लागले. इंदिरेनं हे छोटंसं घरही काटकसरीनं, आत्मीयतेनं सजविलं. त्यातील फर्निचर फिरोझनं स्वतः बनविलं होतं हे विशेष.
१९४२ मध्ये 'चले जाव' ची चळवळ सुरू झाली. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या अधिवेशनात 'छोडो भारत' अशी मागणी करणारा ठराव मांडला गेला व मंजूरही झाला. सारा देश पेटून उठला. सत्याग्रह, निदर्शने, संप, मोडतोड, नासधूस यांनी देशभर खळबळ माजली. काँग्रेस सदस्यांना अटक झाली. इंदिरेला नैनी तुरुंगात डांबण्यात आले. प्रकृति अस्वास्थ्यामुळे १५ मे ला तिची सुटका करावी लागली.
इंदिरेने हौशीने मांडलेला संसार गुंडाळला. ती आनंदभवनात राहण्यास गेली. २० ऑगस्ट १९४४ रोजी तिला मातृत्वप्राप्ती झाली. 'राजीवरत्न' चा जन्म झाला.
जवाहरलाल हंगामी पंतप्रधान असताना त्यांना इंदिरेच्या मदतीची नितांत गरज होती. राजीवला घेऊन ती दिल्लीला १७ यॉर्क रोड येथे राहावयास गेली. देशोदेशीचे बडेबडे लोक नेहरूंना भेटावयास येत. त्यांची बडदास्त ठेवण्याचे काम अर्थातच इंदिरेकडे होते.
बातमीदारीत व शोध घेण्यात परिश्रम घेणारा फिरोझ हुशार होता. वृत्तपत्रसृष्टीत वरच्या पदाला पोहोचण्याची पात्रता त्याच्या अंगी होती. 'नॅशनल हेरल्ड' या दैनिकाची सूत्रं त्याच्या हाती होती. त्यासाठी तो लखनौला राहत होता. डिसेंबर अखेर इंदिरेनी दुसऱ्या अपत्याला जन्म दिला. नेहरूंनी या नातवाचं नाव ठेवलं 'संजय'.
१५ ऑगस्ट १९४७. भारताच्या इतिहासाचं सोनेरी पान उघडलं. स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पं. नेहरू यांच्या हस्ते राष्ट्रध्वज फडकला. त्या रोमहर्षक क्षणासाठी कित्येकांनी संसाराची राखरांगोळी केली होती. जीवनाची होळी केली होती. ____ आणि 'उषःकाल होता होता काळरात्र झाली.' म. गांधींची हत्या झाल्याची भीषण वार्ता वाऱ्यासारखी सर्व देशभर पसरली. संपूर्ण देश शोकसागरात बुडून गेला. नेहरूंचा मार्गदर्शक हरपला. इंदिरेचा भरभक्कम आधारस्तंभ कोसळला होता. ___ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर जवाहरलाल नेहरू (इंदिरा व दोन नातवंडांसह) तीनमूर्ती भवनात राहावयास गेले. १९५२ मध्ये फिरोझ रायबरेलीहून लोकसभेवर निवडून आला. खेळकर, प्रसन्न व्यक्तिमत्त्वाचा फिरोझ राजीव, संजय यांना हवाहवासा वाटे. इंदिरा व फिरोझ यांच्यातील संबंधात वितुष्ट आल्यामुळे त्रिमूर्तिभवनात न राहता खासदाराला मिळणारं घर त्यानं घेतलं. जि १९५७ सालच्या निवडणुकीच्या वेळी अलाहाबाद मतदारसंघात हिरीरीने प्रचार करण्याचं काम इंदिरेनं केलं. परदेश दौऱ्यात ती नेहरूंच्या बरोबर असे. त्यातूनच तिला राजकारणाचे धडे मिळू लागले.
सुरुवातीला शांत, सौम्य वाटणारा फिरोझ लौकरच एक प्रभावी खासदार म्हणून प्रसिद्धीस आला. पं. नेहरूंच्या निकटवर्ती व्यक्तींवर त्याने घणाघाती हल्ला चढविला. नेहरू एकाकी पडले. इंदिरा व फिरोझ यांच्यातील दरी वाढत चालली. इंदिरेने मनातील खळबळ उघडपणे प्रगट केली नाही. स्वतःला पक्षकार्यात अधिकाधिक गुंतवून घेतलं.
१९५८ च्या सप्टेंबरमध्ये फिरोझला हृदय विकाराचा झटका आला. इंदिरेनी त्याची उत्तम प्रकारे काळजी घेतली. त्यामुळे मनातील कटुता कमी झाली परंतु दिल्लीत परतल्यावर 'जैसे थे' अवस्था झाली. ____२ फेब्रुवारी १९५९ या दिवशी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदी इंदिरेची बिनविरोध निवड झाली. अकरा महिन्यांच्या कारकीर्दीत तिच्या जबरदस्त कार्यशक्तीचा प्रत्यय आला. तिला भ्रष्टाचाराविरुद्ध लढा द्यायचा होता. गरिबी हटवायची होती.
फिरोझला हृदयविकाराचा दुसरा झटका आला. तो अंतिम ठरला. फिरोझने कमलाची शुश्रूषा केली होती. इंदिरेला अडचणीच्या प्रसंगी साथ दिली होती. त्यामुळे इंदिरेच्या मनात त्याच्याबद्दल कृतज्ञतेची भावना होती. काळाने दोघांना एकमेकांपासून कायमचं दूर केलं. इंदिरेचं सौभाग्य सरलं. राजीव, संजय यांचं पितृछत्र हरवलं. काळ या रामबाण औषधाने दुःखाची तीव्रता कमी झाली. इंदिरा वियोगदुःखाच्या कोशातून बाहेर पडली. फिरोझचा विषय तिने मनाच्या खोल खोल कप्प्यात ठेवून कडीकुलपात जणू बंद करून टाकला.
चिनी आक्रमणाच्या काळात तेजपूरमध्ये झालेल्या गोंधळामुळे वृत्तपत्रांनी नेहरूंवर टीकास्त्र सोडलं. प्रशंसकच विरोधक बनले. अवमान असह्य होऊन त्यांची प्रकृती ढासळली. आणि अचानकच एक स्थित्यंतर घडलं, घडवून आणलं गेलं. नेहरूंच्या समस्त विरोधकांना सत्ताक्षेत्रापासून दूर करण्यात आलं. दुबळ्या नेत्यांकडे राज्यसरकारांचं प्रमुखपद आलं. ही राजकीय खेळी इंदिरेची होती. __नेहरूंचा आजार वाढतच होता. त्यांना पक्षाघाताचा झटका आला. लालबहादूर शास्त्री व टी. टी. कृष्णमाचारी यांना पंतप्रधानांचं काम पाहण्याचा सल्ला मिळाला. २७ मे रोजी दुपारी १-४० वाजता नेहरूंची प्राणज्योत मालवली. 'नेहरूनंतर कोण?' ह्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. 'लालबहादूर शास्त्री.' इंदिरेकडे माहिती व नभोवाणी खातं आलं. तेव्हा राजीव, संजय इंग्लंडला शिकत होते. इंदिरा अधिकच एकाकी झाली. तिने स्वतःला लोककार्यात गुंतवून घेतलं.
१० जानेवारी १९६६, श्री. लालबहाददूर शास्त्री व अयूबखान यांच्यात ताश्कंद करार झाला. त्याच मध्यरात्री शास्त्रीजींवर मृत्यूने झडप घातली. देशकार्य करता करता भारतमातेचा एक मोहरा कामी आला. भारतीयांच्या शोकाला पारावार राहिला नाही. पुन्हा तेच प्रश्नचिन्ह, तोच यक्षप्रश्न ! 'शास्त्रीजींनंतर कोण' ?
भारत - पाक युद्धानंतर अनेक भीषण समस्यांनी आ वासला होता. सर्वदूर दुष्काळाची काळी छाया पसरली होती, महागाईचा भस्मासुर उन्मत्त झाला होता. पंतप्रधानकीची धुरा सांभाळणं एक मोटं आव्हान होतं. ते एका महिलेनं निर्भयपणे स्वीकारलं, समर्थपणे पेललं नि जगाला आश्चर्यचकित करून टाकलं. ती स्त्री दुसरी तिसरी कोणी नसून नेहरूंची प्रियदर्शिनी कन्या होती. नेहरूंनी उराशी बाळगलेलं स्वप्न अखेर सत्यसृष्टीत अवतरलं. २४ जाने. १९६६ च्या मुहूर्तावर इंदिराजींनी पंतप्रधानपदाची शपथ घेतली.
प्रारंभी 'फारसं प्रशासकीय कौशल्य नसलेली महिला पंतप्रधान' अशी इंदिराजींची प्रतिमा जनमानसात होती. पण ती फार काळ टिकली नाही. त्यांनी मोठ्या हुशारीने परिस्थिती हाताळली. विरोधी पक्षीयांच्या डावपेचांइतकंच स्वपक्षातील श्रेष्ठींच्या हालचालींवर बारकाईनं लक्ष ठेवलं. कोणत्याही परिस्थितीत न डगमगता तोंड द्यायचा निर्धार केला आणि त्यात त्यांना यश आलं. - इंदिराजी रोज तब्बल अठरा तास काम करीत. ऑफिसला जाण्यापूर्वी, देशभरातून येणाऱ्या लोकांना भेटण्याचा त्यांचा शिरस्ता होता. त्यांची गाहाणी, व्यथा, वेदना ऐकून आवश्यक तिथे मदतीची व्यवस्था करीत. येणाऱ्या प्रत्येक पत्राला आवर्जून उत्तर पाठवीत. प्रत्येक कार्यक्रमाची वेळ पाळण्याचा त्यांचा कटाक्ष असे. त्या भाषणाची पूर्व - तयारी करीत. आपलं व्यक्तिमत्त्व आकर्षक दिसावं याबाबतही त्या जागरूक होत्या. _ पंजाबचं विभाजन हा त्यांनी घेतलेला महत्त्वपूर्ण निर्णय. त्यामुळे पंजाबी व हिंदी भाषिक यांची वेगवेगळी राज्यं अस्तित्वात आली. हरियाणाचा जन्म झाला.
सुरुवातीला आत्मविश्वासाचा अभाव असलेल्या या 'गूंगी गुडिया' नी हळूहळू आत्मविश्वास कमावला. धडाडीनं प्रश्न हाताळायला सुरुवात केली. दुष्काळामुळे धान्याच्या समस्येनं गंभीर रूप धारण केलं होतं. त्याविरुद्ध जोरदार आघाडी उघडण्यात आली. इंदिराजींनी अन्नमंत्री श्री. सुब्रह्मण्यम् यांच्या समवेत प्रत्येक राज्याला भेट दिली. तज्ज्ञांशी चर्चा करून उपायांची आखणी नि अंमलबजावणीही झाली. इंदिराजींनी सूत्रं हाती घेतल्यापासून अवघ्या तीन वर्षात हरितक्रांती झाली. देश अन्नधान्याबाबत स्वयंपूर्ण झाला. __ रुपयाचं अवमूल्यन, दुष्काळ, पूर यासारख्या अस्मानी आपत्ती, महागाई, रेल्वे अपघात, डॉ. होमी भाभा यांचा दुर्दैवी अंत, भाषेच्या प्रश्नांवरुन दंगली, इत्यादी परिस्थितीचा काही काँग्रेसनेते गैरफायदा उठवू पाहत होते. इंदिराजींना अपशकुनी ठरवून त्यांना पदावरुन हटविण्याची कुटिल खेळी खेळत होते. मोरारजी देसाई नि इंदिराजी यांच्यातील संघर्षात तेल ओतण्याचे काम कामराजांसारखे नेते करीत होते. पण इंदिराजींना दैवाची साथ मिळाली. १९६७ च्या लोकसभा निवडणुकीत प्रचंड मतांनी विजयी होऊन त्यांनी विरोधकांना भयचकित केले. कामराजांसारखे नेते पराभूत झाल्यामुळे इंदिराजींचं पक्षातील स्थान अधिक बळकट झालं. पंतप्रधानपदाची माळ पुनश्च त्यांच्या गळ्यात पडली. ___ ‘मौनं सर्वार्थ साधनम् ।' हे वचन इंदिराजींनी तंतोतंत आचरणात आणलं होतं. आंतरराष्ट्रीय राजकीय मुत्सद्यांना त्यांचं मौन म्हणजे एक गूढ वाटायचं. खरं तर ते त्यांचं प्रभावी हत्यार होतं.
देशापुढील आर्थिक प्रश्नांची पंतप्रधानांना कल्पना असावी, अर्थ संकल्पाचं आकलन व्हावं या हेतूने इंदिराजींनी अर्थखातं स्वतःकडे घेतलं. त्यानंतर काहीच दिवसांनी बँकांचं राष्ट्रीयीकरण झालं. १९६९ साली कठोर अर्थसंकल्प सादर करणं अपरिहार्य होतं. तेही दिव्य त्यांनी केलं.
आता एक नवं संकट दत्त म्हणून उभं राहिलं. ते म्हणजे काँग्रेस पक्षातील फूट. इंदिराजींना हटविण्याचे जोरदार प्रयत्न ज्येष्ठ नेत्यांनी केले. त्यांचे प्राथमिक सदस्यत्व रद्द करण्यापर्यंत मजल गेली. काँग्रेस (आर) व काँग्रेस (ओ) अशी पक्षाची शकले झाली. पंतप्रधानपद टिकवून ठेवण्यासाठी उजवा कम्युनिस्ट, द्रमुक, अपक्ष सदस्यांचा पाठिंबा घेण्याशिवाय तरणोपाय नव्हता.
१९७० साली संस्थानिकांची मान्यता काढून घेण्याचा राष्ट्रपतींचा अध्यादेश लागू करण्यात आला. पश्चिम बंगालमधील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती फारच वाईट होती. हितशāना कारस्थानं रचायला ही नामी संधी होती. इंदिराजींनी मुदतपूर्व निवडणुका घेण्याचं जाहीर केलं. विरोधी पक्ष 'इंदिरा हटाव' म्हणत होते तर इंदिराजींचा नारा होता, 'गरिबी हटाव'. झंझावाती प्रचार दौरा झाला. इंदिराजींना दणदणीत विजय मिळाला. लोकसभेत दोन तृतीयांश बहुमतही मिळाले.
त्या सुमारास पूर्व व पश्चिम पाकिस्तानातील संघर्षाने उग्र रूप धारण केले होते. पूर्व पाकिस्तानात भीषण नरसंहार चालू होता. जीव मुठीत घेऊन निर्वासितांचे लोंढे पश्चिम बंगालमध्ये येऊ लागले. त्यांच्यासाठी छावण्या अन्नधान्य, कपडे यांचा पुरवठा करणं महत्त्वाचं होतं. इंदिराजींनी सल्लागारांसह योजना आखल्या. विरोधीपक्षियांना विश्वासात घेतलं. मदतीचा हात देण्यासाठी भारतीय जनमानस अनुकूल केलं. ___या वेळेस इंदिराजींनी आणखी एक खेळी खेळली. भारत रशिया यांच्यात शांतता - मैत्री - सहकार्य करार झाला. अमेरिकेला धक्का बसला. युरोपातील देशांच्या राष्ट्रप्रमुखांनी भारतावर निर्वासितांमुळे आर्थिक बोजा पडल्याबद्दल सहानुभूती व्यक्त केली. आर्थिक मदतही देऊ केली. पण पाकिस्तान विरुद्ध हालचाल करायची कोणाचीच तयारी नव्हती किंबहुना हिंमत नव्हती. ती एका महिला पंतप्रधानानी केली. त्यांनी पूर्व बंगालच्या मुक्तीसाठी चौफेर हल्ला चढविण्याचा गुप्त आदेश भारतीय सैन्याला दिला. पाकचे अध्यक्ष याह्याखान यांनीही भारतातील पाच लष्करी हवाईतळांवर हल्ला करण्याचा हकम हवाईदलाला दिला. ____ भारतीय फौजा पूर्व बंगालमध्ये वेगानं आगेकूच करीत होत्या. मुक्तिवाहिनीने पाकिस्तानी फौजांचं धैर्य खच्ची केलं होतं. ६ डिसेंबर १९७१ रोजी भारत बांगला देशला मान्यता देत असल्याचं जाहीर करण्यात आलं. निक्सन यांनी अमेरिकेच्या सातव्या आरमारास भारताच्या दिशेने वाटचाल करण्याचे आदेश दिले. भारताला व इंदिराजींना घाबरवून टाकण्याचा तो एक असफल, केविलवाणा प्रयत्न होता. इंदिराजी कोणाच्या हातचं बाहुलं बनणार नव्हत्या. संपूर्ण देश त्यांच्या पाठीशी होता हेही तितकेच खरे. ___आणि तो ऐतिहासिक दिवस उगवला १६ डिसेंबर १९७१. दुपारी ४३० वाजता एक आक्रीत घडलं. पाकिस्तानी फौजांनी डाक्का इथं भारताचे लेफ्टनंट जनरल जगजितसिंग अरोरा यांच्यापुढे चक्क शरणागती पत्करली बांगला देश स्वतंत्र झाला.
पाकिस्तानवर हल्ला चढवावा हा सल्लागारांचा सल्ला मात्र इंदिराजींनी डावलला. तसे केल्यास बलाढ्य राष्ट्रे युद्धात उतरतील आणि परिस्थिती अधिक चिघळेल हा सुज्ञपणाचा विचार त्यांनी केला. १७ डिसेंबरला पश्चिम आघाडीवर एकतर्फी युद्धबंदीची घोषणा त्यांनी केली.
१९७२ मध्ये सिमला येथे शिखर परिषद झाली. पाकिस्तानचे अध्यक्ष झुल्फिकार अली भुत्तो व भारताच्या पंतप्रधान यांमध्ये करार झाला. 'यापुढे दोन्ही राष्ट्रे एकमेकांविरुद्ध लष्कराचा वापर न करता परस्परातील वाटाघाटींनी प्रश्न सोडवतील' हे त्यातील महत्त्वाचे कलम.
निर्वासितांमुळे भारताच्या आर्थिक परिस्थितीवर ताण येणे स्वाभाविकच होते. महागाईचं संकट उभं ठाकलं. संजय व त्याची मारुती कंपनी यामुळेही भरपूर मनस्ताप झाला. १९७३ मध्ये गुजरातेत विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने हिंसक वळण घेतलं. तेथे राष्ट्रपती राजवट लागू करण्याशिवाय गत्यंतर
नव्हते.
१८ मे १९७४ या दिवशी भारताने पाश्चिमात्य राष्ट्रांची झोप उडवून दिली. अणुशक्ती मंडळाने पोखरण येथे अणुस्फोटाची भूमिगत यशस्वी चाचणी केली. आण्विक शक्तीचा उपयोग शांततामय कार्यासाठीच केला जाईल, असं आश्वासन त्यांनी दिलं.
समस्यांचा ससेमिरा चालूच होता. इंदिरा गांधींच्या निवडणुकीला आव्हान देणारा अर्ज राजनारायण यांनी अलाहाबाद उच्च न्यायालयात दाखल केला. खटल्याचा निकाल विरुद्ध लागला. त्यानुसार इंदिराजींना सहा वर्षांसाठी निवडणुकीस उभं राहण्यास मनाई करण्यात आली. आदेशाच्या अंमलबजावणीस वीस दिवसांची स्थगिती मिळाली. देशात अराजक माजण्याची शक्यता
ओळखून घटनेच्या ३५२ व्या कलमानुसार आणीबाणी जाहीर करावी असे ठरले. २५ जून १९७५ रोजी राष्ट्रपतींनी आणीबाणी लागू करणारा वटहुकूम काढला. अटकसत्र सुरू झाले. पूर्ण सेन्सॉरशिप लादण्यात आली. सामान्य माणूस भयभीत झाला.
१ जुलै रोजी इंदिराजींनी वीस कलमी कार्यक्रम जाहीर केला. १५ ऑगस्टला बांगला देशचे अध्यक्ष शेख मुजिबूर रहेमान व त्यांच्या कुटुंबियांची निघृण हत्त्या झाली. इंदिराजींच्या मनात शंकेची पाल चुकचुकली. यानंतर आपलाच नंबर आहे या विचाराने त्यांना घेरलं.
त्या काळात इंदिराजी संजयच्या सल्ल्यानुसार वागत होत्या. ज्योतिषांनी 'दोघंही एकत्र राहिल्यास विनाश ओढवेल' असं भविष्य वर्तविलं होतं. अत्यंत विश्वासू सहकाऱ्याला, सल्लागाराला (आणि लाडक्या मुलाला) दूर ठेवणं इंदिराजींना मुळीच मानवण्यासारखं नव्हतं. तोच आपला एकमेव आधार आहे असं त्यांना वाटत होतं. _संजय तसा होताही रुबाबदार नि आकर्षक व्यक्तिमत्त्वाचा तरुण. साहसी, खंबीर. पण बंडखोर, विध्वंसक प्रवृत्तीचा नि उद्धट. तो अपरिपक्व, उतावळा, अननुभवीही होता. त्याच्यावर नियंत्रण ठेवणं इंदिराजींना शक्य नव्हतं. __संजयने युवक काँग्रेसला सामर्थ्यवान बनवलं. त्याच्या पाच कलमी कार्यक्रमात कुटुंबनियोजन, वृक्षारोपण, हुंडाबंदी, जातपात निर्मूलन व साक्षरता यांचा अंतर्भाव होता. ___लोक संजयला घाबरत. त्याच्या अविचारीपणामुळे अत्याचाराच्या घटना वाढल्या पण सेन्सॉरशिप लादल्यामुळे वृत्तपत्रात खऱ्या बातम्या प्रसिद्ध होईनात.
आणीबाणी लादल्यामुळे 'लोकशाहीचा दीपस्तंभ' ही भारताची प्रतिमा पुसली गेली. 'परोपकारी हुकूमशहा' या शब्दात इंदिराजींची संभावना होऊ लागली. ते इंदिराजींना खटकत होतं.
आणीबाणी उठवून निवडणुका जाहीर करण्याचा निर्णय इंदिराजींनी घेतला. त्यानुसार निवडणुका जाहीर झाल्या पण आणीबाणी पूर्णतः उठली नाही. शासक व प्रजा यांच्यातील दरी कायम होती. परिणामस्वरूप इंदिरा काँग्रेसचा सपशेल पराभव झाला. २२ मार्च १९७७ या दिवशी इंदिराजींनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिला.
कायद्याचं नि फायद्याचं राज्य प्रस्थापित होईल या आशेनी भारतीय जनतेनी जनता पक्षाला कौल दिला.
इंदिराजी पंतप्रधानपदावरून पायउतार झाल्या तरी त्यांनी जनतेशी संपर्क चालू ठेवला. बिहारमधील बेलची या खेड्यात भूमिहीन हरिजनांवर हल्ला झाला. त्यांची कत्तल झाली. तेव्हा भयग्रस्त नागरिकांना दिलासा देण्यास इंदिराजी धावून गेल्या. मुसळधार पाऊस, नदीचा पूर, चिखल कशाकशाची पर्वा न करता ! त्यांचं गाहाणं त्यांनी ऐकलं, आणीबाणीत चुका झाल्याची कबुलीही दिली. त्यांना लोकांची सहानुभूती, पाठिंबा मिळतो आहे हे पाहून जनता सरकारला दुर्बुद्धी सुचली आणि एक निर्बुद्धपणाचा निर्णय त्याने घेतला.
चरणसिंगांच्या सांगण्यावरून पंतप्रधान मोरारजी देसाई यांनी इंदिराजींवर कारवाई करण्याची घोडचूक केली. सी. बी. आय. च्या अधिकाऱ्यांनी त्यांना अटक केली. त्यांच्यावरील आरोपांना पुष्टी देणारा कागदोपत्री पुरावा काहीच उपलब्ध नसल्याने न्यायाधीशांनी त्यांच्या बिनशर्त सुटकेचा आदेश दिला. जनता सरकारची विश्वासार्हता संपुष्टात आली.
इंदिराजींनी देशभर अखंड दौरे करून थेट लोकांशी संपर्क साधला. काही ठिकाणी हारतुयांनी स्वागत झाले तर काही ठिकाणी दगडधोंड्यांचा मारा झाला. कुठे जयघोष कानावर आला तर कुठं काळी निशाणं, घोषणांना सामोरं जावं लागलं.
शाह आयोगापुढे माजी मंत्र्यांनी इंदिरा गांधींच्या विरूद्ध साक्षी दिल्याने काँग्रेस पक्षात फूट पडली. ३ जानेवारी १९७८ रोजी इंदिराजी काँग्रेस (आय) च्या अध्यक्षा झाल्या. त्यांचं निवडणूक चिन्ह होतं हाताचा पंजा. ___ आणि ‘हाताच्या पंजांनी' अपयशाच्या हस्तरेखा जणू पुसून टाकल्या. चिकमंगळूर लोकसभेच्या पोटनिवडणुकीत इंदिराजी ७० हजार मताधिक्यानं विजयी झाल्या. तेव्हा चौकशी आयोगाचा लकडा मागे लागला होता. नित्य नव्या चौकशी आयोगाला सामोरं जावं लागत होतं. ८ डिसेंबरला लोकसभेत इंदिराजींनी आपली बाजू समर्थपणे मांडली. त्यावेळचं त्यांचं भाषण आक्रमक, भावनायुक्त, प्रतिष्ठेला शोभणारं होतं. आणीबाणीत जनतेला झालेल्या त्रासाबद्दल दिलगिरी व्यक्त करण्यासही त्या विसरल्या नाहीत. - सभागृहाचा हक्कभंग व गंभीर अवमान केल्याबद्दल त्यांची सदस्यत्वावरुन हकालपट्टी झाली. तसंच सदन संस्थगित होईपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली. तिहार तुरुंगात त्यांची रवानगी झाली. जनता पक्षाच्या या भूमिकेमुळे इंदिराजींबद्दल सहानुभूतीची लाट उसळली. तुरुंगवासातील वेळ आत्मनिरीक्षण, सिंहावलोकन करण्यास तसेच आत्मशक्ती एकत्रित करण्यास उपयुक्त ठरला. ___ यानंतर काही काळ इंदिराजी हेतुपुरःसर राजकारणापासून दूर राहिल्या. जनता पक्ष फोडण्याच्या दृष्टीने डावपेच आखायला संजय मदतीला होताच. विरोधी पक्षाच्या प्रत्येक सदस्याची ताकद, गुणदोष, मतभेद, कमकुवतपणा यांची त्यांना खडान खडा माहिती होती. जनता पक्षात अंतर्गत मतभेद शिगेला पोचले होते.
१५ जुलैला जनता पक्षातील काही सदस्यांनी राजीनामे दिले. पक्षाचं बहुमत नाहीसं झालं. मोरारजी देसाईंनी राजीनामा दिला. जनता सरकार कोसळलं. २७ जुलै रोजी काँग्रेस (आय) च्या पाठिंब्यावर चरणसिंग सरकार सत्तेवर आलं. देशापुढील गंभीर समस्यांचा विचार चरणसिंगांनी केला नाही. याची परिणती म्हणजे काँग्रेस (आय) ने चरणसिंग सरकारचा पाठिंबा काढून घेतला. अवघ्या तेवीस दिवसातच चरणसिंग यांचे सरकार गडगडले.
आयतीच संधी चालून आल्यावर इंदिराजींनी निवडणूक प्रचार मोहीम धडाक्यात सुरू केली. विरोधी पक्ष अंतर्गत कलहात व डावपेच आखण्यात गुंतले होते. इंदिराजीनी प्रत्येक मतदारसंघाला भेट देण्याचा कसोशीने प्रयत्न केला. यशाचं पारड त्यांच्या बाजुने झुकल. निर्विवाद बहुमत मिळालं आणि पंतप्रधानपदाची सुत्र चौथ्यांदा त्यांच्या हाती आली...
यावेळेस सल्लागार अनुभवी असले तरी मंत्रिपदासाठी निवडल्या गेलेले खासदार अननुभवी होते. विरोधी पक्षात माजलेल्या गोंधळाचा फायदा इंदिराजीना मिळाला. नऊ राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करण्यात आली.
मार्च महिन्यात एक आनंदाची घटना घडली. संजय मनेकाला पुत्रप्राप्ती झाली. इंदिराजींच्या या परमप्रिय नातवाचं नाव 'वरुण' असं ठेवण्यात आलं.
संजय आता राष्ट्रीय नेता म्हणून वावरू लागला हाता. अखिल भारतीय काँग्रेस समितीच्या सरचिटणीसपदी त्याची निवड झाली. पण देवाची नि देवाची योजना काही वेगळीच होती.
२३ जून १९८० चा दिवस उगवला तो दुर्दैवी वार्ता घेऊनच. संजयच्या विमानाला अपघात झाला. आणि सारं काही संपुष्टात आलं. संजयचा मृत्यू समस्त देशवासियांना चटका लावून गेला. गांधी कुटुंबियांचं दुःख तर शब्दातीत होतं. पुत्रवियोगाचं हलाहल त्या माऊलीनं कसं गिळलं नि पचवलं ते तिचं तिलाच माहीत. संजयच्या मृत्यूच्या धक्क्यातून सावरायला इंदिराजींना बराच कालावधी लागला.
१९८१ साली परिसमधील सॉरबन विद्यापीठाने 'डॉक्टर ऑफ लेटर्स' पदवी देऊन इंदिराजींना सन्मानित केले. त्यावेळेस त्यांनी फ्रेंचमधून भाषण दिले. जुलै (१९८२) मध्ये त्या अमेरिकेच्या दौऱ्यावर गेल्या. तेंव्हा तेथील पत्रकारांनी प्रश्नांचा भडिमार केला. इंदिराजींच्या तडफदार उत्तरांवरुन त्या महासत्तेच्या पंखाखाली राहणं मान्य करणार नाहीत हे पत्रकारांना कळून चुकलं. अमेरिकेचे अध्यक्ष रेगन व सोवियत युनियनचे पंतप्रधान ब्रेझनेव्ह ताठरपणे वागत होते. खल्या दिलाने बोलत नव्हते. इंदिराजींनी मात्र निर्भीडपणे आपली मतं प्रकट केली..
काळ दबकत दबकत पावलं टाकीत येत होता. सदैव सावध असणाऱ्या इंदिराजींना त्याच्या चोरपावलांची चाहूल लागली असावी. कोणती तरी दुष्ट शक्ती आपल्या मागे हात धुऊन लागली आहे असा भास त्यांना होऊ लागला. दुःस्वप्ने पडू लागली. मृत्यू ही नैसर्गिक प्रक्रिया, जीवनाचाच एक भाग आहे' असं मानणाऱ्या इंदिराजींना मृत्यूचं भय कधीच वाटलं नाही. आपलं अवतारकार्य संपलं असं वाटून त्यांनी निरवानिरवीची भाषा चालू केली. 'मृत्यूनंतर आपली रक्षा हिमालयात विखरून टाकावी' असं सूचित केलं. स्वतःचं मृत्युपत्र तयार केलं. 'हा देश प्रगतिपथावर नेण्याच्या हेतूपासून, प्रयत्नापासून मला परावृत्त करणारी कोठलीही ताकद नाही' असं त्यात नमूद करून ठेवलं.
७ मार्च १९८३ रोजी होणाऱ्या अलिप्ततावादी चळवळीच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झाली. स्वतःजवळ होतं नव्हतं ते सारं कसब पणाला लावून सर्व तात्त्विक मतभेदातून वाट काढून त्यांनी समाजहिताच्या व्यासपीठावर ही चळवळ उभी केली. तिच्यात नवचैतन्य निर्माण केले.
राष्ट्रकुल संघटनेतील राष्ट्रप्रमुखांच्या बैठकीचं यजमानपद त्यांनी भूषविलं त्यावेळी सदस्य राष्ट्रातील संघर्ष टळला याचं संपूर्ण श्रेय इंदिराजींनाच द्यावं लागेल.
समस्यांची मालिका घेऊनच १९८४ साल अवतरलं. महाराष्ट्रात जातीय दंगा उसळला. श्रीलंकेत गडबड उडाली, पंजाबमध्ये गोंधळ चालू होता तर काश्मीरमध्ये अस्थिरतेचं वातावरण निर्माण झालं होतं. ___ १९४७ साली झालेल्या फाळणीमुळे पश्चिम पंजाब पाकिस्तानात गेलं तर पूर्व पंजाब भारतात राहिलं. जर्नेलसिंग भिंद्रनवाले हा धर्मप्रचारक अकाली दलाला पर्यायी नेतृत्व देऊ शकेल हा ग्यानी झैलसिंग व संजय गांधी यांचा कयास सपशेल चुकला. आपण जागविलेलं पिशाच्च आपल्याच मानगुटीवर बसावं तसं झालं. _____१९८२ मध्ये भिंद्रनवालेनी आपलं मायावी रूप टाकून देऊन खरं स्वरूप प्रकट केलं. त्यानं काँग्रेसशी संबंध तोडून टाकले आणि शिखांसाठी स्वतंत्र खलिस्तानची मागणी केली. परदेशातील शिखांकडून मिळणारा पैसा व शस्त्रास्त्रे सुवर्णमंदिरात येत होती. प्रार्थना, उपासनेची जागा कटकारस्थानाने, हिंसाचाराने घेतली. भाविक भक्तांच्या आश्रयस्थानाऐवजी सुवर्णमंदिर अट्टल गुन्हेगारांचा अड्डा बनले. सांबाच्या पिंडीवर बसलेल्या विंचवाचा माज कसा उतरवायचा ? मोठा यक्षप्रश्न होता.
भिंद्रनवाले व त्याच्या अनुयायांनी सुवर्णमंदिर परिसरात ठाण मांडले. हिंदूंना राज्यातून हाकलून देण्याचा कट शिजला. ५ ऑक्टोबरला निरपराध हिंदू प्रवाशांची निर्दयपणे कत्तल करण्यात आली. स्वस्थ बसून चालणार नव्हते. शेवटी इंदिराजींनी एका धाडसी निर्णयावर शिक्कामोर्तब केले. 'ब्लू स्टार ऑपरेशन' सुरू झालं. सुवर्णमंदिरात लष्करी तुकड्या शिरल्या. त्यांच्या आवाहनाला अतिरेक्यांनी दाद दिली नाही. भिंद्रनवालेची शंभर (नव्हे सहस्त्र) पापे भरली. तो त्याच्या निकटवर्ती सहकाऱ्यांसह गोळीबारात ठार झाला.
इंदिराजींनी ऑक्टोबरमध्ये देशाच्या विविध भागांचा दौरा केला. ओरिसा येथील सार्वजनिक सभेत त्या म्हणाल्या होत्या, “अखेरच्या श्वासापर्यंत मी देशाची सेवा करीत राहीन आणि माझ्या मृत्यूनंतरही माझ्यातील रक्ताचा थेंब न थेंब भारताला संजीवनी देईल, सामर्थ्य देईल.''
३१ ऑक्टोबर. इंदिराजी नित्याप्रमाणे पहाटे उठल्या. योगासनं, स्नान, नाश्ता उरकून त्यांनी काही कागदपत्रं हातावेगळी केली. प्रिय नातवाशी (राहुलशी) गप्पा मारल्या. त्यांची मुलाखत घ्यायला आलेलं टी. व्ही. चं. पथक १, अकबर रोड इथं त्यांची प्रतीक्षा करत होतं म्हणून त्या कार्यालयाकडे जायला निघाल्या. ___ मार्गावर दुतर्फा असलेल्या झुडपांनी लवून मुजरा करताच त्यांच्याही चेहऱ्यावर प्रसन्न स्मित झळकलं. चाफ्याच्या मंद दरवळाने मन उल्हसित झालं. सुकुमार फुलांच्या पायघड्या घालून तो रोजच स्वागत करायचा. इंदिराजींनी त्याच्याकडे कौतुकाचा दृष्टिक्षेप टाकला. बहरलेला चाफा मोहरुन गेला. __ कार्यालयाच्या दरवाजाकडे जात असता सुरक्षा दलातील शीख सबइन्स्पेक्टर बिआन्तसिंग दरवाजा उघडण्यासाठी (?) सामोरा आला. तो सलाम करतो आहे असं वाटून इंदिराजींनी हात जोडून स्मित केलं. आणि डोळ्याचं पातं लवतं न लवतं तोच.....
बिआन्तसिंग आणि त्याचा साथीदार कॉन्स्टेबल सतवंतसिंग यांच्यातील सैतान जागा झाला. त्यांनी इंदिराजींवर प्राणांतिक हल्ला चढविला. ते चित्तथरारक दृश्य पाहून साक्षात कर्दनकाळही दचकला नि दोन पावलं मागे सरला. सूर्याच्या डोळ्यांसमोर काजवे चमकले, आभाळाच्या पोटात खड्डा पडला, धरणी भयकंपित झाली, दशदिशांना कापरं भरलं, वारा सैरभैर झाला.
इंदिराजींच्या हत्येची वार्ता ऐकून जग हादरलं. सर्वत्र शोककळा पसरली. शोकविव्हल जनता धाय मोकलून रडत होती, टाहो फोडत होती.
"विश्व हे अंधारले अस्तास गेला दिनमणी कोठूनि दिसणार आता इंदिरा प्रियदर्शिनी ?'.
नियतीची ही केवढी क्रूर थट्टा ! की यालाच दैवदुर्विलास म्हणायचं? राजहत्या, स्त्रीहत्येचं, नृशंस, निघृण कृत्य करून त्या नराधमांनी तरी काय मिळवलं? चिरंजीव अश्वत्थाम्याचं भारभूत जिणं? छी! छी! सहृदय मानवालाच काय दयाघन प्रभूलाही त्या क्रूरकर्त्याची दया येणार नाही. पश्चात्तापाने किंवा नरकयातना भोगूनही त्यांच्या पापाचं परिमार्जन होऊ शकणार नाही, अगदी कल्पांतापर्यंत.
हौतात्म्य पत्करलेल्या इंदिराजींचा निश्चेतन देह धरणीमातेच्या अंकावर विसावला होता. आत्मा केव्हाच मुक्त झाला होता. सुखदुःखाच्या पार गेला होता. सर्वांना दुःखाच्या खाईत लोटून.
मृत्य न म्हणे हा भूपती । मृत्य न म्हणे हा चक्रवर्ती । मृत्य न म्हणे हा करामती । कैवाड जाणे ।। हेच खरे.
चंदनाची चिता रचली गेली. तोफांची सलामी झडली. अफाट जनसमदायाच्या साक्षीने एक स्वर्गीय यान धरेवर अवतरलं. दिव्य वस्त्रालंकार परिधान केलेली 'प्रियदर्शिनी' साम्राज्ञीच्या थाटात त्यात विराजमान झाली. महाप्रस्थानापूर्वी देशाच्या कारभाराची सूत्रं राजीवच्या हातात सोपवली. परमप्रिय मायभूमीच्या मातीचा टिळा भाळी रेखला. देशवासियांचा अखेरचा निरोप घेतला. मिटलेले ओठ किंचित विलग झाले. जणू ते सांगत होते,
“अब तुम्हारे हवाले वतन साथियों "
कोणत्याही टिप्पण्या नाहीत