lal bahadur shastri information in marathi
- जन्म : २ ऑक्टोबर, इ.स. १९०४
- मृत्यु : ११ जानेवारी, इ.स. १९६६
INFORMATION 1
जय जवान ! जय किसन !! ही घोषणा साऱ्या देशात जागवून देशामध्ये चैतन्य निर्माण करणारे लालबहादूरशास्त्री हे आपले दुसरे पंतप्रधान होत. शास्त्रीजींचा जन्म २ ऑक्टोबर १९०४ या दिवशी वाराणसी येथे झाला. त्यांचे वडील प्राथमिक शिक्षक होते. शास्त्री दीड वर्षाचे असतानाच त्यांचे वडील मृत्यू पावले आणि त्यांची आई रामदुलारी त्यांना घेऊन आपल्या माहेरी राहू लागली. शास्त्रींचे प्राथमिक शिक्षण मिर्जापूर या गावी झाले. माध्यमिक शिक्षणासाठी ते वाराणसी येथे आले. तेथील हरिश्चंद्र हायस्कूल नदीच्या पैलतीराला होते.
छोटा लालबहादूर रोज नदीत पोहन शाळेत जात असे. तेथे त्यांना निष्कामेश्वर प्रसाद हे शिक्षक लाभले. त्यांनी लालबहादूरला पित्याची माया दिली आणि त्याच्या मनात देशभक्तीचे बीज रुजवण्याचे कार्य केले.
शास्त्रीजी ११ वर्षांचे असताना त्यांनी गांधीजींचे बनारस हिंदू विद्यापीठातले गाजलेले भाषण ऐकले. गांधीजींनी देशबांधवांना केलेले असहकाराचे आवाहन ऐकन शास्त्रीजींनी शिक्षण सोडले व ते आंदोलनात सहभागी झाले. स्वदेशीचा स्वीकार व विदेशीवर बहिष्कार असे ते आंदोलन होते. ते संपल्यानंतर लालबहादूरने काशी विद्यापीठाची 'शास्त्री ' ही पदवी संपादन केली.
त्यानंतर लालालजपतराय यांनी स्थापन केलेल्या 'सर्व्हटस् ऑफ द पीपल सोसायटी'चे ते सदस्य बनले. अखंड लोकसेवा करणे, सामाजिक शैक्षणिक सुधारणा घडवून आणणे हे या संस्थेचे कार्य होते. पुढच्या काळात शास्त्रीजी या संस्थेचे अध्यक्ष बनले. ही संस्था विधायक कार्यकर्त्यांची पाठशाला होती व शास्त्रीजी जन्मभर या संस्थेचे कार्य करीत राहिले.
शास्त्रीजी थोर अभ्यासकही होते. कारागृहात असताना त्यांनी कांट, हेगेल, लेनिन, रसेल, मार्क्स यांचे ग्रंथ वाचून काढले होते. १९३७ मध्ये ते विधानसभेवर निवडून आले. गांधींनी त्यांची वैयक्तिक सत्याग्रहाकरीता निवड केली होती. शास्त्रींना एकूण नऊ वर्षे कारावास घडला. ते तत्त्वाचे आग्रही, कर्तव्यकठोर असे कार्यकर्ते होते. ते तुरुंगात असताना त्यांचा मुलगा व मुलगी मंजु आजारपणात औषधाअभावी मृत्यु पावले. एवढी त्यांच्या घरची परिस्थिती हलाखीची होती.
१९३७ मध्ये शास्त्रीजी विधानसभेवर निवडून आले. त्यांच्या जीवनाला दिशा व गती देणारे गोविंद वल्लभपंत त्यांना याचवर्षी प्रथम भेटले. १९४६ पासून पुढे त्यांच्या यशस्वी पर्वाला सुरुवात झाली. १९४६ मध्ये काँग्रेस निवडणुकीत यशस्वी झाली. तेव्हा शास्त्रींची नियुक्ती पार्लमेंट सेक्रेटरी म्हणून झाली. भारत स्वतंत्र झाल्यावर शास्त्री मंत्री बनले. १९५१ मध्ये पंडित नेहरूंनी त्यांना पक्षाचे सचिव केले. १९५२ च्या निवडणुकीत पक्षबांधणी व निवडणूक यंत्रणा या गोष्टी शास्त्रींवर सोपवल्या होत्या.
१९५२ च्या निवडणुकीनंतर शास्त्रीजी रेल्वेमंत्री झाले. १९५६ मध्ये दक्षिण भारतात एक मोठा रेल्वे अपघात घडला. त्या दुर्घटनेची जबाबदारी स्वतःची मानून शास्त्रींनी मंत्रीपदाचा राजीनामा दिला. १९५७ च्या निवडणुकीनंतर शास्त्रीजी दळणवळण मंत्री झाले. १९६१ मध्ये ते गृहमंत्री झाले. . १९६३ मध्ये श्रीनगर येथील मशिदीतून हजरतबाल चोरीस गेला. त्यामुळे असंख्य मुस्लीम बांधव अस्वस्थ झाले. पण शास्त्रीजींनी अवघ्या आठ दिवसात त्याचा शोध लावून प्रचंड लोकक्षोभ टाळला. हे त्यांनी केलेले एक अलौकिकच कार्य होते. शास्त्री हे पंडित नेहरूंबरोबर त्यांचे मदतनीस, सल्लागार, मित्र म्हणून राहिले. त्यावेळी ते खातेविरहित मंत्री होते.
१९६४ च्या भुवनेश्वर काँग्रेस अधिवेशनात पंडित नेहरूंना पक्षाघाताचा झटका आला आणि या अधिवेशनात लोकशाही आणि समाजवाद ' हा अत्यंत महत्वाचा ठराव मंजूर करुन घेण्याची कामगिरी शास्त्रींनी पार पाडली. २७ मे १९६४ ला पंडित नेहरूंचे निधन झाले आणि ९ जून १९६४ ला शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान झाले.
शास्त्रींसारख्या सौम्य प्रकृतीच्या माणसाजवळ लढण्याचे बळ नसेल अशा समजुतीने पाकिस्तानी फौजा छांबजवळ भारताच्या हद्दीत घुसल्या. परंतु शास्त्रीजींनी उच्चारलेला मंत्र देशात निनादला - जय जवान ! जय किसान !! आणि भारतीय जवानांनी अतिशय कडवी झुंज दिली. अनेक विमानांचा चुराडा झाला. रणगाडे धुळीस मिळाले. पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष हादरून गेले. पाच फूट उंचीचे लालबहादूर जगाला हिमालयासारखे उत्तुंग वाटले.
'यूनो'ने युद्धबंदीचा आदेश दिला. भारत व पाक या राष्ट्रातील नेत्यांची ताश्कंद येथे बोलणी झाली. दोन्ही राष्ट्रात शांतता नांदावी अशी शास्त्रींची इच्छा होती, अयूबखानही गेले. रशियाचे पंतप्रधान कोसिजीन कराराबद्दल योग्य ती मदत करीत होते. प्रथम काहीकाळ संशयाच्या, नंतर तणावाच्या व शेवटी स्नेहाच्या वातावरणात भारत व पाकिस्तान उभय राष्ट्राच्या नेत्यांची चर्चा झाली. काही संकेत ठरले आणि १० जानेवारी १९६६ रोजी युद्धबंदीच्या शांतता करारावर दोन्ही नेत्यांच्या सह्या झाल्या. शास्त्रीजी खंबीर होते. त्यांचे कर्तृत्त्व या ठिकाणी जगाला दिसून आले.
पण... !! ११ जानेवारी १९६६ च्या रात्री शास्त्रींना हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यांचा आत्मा पंचत्त्वात विलीन झाला. ललितादेवी व रामदुलारीदेवी यांचे अश्रू पुसण्याचे सामर्थ्य कोणाच्यातच नव्हते. एक मात्र खरे की आघाडीवरचा जवान व शेतातला शेतकरी हेच भारताचे खरे भाग्य विधाते आहेत, हे शास्त्रींनी ओळखले होते व त्यांच्यामुळेच जय जवान ! जय किसान !! या घोषणेला मंत्राचे महात्म्य प्राप्त झाले.
शास्त्रीजी केवळ अठरा महिनेच पंतप्रधानपदी होते.
परंतु त्यांनी भारत पाक युद्ध अत्यंत खंबीरपणे हाताळले आणि देशाला कणखर नेतृत्त्व दिले. शास्त्रीजी धोरणाचे पक्के होते, निर्णय घेण्यात ठाम होते. पाच फुटांचे त्यांचे दर्शनी रुप आकाशाएवढ्या प्रचंड कर्तृत्त्वाचे ठरले. आपल्या देदिप्यमान कारकिर्दीने लालबहादूर शास्त्री यांनी भारताच्या इतिहासावर स्वतःचा वेगळा ठसा उमटवला.
INFORMATION 2
लाल बहादूर शास्त्री नावाचा उगवला आकाशी तेजस्वी तारा :सर्व आकाश ताऱ्यांनी व्यापून गेले आहे; परंतु त्यात लक्ष वेधून घेईल असा एकही तारा नाही. आपल्या तेजाने तळपणारे तारे अस्तंगत झाले आहेत. उरले आहेत ते केवळ चमचम करणारे काजवे. अशा उदास वातावरणात, एक तारा क्षितिजावर दिसू लागला. प्रथम कोणाचे तिकडे लक्ष गेले नाही. कोणी तिकडे पाहिलेच नाही. पण जसा तो वर येऊन प्रखर तेजाने तळपू लागला, तसे त्याने सर्वांचे लक्ष आपल्याकडे वेधून घेतले.
lal-bahadur-shastri-information-in-marathi |
त्याच्या तेजाचा प्रकाश सगळीकडे झगमगू लागला. त्या तेजाने लोक दिपून गेले. अंधार नाहीसा झाला म्हणून त्यांना आनंदही झाला. पण काही कळायच्या आधीच तळपणारा तारा अंतर्धान पावला.
असाच एक तेजस्वी तारा भारताच्या राजकारणात तळपळा. आपल्या कर्तृत्वाने भारतीयांच्या हृदयसिंहासनावर काही काळ राज्य केले आणि आपली कीर्ती मागे ठेवून अल्पकाळातच कधीही परत न येण्यासाठी निघून गेला. मुलांनो, कोण असेल बरे तो तारा? येते का ओळखता? येते? बरोबर. ते होते, ‘लालबहादूर शास्त्री' आपल्या भारत देशाचे ते अगदी थोडा काळ पंतप्रधान होते.
पण या थोड्या काळातच त्यांनी आपल्या कार्याचा सुगंध असा दरवळत ठेवला, की आजही त्यांची आठवण आल्यावाचून रहात नाही. या थोर पदाला पोहोचण्यासाठी त्यांना किती प्रयत्न करावे लागले, किती कष्ट सोसावे लागले, याची तुम्हाला उत्सुकता असेलच ना? मग ऐका तर. तो काळ ब्रिटिश आमदानीचा. आपल्या देशावर परकीय ब्रिटिश लोकांचे राज्य होते. ते म्हणतील तसेच आपणास रहावे लागत होते. म्हणजे आपण त्यांचे गुलामच होतो बरं का. आपल्याला कसलेही स्वातंत्र्य नव्हते. ते म्हणतील तीच पूर्व, असे आपणास म्हणावे लागत होते.
अशा त्या काळात २ ऑक्टोबर १९०४ साली लालबहादूर शास्त्रींचा जन्म एका गरीब कुटुंबात, उत्तर प्रदेशातील मोगलसराई येथे झाला. त्यांच्या वडिलांचे नाव शारदाप्रसाद. ते अलाहाबाद येथे शिक्षक होते. त्यांच्या आईचे नाव रामदुलारीदेवी. त्या होत्या मोगलसराई येथे शिक्षक असलेल्या हजारीलाल यांच्या कन्या. लालबहादूरांचा जन्म आजोळी म्हणजे मोगलसराई येथे झाला होता. त्यांना एक मोठी व एक लहान बहीण होती. त्यांचे पूर्वज बनारस जिल्ह्यातील रामनगर संस्थानात नोकरीला होते. तिथे त्यांचे एक लहानसे घर होते. त्यांच्या घराण्यातील लोक लहान-सहान नोकऱ्या करून उदरनिर्वाह करीत असत.
लालबहादूर केवळ एक महिन्यांचे असताना एक गमतीदार घटना घडली होती. गंगा नदीच्या काठावर एक जत्रा भरली होती. रामदुलारीदेवी छोट्या बाळाला घेऊन जत्रा पहायला गेल्या. तिथे लोकांची प्रचंड गर्दी झाली होती. रेटारेटी, ढकलाढकली सुरू होती.
एवढ्यात रामदुलारीदेवींना कोणीतरी जोराने ढकलले. काही कळायच्या आतच त्यांच्या हातातील लालबहादूर खाली पडले. माणसांची रेटारेटी चालूच होती. रामदुलारीदेवी खूप घाबरल्या. इकडे-तिकडे शोधले तरी बाळ सापडेना.
शेवटी रडकुंडीला येऊन त्यांनी पोलिसांना कळविले. शोध सुरू होता. अखेर एका गुराख्याच्या झोपडीत लालबहादूर सापडले.
त्याचे असे झाले की, आईच्या हातातून निसटलेले लालबहादूर नेमके त्या गुराख्याच्या टोपलीत अलगद पडले. गुराख्याला काही मूलबाळ नव्हते. ही तर गंगामैयाची कृपा. तिनेच आपल्याला मुलगा दिला, असे समजून गुराखी बाळाला घरी घेऊन गेला.
तो जत्रेत हरवलेला मुलगा आहे, असे पटवून देत पोलिसांनी लालबहादूरांना परत आणून त्यांच्या आईकडे दिले.
वडिलांचा आधार नाहीसा झाला
लालबहादूर दीड वर्षांचे झाले. हसू-खेळू लागले. तोच त्यांचे वडील शारदाप्रसाद प्लेगच्या साथीत मरण पावले. वडिलांचे छत्र हरपले. लालबहादूरांचे ते काही कळण्याचे किंवा समजण्याचे वय नव्हते. सर्वजण पोरके झाले. शारदाप्रसादांनी मागे काहीच ठेवले नव्हते. घरातला कर्तापुरुष गेला. आधार नाहीसा झाला. रामदुलारीदेवी मोठ्या कठीण प्रसंगात सापडल्या. आता कोणाचा आधार शोधावा, असा त्यांना प्रश्न पडला.
रामदुलारीदेवी यांचे वडील हजारीलाल यांनी आपल्या मुलीला नातवंडासह आपल्या घरी नेले. वडिलांनी आधार दिला आणि रामदुलारीदेवीवरील संकट काही काळतरी टळले होते. हे संकट टळले, परंतु पुन्हा दुर्दैव आड आले. दोन वर्षांनी हजारीलाल देवाघरी गेले.
रामदुलारीदेवींवर पुन्हा जणू आभाळ कोसळले. त्यांचा मायेचा आधार तुटला; पण पुन्हा दैवच मदतीला धावून आले. रामदुलारीदेवींचे चुलते दरबारीलाल, त्यांच्या मदतीला धावून आले. ते हजारीलालप्रमाणेच मनाने प्रेमळ व कनवाळू होते. ते सरकारी खात्यात गाझीपूर येथे कामाला होते. त्यांचा मुलगा बिंदेश्वरीप्रसाद हा मोगलसराई येथे शिक्षक होता. त्याच्याकडे रामदुलारीदेवी मुलांसह राहू लागल्या. त्यांचे चुलते दरबारीलाल त्यांना नेमाने खर्चासाठी पैसे पाठवून देत असत.
लालबहादूर त्यावेळी अवघे तीन वर्षांचे होते. आपण कोणत्या संकटात आहोत, हे त्या लहानग्याला कसे समजणार? बिंदेश्वरीप्रसाद हेही स्वभावाने प्रेमळ होते.
लालबहादूर सर्वांचे लाडके बनले होते. त्याच घरी लालबहादूरांचा सख्खा मामाही रहात होता. तो होता सात वर्षांचा. त्याचे नाव पुरुषोत्तमलाल. मग काय? मामा-भाच्याची चांगलीच गट्टी जमली. हसण्या-खेळण्यात त्यांचा दिवस जाऊ लागला.
तेथे मौलवीच्या हाताखाली मुलांना शिक्षणाचे प्राथमिक धडे देण्याचा, त्या घरात रिवाज होता. म्हणून मुलांना प्रथम उर्दू शिकावे लागे. दीक्षा देण्याचा समारंभ होत असे. लालबहादूरांनाही अशी दीक्षा दिली. मौलवीच्या हाताखाली ते उर्दू आणि सामाजिक शिष्टाचार, याचे शिक्षण घेऊ लागले. बारा वर्षांचे होईपर्यंत लालबहादूर मोगलसराईला मामांकडेच रहात होते.
चुलत आजोबा, आजी, काका यांनी त्यांना शिक्षणाची गोडी लावली. त्यामुळे वडील नसले तरी लालबहादूरांच्या शिक्षणात अडथळा आला नाही. त्यांचे भाग्य थोर असेच म्हणायला हवे.
बालबुद्धी ? नव्हे न्यायबुद्धी -
वय लहान असले तरी लालबहादूर फार समंजस होते. तेव्हा ते सर्वजण मिापूर येथे रहात होते. एकदा लालबहादूर आणि त्यांचा मामा पुरुषोत्तमलाल (त्याला सर्वजण लल्लन म्हणत.) असे दोघे गंगेच्या काठी फिरायला गेले.
तिथे एक म्हातारा माणूस टोपलीत आंबे घालून चालला होता. “घ्या, खूप गोड आंबे आहेत," असे म्हणत म्हाताऱ्याने लालबहादूरांना आणि त्यांच्या मामाला एक-एक आंबा खाण्यास दिला.
“आता दिवस मावळू लागल्याने घरी जायच्या आधी, मला हे सर्व आंबे खपवले पाहिजेत. एक आणा द्या आणि हे शंभर आंबे घरी न्या' म्हातारा म्हणाला.
आंबे खरेच खूप गोड होते. लालबहादूर आणि मामाने म्हाताऱ्याला एक आणा दिला. म्हातारा आंबे मोजू लागला. पन्नास आंबे मोजून होताच लालबहादूर मध्येच म्हणाले, “आजोबा, पुरे झाले पन्नास. यापेक्षा आम्हाला अधिक आंब्यांची गरज नाही." म्हातारा म्हणाला, “अरे मी एक आण्याला शंभर आंबे द्यायचे कबूल केले आहे. तुम्ही मला एक आणाही दिलात. म्हणून मला तुम्हाला शंभर आंबे द्यायलाच हवेत.” _“आजोबा, एक आणा तुम्ही ठेवून घ्या. आम्हाला एवढे पन्नास आंबे पुरे झाले.". म्हाताऱ्याला छोट्या लालबहादूरांचे फार कौतुक वाटले. तो आनंदाने निघून गेला.
लल्लन मामा तोपर्यंत गप्प होता. म्हातारा जाताच तो लालबहादूरांना म्हणाला, “अति शहाणा आहेस. ते आजोबा आंबे एक आण्यात देत होते. तरी तू पन्नासच का घेतलेस?''
त्यावर लालबहादूर म्हणाले, “अरे संध्याकाळ झाली म्हणून नाइलाजाने तो शंभर देत होता. आपण त्याच्या अडचणीचा असा गैरफायदा कशाला घ्यायचा ? गरजेपुरते पुरे झाले."
सहा वर्षांच्या लालबहादूरांची ही केवढी न्यायबुद्धी. चांगल्या संस्कारामुळे ते असे वागले.
आणखी एक प्रसंग असाच घडला. लालबहादूरांचे चुलत मामा बिंदेश्वरीप्रसाद, खाण्याचे फारच शौकीन. त्यांनी कबुतरे पाळली होती. मनात आले की त्यातले एखादे कापून ते आवडीने खात.
त्यांना एकदा अशीच लहर आली. त्यांनी पिंजऱ्यातील एक कबूतर बाहेर काढले. पण ते निसटून घराच्या कौलावर जाऊन बसले. "कबूतर कुठे आहे ते जरा बघ रे, नानकू." ते लालबहादूरांना नानकू म्हणत. मामाने असे सांगताच लालबहादूरांनी ते कुठे आहे ते सांगितले.
"जा, त्याला पकडून आण." मामाने आज्ञा केली. पण लालबहादूर जागचे हलले नाहीत. ते पक्के शाकाहारी होते.
“जा रे, लवकर आण." मामा पुन्हा म्हणाले. “मी आणणार नाही.” लालबहादूर म्हणाले. “का आणणार नाहीस?" मामा म्हणाले.
"तुम्ही त्याला मारून खाता म्हणून." लालबहादूर म्हणाले.
"अरे कबुतरे तर खाण्यासाठीच पाळतात." मामा म्हणाले.
"नको, तुम्ही त्याचा जीव घ्याल." लालबहादूर म्हणाले.
"बरे बाबा. आता मी त्याला मारणार नाही. जा, आण लवकर.” मामा म्हणाले. लालबहादूरांना ते सर्व खरे वाटले. त्यांनी कबूतर आणून दिले. मामांनी वचन पाळले नाही. कबूतर मारून खाल्ले. लालबहादूरांना खूप वाईट वाटले. आपल्यामुळेच कबुतराचा जीव गेला. त्यांनी मोठ्या माणसांना धडा शिकविण्याचे ठरविले.
त्यांनी जेवण घेण्याचे नाकारले. कोणी कितीही समजावले तरी, उपाशी बसून राहिले. दुसऱ्या दिवशी बिंदेश्वरी मामांना सारे रामायण समजले. त्यांनी त्यांना जेवण कर, असे सांगितले.
"मी अन्नाला स्पर्श करणार नाही. खोटे वचन देऊन तुम्ही मला फसवले.” लालबहादूर म्हणाले, यावर मामांना आपली चूक कळून आली. "नानकू, तुझे म्हणणे खरे आहे. यापुढे मी कधीही कबूतर मारून खाणार नाही. तुझ्यासारखाच संपूर्ण शाकाहारी होईन." मामा म्हणाले.
पुढे या मामांनी कधीच मांसाहार घेतला नाही. लालबहादूरांचा पहिलाच घरगुती सत्याग्रह अशाप्रकारे पार पाडला. अजूनही असाच एक प्रसंग घडला. लालबहादूर तेव्हा सहावीत शिकत होते. शाळेच्या हजेरीत त्यांचे नाव होते, “लालबहादूर वर्मा." परंतु वर्मा हे नाव लावण्याची त्यांची इच्छा नव्हती. त्यांनी घरून तशी परवानगी मिळविली. त्यांनी शाळेच्या हेडमास्तरांना अर्ज करून कळविले की, "माझे आडनाव 'वर्मा' हजेरीपटातून वगळा."
मास्तरांनी त्यांचे आडनाव वगळले. फक्त लालबहादूर हेच नाव हजेरीपटावर राहिले. पुढे लालबहादूर काशी विद्यापीठात शिकल्यावर त्यांना “शास्त्री' ही पदवी मिळाली. तेव्हापासून ते "लालबहादूर शास्त्री" याच नावाने ओळखले जाऊ लागले.
प्रसंग तसे लहान असले तरी, लहानपणीच लालबहादूर किती नैतिक मूल्ये जपणारे विवेकी स्वभावाचे होते, याचे आपल्याला दर्शन घडते.
मी काय करायला हवे? असे दिवस चालले असता लालबहादूरांवर पुन्हा एकदा आपला बाड-बिस्तरा उचलण्याची वेळ आली. त्यांच्या मामांची मिापूरला बदली झाली. सर्व लोक तिकडे गेले; परंतु लालबहादूरांना पुढील शिक्षणासाठी बनारसला यावे लागले. रामदुलारीदेवी मुलांना घेऊन बनारसला आल्या. दूरच्या नात्यातला त्यांचा पुतण्या बनारस येथे नोकरीला होता. त्यांनी मोठ्या आनंदाने या कुटुंबाचे पालन-पोषण करण्याची जबाबदारी उचलली. सर्वजण त्यांच्याकडे राहू लागले.
लालबहादूरांनी हरिश्चंद्र हायस्कूलमध्ये सातवीच्या वर्गात प्रवेश घेतला. ते १९१७ साल होते. बनारस हे पूर्वीपासून एक पुण्यक्षेत्र मानले जात होते. राजकारणाच्या दृष्टीनेही बनारसला महत्त्व येऊ लागले होते.
येथे काँग्रेसचे अधिवेशन भरले होते. लो. टिळक, लाला लजपतराय, बिपिनचंद्र पॉल यांच्या भाषणांनी, विचारांनी बनारसचा परिसर दुमदुमून गेला होता.
तर मुलांनो, अशा पवित्र वातावरणात लालबहादूर शिक्षण घेऊ लागले. ते काही फार मोठे नव्हते. अवघे तेरा वर्षांचे. त्यांच्या आयुष्याची जडण-घडण येथेच होत होती. लालबहादूर शाळेत एक सद्वर्तनी आणि हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते.
त्या शाळेत मिश्रा नावाचे एक गुणग्राहक शिक्षक होते. त्यांनी लालबहादूरांच्या अंगचे गुण पारखले. त्यांना वर्गाचा सेक्रेटरी नेमले. मिश्रा हे स्वभावाने प्रेमळ आणि पक्के देशभक्त होते.
ते सुट्टीच्या दिवशी मुलांच्या सहली काढीत. लालबहादूर शिस्तप्रिय, प्रामाणिक असल्याने त्यांनी नावे नोंदवणे, एक आणा वर्गणी जमविण्याचे काम त्यांच्यावर सोपविले होते. एकदा पैसे नसल्याने लालबहादूरांनी आपले नाव यादीत लिहिले नाही. म्हणून मिश्रा गुरुजींनी प्रेमाने त्यांची वर्गणी भरली. गुणवान लालबहादुर गुरुजींना खूप आवडायचे. एकदा त्यांनी त्यांना आपल्या घरी नेले. याला आपला मुलगा समज असे पत्नीला सांगितले. त्याही लालबहादूरांना मुलाप्रमाणेच वागवीत.
लालबहादूर त्यांच्या एका मुलाची शिकवणी घेऊ लागले. लालबहादूर शिकवणीचे पैसे घेणार नाहीत हे ओळखून त्यांनी त्यांची प्रत्येक महिन्याला द्यावी लागणारी फी एका पेटीत साठवून ठेवली.
जेव्हा लालबहादूरांच्या बहिणीचे लग्न निघाले तेव्हा गुरुजींनी हे पैसे, लालबहादूरांची कमाई आहे, असे सांगून ते रामदुलारीदेवींकडे दिले. लग्नात हे पैसे कामाला आले. मिश्रा गुरुजी, आपल्या देशाची उच्च सांस्कृतिक परंपरा मुलांना पटवून सांगत. छत्रपती शिवाजीमहाराज, महाराणा प्रताप यांच्या शौर्यकथा ते मुलांना ऐकवत. पूर्वी आपला देश कसा सुजलाम-सुफलाम होता, परंतु परकीय लोक आपल्या देशात आले आणि आपल्या देशाची संपत्ती कशी लुटली, याचा इतिहास ते मुलांना सांगत.
स्वातंत्र्य आंदोलनाची माहिती ते मुलांना द्यायचे. अशाप्रकारे देशाभिमान जागृत करण्याचे काम मिश्रा गुरुजींनी हाती घेतले होते. याचवेळी देशात अनेक घडामोडी घडत होत्या. म. गांधीजींनी स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यायला सुरुवात केली होती.
लालबहादूरांच्या घराण्यातील कोणी आजपर्यंत राजकारणात भाग घेतला नव्हता.
लालबहादूर शिकत असले तरी आजूबाजूच्या घटना लक्षपूर्वक पहात होते. स्वातंत्र्य चळवळीत तरुणांनी भाग घ्यावा, असे मिश्रा गुरुजी सांगत होते...
आपणही स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यावा, असे लालबहादूरांना वाटत होते. भारतात घडणाऱ्या घटना, त्याची माहिती ते वाचू लागले. त्यांनी काँग्रेसबद्दलही माहिती करून घेतली. स्वामी दयानंद, विवेकानंद यांची पुस्तके त्यांनी वाचून काढली.
बंकीमचंद्रांची 'आनंदमठ' ही कादंबरी वाचून त्यांना खूप आनंद झाला. डॉ. अॅनी बेझंट यांच्या विचारांचा प्रभावही त्यांच्यावर पडला. “मला संपत्तीचा मोह नाही, पैसा कमवून ऐश्वर्यात रहाणे मला आवडणार नाही, सरकारी मान-सन्मान मिळविणे हा माझा उद्देश नाही. माझे देशबांधव आणि माझा देश, यांच्या कल्याणासाठी मला देह झिजवायचा आहे." असे म्हणणाऱ्या लाला लजपतराय यांच्या विचारांनी लालबहादूर भारावून गेले.
त्यांच्या मनात देशभक्तीची ज्योत पेटू लागली. आपणही आपल्या मायभूमीला गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घ्यायला हवा, असे लालबहादूरांना वाटू लागले.
त्याचवेळी गांधीजींचे विचारही त्यांच्या कानावर पडत होते. जालीयनवाला बाग येथे इंग्रजांनी केलेल्या हत्याकांडाने, त्यांना खूप दुःख झाले. त्यांचे मन पेटून उठले.
लालबहादूर तेव्हा दहावीत होते. लालबहादूरांनी आधी आपले शिक्षण पूर्ण करावे. मग कसलीतरी नोकरी करून आपल्या कुटुंबाला हातभार लावावा, असे त्यांच्या घरातील लोकांचे म्हणणे होते. ते नोकरी करू लागले
म्हणजे घरातील गरिबी थोडीतरी दूर होईल, अशी त्यांच्या कुटुंबीयांची अपेक्षा होती. कोणालाही असेच वाटले असते; परंतु घडणार काही वेगळेच होते.
स्वातंत्र्य चळवळीचे शिलेदार
गांधीजी देशभर फिरत होते. स्वातंत्र्यासाठी आपण काय करायला हवे, ते लोकांना सांगत होते. जनता इंग्रजांच्या छळाला, दडपशाहीला, कारभाराला कंटाळली होती.
कोणीतरी यातून आपली सुटका करावी, असे जनतेला वाटत होते. अशावेळी गांधीजी त्यांना स्वराज्याचा मार्ग दाखवीत होते.
एकदा गांधीजींची बनारसला मोठी सभा भरली. अलगू राय, त्रिभुवन नारायण सिंग या आपल्या मित्रांबरोबर लालबहादूर या सभेला हजर होते. लालबहादूर लक्षपूर्वक गांधीजींचे भाषण ऐकत होते.
"तरुणांनी सरकारी शाळेवर बहिष्कार घालावा. त्यांनी राष्ट्रीय शिक्षण देणाऱ्या शाळेत शिकावे आणि स्वातंत्र्य चळवळीत भाग घ्यावा. भारतमातेला परकीयांच्या गुलामगिरीतून मुक्त करण्यासाठी, देशाला तुमची गरज आहे. ते तुमचे कर्तव्य आहे,' असे गांधीजींनी तरुणांना आवाहन केले. भाषण ऐकून लालबहादूर घरी आले. काय करावे, हे त्यांना समजत नव्हते. ते सरकारी शाळेत शिकत होते. आपल्या घरातील माणसांना आपला विचार बोलून दाखवीत ते म्हणाले, “मला देशसेवा करायची आहे.”
त्यांचा हा विचार ऐकून घरातील सर्वांना नवलच वाटले. पण त्यांच्या आईला त्यांचे विचार माहीत होते. त्यांचे मामा म्हणाले, “अरे शिक्षण अर्धवट सोडलेस, तर तुला नोकरी कोण देईल? पैसा कसा कमावणार?" “वडील नसताना तुझ्या आईने एवढे कष्ट सोसून तुला वाढविले. शिक्षण दिले. त्यांचे कसे होणार? तू तर त्यांचा आधार आहेस. आधी आई आणि बहिणीचे कर्तव्य पार पाड. मग तुला करायचे ते कर."
यावर त्यांची आई मात्र म्हणाली, “हे बघ नानकू, तू शांतपणे विचार कर. तुझा निर्णय तूच घे.
पण जो निर्णय घेशील. त्याचे पालन कर."
आपल्या आईचे म्हणणे लालबहादूरांना पटले. आईने त्यांना मोलाचा सल्ला दिला होता. त्यांनी रात्रभर विचार केला आणि त्यांचा निर्णय ठरला. कितीही कष्ट पडले तरी, या घडीला भारतमातेची सेवा करणे हाच आपला धर्म, तेच आपले कर्तव्य.
दुसऱ्या दिवशी त्यांनी शाळेतून नाव काढले. असा निर्णय घेणे ही सोपी गोष्ट नव्हती. जाणूनबुजून कोणी हातात पेटता निखारा घेईल काय? पण लालबहादूरांनी देशासाठी तसे धाडस केले. त्याकाळी हातात नुसता देशाचा झेंडा घेऊन फिरले तरी, इंग्रज शिपाई लाठीने डोकी फोडीत
आणि खडी फोडायला तुरुंगात पाठवीत. त्यांनी स्वातंत्र्य आंदोलनात भाग घेतला. त्यांना तुरुंगाची वारी घडली; पण स्वातंत्र्य आंदोलनातील ते एक शिलेदार झाले. गांधीजींच्या आदेशानुसार जे. बी. कृपलानी यांनी सरकारी नोकरी सोडून खादीचा प्रसार करण्यासाठी आश्रम काढला. लालबहादूर व त्यांचे मित्र त्यांना मदत करू लागले. खादीची विक्री करू लागले.
तेथे एक राष्ट्रीय शाळाही त्यांनी सुरू केली होती. या शाळेत नेहमीच्या शिक्षणाबरोबरच राष्ट्रप्रेम आणि देशभक्ती याचेही शिक्षण दिले जात होते. तेथेच लालबहादूरांनी गॅरी बाल्डी, डी. व्हेलेरा, मॅझिनी या स्वातंत्र्यवीरांची चरित्रे वाचून काढली. गांधीजींच्या प्रेरणेने बनारस येथे काशी विद्यापीठाची स्थापना झाली. हिंदी माध्यमातून शिक्षण देणारे ते देशातील पहिलेच विद्यापीठ ठरले. तेथे बोलताना गांधीजी म्हणाले, “हे विद्यापीठ असहकाराच्या चळवळीचे प्रतीक आहे. येथे राष्ट्रीय शिक्षण दिले जाईल. मुलांनी या राष्ट्रीय विद्यापीठात प्रवेश घेऊन, राष्ट्रकार्याला हातभार लावावा.”
लालबहादूर आणि त्यांच्या मित्रांनी या विद्यापीठात प्रवेश घेतला. परीक्षा घेऊन तेथे चार वर्षांच्या अभ्यासक्रमासाठी प्रवेश देण्यात येऊ लागला. अशाप्रकारे लालबहादूर स्वातंत्र्य चळवळीकडे ओढले गेले.
समाजकार्याचा वसा मुलांनो, मौजमजा करण्याच्या वयात लालबहादूरांनी देशभक्तीचा, देशसेवेचा झेंडा खांद्यावर घेतला. त्यांच्या मनात देशसेवेचे स्फुलिंग प्रखरतेने पेटले होते.
काशी विद्यापीठात नामवंत, विद्वान प्राध्यापक मंडळी देशभक्तीचे, संस्कृतीचे, तत्त्वज्ञानाचे धडे देत होती. लालबहादूर मन लावून अभ्यास करू लागले. नेहमीच्या अभ्यासाबरोबर ते हिंदी, इंग्रजी आणि उर्दू साहित्याचाही अभ्यास करू लागले.
या काळात त्यांनी आपल्या गरजा फारच मर्यादित ठेवल्या. त्यांनी मनापासून स्वत:ला चांगल्या सवयी लावून घेतल्या. आपल्या गरिबीचे त्यांनी कधी भांडवल केले नाही की, गरिबीबद्दल त्यांना कधी दुःख झाले नाही.
मिष्टान्न खाण्याच्या आपल्या सवयीबद्दल त्यांना घृणा वाटू लागली. ही सवय तोडलीच पाहिजे, असे त्यांना वाटू लागले. त्यांनी एक दिवस पक्वान्नांनी भरलेल्या ताटात तांब्याभर पाणी ओतले. सर्व पदार्थ एकत्र कालविले. ते थंड, बेचव अन्न त्यांनी पोटात रिचविले. अशाप्रकारे चार-दोनवेळा त्यांनी असा प्रकार केला. त्यामुळे त्यांना साधे जेवणही गोड वाटू लागले. त्यांनी आपल्या सवयीवर मात केली. जिभेचे चोचले पुरविणे अशाप्रकारे बंद केले.
लालबहादूर काशी विद्यापीठात रमू लागले. वाद-विवाद, चर्चा यामध्ये ते रंगत असत. मोजक्या, सोप्या शब्दांत ते आपलीही मते मांडीत असत. दुसऱ्याचे म्हणणे ते ऐकत असत. आपणच फार शहाणे म्हणून मिरविण्याचा त्यांचा स्वभाव नव्हता. लालबहादूर मित्रांच्या कोंडाळ्यात हास्यविनोदही करीत असत. पण कोणाचे मन दुखावले जाईल, असे ते वागत नसत. त्यांचे कपडे मोजके आणि नेहमी स्वच्छ असत. त्यांना संगीताचीही आवड होती.
गरिबीतही समाधानी वृती असलेले लालबहादूर देशसेवेबरोबरच आपले शिक्षणही पुरे करीत होते. पुढे ते पदवी अभ्यासक्रम पहिल्या वर्गात पास झाले. त्यांनी शास्त्री ही पदवी मिळविली. ही पदवीच त्यांचे कायमचे आडनाव होऊन बसली.
लालबहादूर आता ध्येयवादी तरुण बनले. काँग्रेसचे स्वयंसेवक बनून देशकार्यासाठी सज्ज झाले. लाहोरला लालालजपत राय यांनी 'द सर्व्हण्टस् ऑफ द पीपल सोसायटी' स्थापन केली होती.
संपूर्ण राष्ट्रकार्याला वाहून घेणारे मिशनरी वृत्तीचे स्वयंसेवक निर्माण करण्याचे काम ही सोसायटी करीत होती. अल्प वेतनात सेवा आणि त्याग या भावनेने कार्य करीत इतरांपुढे आदर्श निर्माण करण्याचे या सोसायटीचे ध्येय होते. या सोसायटीत लालबहादूर दाखल झाले. मुजफ्फरपूर येथे संस्थेचे समाज उद्धार केंद्र चालवले जात होते. या केंद्राचे प्रमुख म्हणून लालबहादूरांनी अत्यंत कष्ट घेऊन तेथे काम केले. तेथे काम करण्यापूर्वी कठोर शपथ घ्यावी लागत असे.
आता लालबहादूरांना सर्वजण शास्त्री असे म्हणू लागले होते. शास्त्रींचा पिंड सेवावृत्ती, निःस्वार्थीपणा, कष्टाळूपणा आणि विनम्रतेचा होता. म्हणूनच त्यांना अशी कठीण जबाबदारी पेलता आली. अत्यंत तुटपुंज्या मिळकतीच्या आधारावर गरिबांमध्ये राहून महिला आणि बालकं यांच्या कल्याणासाठी शास्त्री रात्रंदिवस कष्टत होते. खूप हाल-अपेष्टा भोगून ते सामाजिक कार्य करीत होते.
आयुष्यात प्रथमच ते थोडीफार कमाई करू लागले. त्यांनी आपला पहिला पगार आपले पालन-पोषण करणारे रघुनाथप्रसाद यांना पाठवून दिला. शास्त्रींनी आपली पहिली कमाई पाठवलेली पाहून त्यांचे मन भरून आले. त्यातला नाममात्र एक रुपया ठेवून, बाकी पैसे त्यांनी शास्त्रींना परत पाठवून दिला. असे नातेवाईक मिळणे म्हणजे शास्त्रींचे नशीब थोर असेच म्हणायला हवे.
पं. नेहरूंचे मदतनीस
जनसेवेचे व्रत घेतलेले शास्त्रीजी तन-मन-धन अर्पून काम करीत होते. त्याचवेळी गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू केले. या आंदोलनात भाग घेतल्याबद्दल इंग्रज शिपायांनी लाला लजपत राय यांना लाठीने झोडपून काढले आणि त्यातच त्यांचे निधन झाले. या घटनेने शास्त्रीजींना फार दुःख झाले. लाला लजपतराय यांच्यानंतर पुरुषोत्तमदास टंडन हे सोसायटीचे अध्यक्ष झाले. ते कडवे देशभक्त होते.
मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी स्वातंत्र्य चळवळीत उडी घेतली होती.
टंडन अलाहाबादला राहूनच सोसायटीचे काम पहात असत. त्यांचे मदतनीस म्हणून मग शास्त्रीजी काम पाहू लागले. त्याचवेळी ते तेथील लोकांच्या अडचणीही सोडवू लागले. त्यांच्या कामावर टंडन खूष असत.
शास्त्री आता चोवीस वर्षांचे झाले होते. घरचे लोक त्यांच्या विवाहाचा विचार करू लागले. सीताराम नावाचे गृहस्थ शाळांचे अधिकारी म्हणून काम करीत असत. त्यांची मुलगी ललितादेवी. सीतारामांनी शास्त्रींबरोबर ललितादेवींचा विवाह करण्यास मान्यता दिली. ललितादेवी त्यावेळी सतरा वर्षांच्या होत्या. शास्त्रीजींनी हुंडा घेतला नाही. हुंडा म्हणून चरख्याचा स्वीकार केला. लवकरच शास्त्रीजीललितादेवी शुभमंगल झाले.
सधन घराण्यात वाढलेल्या असूनही ललितादेवींनी शास्त्रीजींबरोबर गरिबीत संसार करण्याचा निर्णय घेतला. पती खादी वापरतात म्हणून ललितादेवींनी, खादीच्या जाड्याभरड्या साड्या वापरण्यास सुरुवात केली.
शास्त्रीजींची कामावरील निष्ठा पाहून टंडननी त्यांच्यावर काँग्रेस पक्षाची काही कामे सोपवायला सुरुवात केली. शास्त्रीजी गुंतागुंतीची कामे मार्गी लावू लागले. पक्षाचे काम करीत असतानाच शास्त्रीजींचा नेहरू कुटुंबीयांशी प्रथम परिचय झाला. पं. नेहरू तेव्हा शहर काँग्रेसचे अध्यक्ष होते. प्रेमळ स्वभावाच्या शास्त्रीजींना त्यांनी पाहिले. त्यांची सेवावृत्ती पाहून ते प्रभावित झाले. त्यांनी शास्त्रीजींवर आपली कामे सोपवली.
शास्त्रींनी अगदी व्यवस्थितपणे काम करून आपल्या कामाची चुणूक नेहरूंनाही दाखविली. नेहरू खूष झाले. शास्त्रीजींचा नेहरू घराण्याशी संबंध वाढू लागला. पं. नेहरू पुढे काँग्रेसचे अध्यक्ष म्हणून काम पाहात होते. त्यांचा कामाचा व्याप वाढला.
पत्रव्यवहाराची सर्व कामे त्यांनी शास्त्रीजींवर सोपविली. हिंदी, इंग्रजी, उर्दू अशा तिन्ही भाषांतील पत्रव्यवहार शास्त्रीजी चोखपणे पार पाडीत होते.
शास्त्रीजींचा कामातील उरक, त्यांचा प्रामाणिकपणा पाहून पं. नेहरूंचा त्यांच्यावरील विश्वास वाढू लागला. अडचणीची कामे ते शास्त्रीजींवर बिनधास्तपणे सोपवू लागले. शास्त्रीजींनी त्यांचा विश्वास संपादन केला. याचवेळी शास्त्रीजी टंडन यांच्याकडेही काम करीत असत. पक्षाच्या कामाबरोबर ते सोसायटीची कामेदेखील करायचे. टंडन फारच शिस्तप्रिय होते. शास्त्रीजींनी त्यांचाही विश्वास संपादन केला. पं. नेहरू आणि टंडन दोघेही पक्के राष्ट्रभक्त होते. मात्र दोघांची विचार करण्याची, काम करण्याची पद्धत थोडी वेगळी होती आणि अशा वेगळ्या विचारसरणीच्या दोन्ही व्यक्तींकडे शास्त्रीजी त्यांच्या मदतनिसाचे काम करीत होते. ही अवघड जबाबदारी ते लीलया पार पाडीत असत.
पं. नेहरू आणि टंडन हे दोघेही शास्त्रीजींना आपल्या विश्वासातला माणूस मानू लागले होते. त्यामुळे शास्त्रीजींना भारतीय राजकारणात पुढे येण्यास खूप प्रोत्साहन मिळाले.
शास्त्रीजी भारतीय संस्कृतीशी एकनिष्ठ होते. त्यामुळे पाश्चात्त्य विचारसरणीच्या पं. नेहरूंना ते खूप आवडू लागले. आपल्या घरातला माणूस या दृष्टीने ते शास्त्रीजींकडे पाहू लागले. अशाप्रकारे शास्त्रीजी त्या काळातील दोन मोठ्या नेत्यांचे सल्लागार बनले.
सैनिक झाले स्वातंत्र्याचे कोणतेही शस्त्र हाती न घेता देशात स्वातंत्र्यलढा सुरू झाला होता. अनेक तरुण स्वातंत्र्य चळवळीत सामील होत होते.
शास्त्रीजींनीही या स्वातंत्र्य संग्रामात स्वखुशीने उडी घेतली. त्यावेळी ते अलाहाबाद जिल्हा काँग्रेसचे चिटणीस म्हणूनही काम करीत होते.
गांधीजींनी दांडीयात्रा काढून मिठाचा कायदेभंग केला, त्यामुळे गावोगावी कायदेभंगाच्या चळवळी सुरू झाल्या. मग शास्त्रीजी तरी मागे कसे राहाणार? त्यांनी गावोगावी, इंग्रज सरकारला भाडे न देण्याची चळवळ सुरू केली.
त्यामुळे इंग्रज सरकार खवळले. शास्त्रीजींना अटक होऊन अडीच वर्षांची कारावासाची शिक्षा झाली. परंतु लवकरच त्यांची सुटका झाली. त्यानंतर गांधीजींनी सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केली. परदेशी मालावर जनतेने बहिष्कार घातला. शास्त्रीजींनी स्वत:ला या चळवळीत झोकून दिले. शास्त्रीजींना पकडून परत तुरुंगात धाडण्यात आले.
मुलांनो, एकदा मनात जाज्वल्य देशाभिमान जागृत झाला, तर देशाची अस्मिता टिकविण्यासाठी खरा स्वातंत्र्यवीर, कोणत्याही संकटाला सामोरा जाण्यास कचरत नाही.
शास्त्रीजीही तसेच होते.
त्यांच्याही हृदयात जाज्वल्य देशाभिमानाची ज्योत तेवू लागली. अनेक आंदोलनात त्यांनी भाग घेतला. अनेकवेळा त्यांना तुरुंगात जावे लागले. आपल्या आयुष्यातील नऊ वर्षे त्यांनी तुरुंगात काढली.
या काळात त्यांच्या कुटुंबावर अनेक संकटे आली. पण ते कधी मागे हटले नाहीत. स्वातंत्र्यासाठी झगडणाऱ्या देशप्रेमी वीरांना अनेक संकटांतून पार पडावे लागते हेच खरे.
संकटाशी सामना शास्त्रीजी तुरुंगात असताना, त्यांच्या कुटुंबालाही अनेक संकटातून जावे लागत होते. एकदा शास्त्रीजींची मोठी मुलगी खूप आजारी पडली. घरी ललितादेवी एकट्याच मुलांचा सांभाळ करीत होत्या.
आजारी मुलीला भेटण्यासाठी शास्त्रीजींच्या जीवाची घालमेल होत होती. मुलीला भेटायचे तर सरकारला असे लिहून द्यावे लागणार होते की, मी यापुढे राजकीय कार्यात भाग घेणार नाही. पण शास्त्रीजींना ते मान्य नव्हते.
पण तुरुंगाधिकाऱ्याचा शास्त्रीजींवर विश्वास होता. ते मुलीला भेटून परत येतील, याची त्याला खात्री होती. त्याने शास्त्रीजींना १५ दिवसांच्या मुदतीवर घरी सोडले.
शास्त्रीजी घरी गेले. पण त्याच दिवशी त्यांच्या मुलीने या जगाचा निरोप घेतला. क्रियाकर्म आटोपताच शास्त्रीजी तत्काळ तुरुंगात हजर झाले. शास्त्रीजी नियमाने वागणारे, संधीचा गैरफायदा न घेणारे होते, हेच आपल्याला दिसून येते.
प्रत्येक चळवळीत शास्त्रीजी पुढे असत. त्यामुळे त्यांना सारख्या तुरुंगाच्या वाऱ्या कराव्या लागत. त्यांचे संघटनकौशल्य, समंजसपणा, शुद्ध आचरण, अथक परिश्रम यामुळे त्यांचे महत्त्व फार वाढले होते.
त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या येऊन पडत होत्या. ते सर्वांशी नम्रतेने बोलून, त्यांच्या अडचणी समजावून घेऊन, ते सर्वांची मने जिंकत होते. दिलेली आश्वासने ते पाळायचे. लहान-मोठ्या सर्व कार्यकर्त्यांचा ते मान राखीत. सर्वांना आदराने वागवीत. त्यामुळे सगळीकडे त्यांचे नाव झाले. त्यांची कीर्ती पसरू लागली.
जमीन सुधारणा अहवाल तयार करून, शास्त्रीजींनी खूप मोठे कार्य केले होते. पिढ्यान्पिढ्या गरीब शेतकरी ज्या जमिनीत घाम गाळीत होते, ते त्या जमिनीचे मालक नव्हते.
रात्रंदिवस कष्ट करून अर्धपोटी राहणे हेच त्यांच्या नशिबी होते; परंतु शास्त्रीजींनी केलेल्या सुधारणांमुळे गरीब शेतकऱ्यांचे दुःख कमी होण्यास मदत झाली. याच सुधारणा पुढे देशभर राबविल्या गेल्या. त्यामुळे गरीब शेतकरी जमिनीचा मालक होऊ शकला.
शास्त्रीजी आता अलाहाबादला कार्य करीत होते. पण सततचा तुरुंगवास, सकस अन्नाचा अभाव, अखंड कष्ट यामुळे ते खूप आजारी पडले. यावेळी ललितादेवींनी त्यांची खूप सेवा केली.
१९४२ साली गांधीजींनी 'चले जाव' आंदोलनाची घोषणा केली. इंग्रज सरकार घाबरले. त्यांनी सर्व प्रमुख नेत्यांना अटक करून तुरुंगात टाकले.
त्यावेळी शास्त्रीजी इंग्रजांच्या हाती लागले नाहीत. ते गुपचूपपणे कार्य करू लागले. स्वातंत्र्य
आंदोलनाची माहिती देणारी पत्रके ते वाटू लागले. शक्य त्या मार्गाने स्वातंत्र्य चळवळ चालू ठेवण्याचा त्यांचा प्रयत्न होता. पण त्यांनाही शेवटी पकडून तुरुंगात डांबले गेले. शास्त्रीजी तुरुंगात गेले पण त्यांचे कुटुंब संकटात सापडले. ललितादेवी कसेबसे मुलांचे पालन-पोषण करीत होत्या.
कितीही संकटे आली तरी, त्या शास्त्रीजींना कधीही दोष देत नव्हत्या. गरिबीतही आनंदाने कसे राहायचे, हे त्या पतीकडून शिकल्या होत्या.
धनाची नव्हे! प्रेमाची कमाई
दुसऱ्या महायुद्धामुळे इंग्लंड हे राष्ट्र खिळखिळे झाले होते. त्यांचे साम्राज्य लयाला जाऊ लागले होते. भारतातल्या स्वातंत्र्य चळवळीने त्यांच्या नाकीनऊ आले होते. हळूहळू भारतीय लोकांच्या हाती राज्यशकट सोपवावा, असे त्यांना वाटू लागले होते. त्यामुळे १९४५ सालामध्ये कैदेत ठेवलेल्या सर्व नेत्यांची सुटका झाली. त्यांच्याबरोबर शास्त्रीजीही सुटले.
त्यांनी उत्तर प्रदेशात काँग्रेसचे कार्य करण्यास सुरुवात केली. आपल्या अंगच्या गुणांमुळे त्यांच्याकडे अनेक मानाची पदे चालून आली. या पदावर काम करीत असताना, त्यांनी नेहमी जनतेचे कल्याण हेच ध्येय डोळ्यांसमोर ठेवले.
मुलांनो, गुणवान माणसे कोणाला आवडत नाहीत?
गुणी व्यक्ती सर्वांच्या आवडत्या होतात. सर्वांच्या आदरास आणि विश्वासास पात्र ठरतात. शास्त्रीजी असेच होते.
शास्त्रीजी पहिल्यांदा उत्तर प्रदेशात मंत्री म्हणून काम करू लागले; पण त्यांनी आपली नम्रता कधी सोडली नाही. ते नेहमी अगदी साधे आणि स्वच्छ राहात असत. मंत्री बनल्यावरही त्यांनी आपला साधेपणा सोडला नाही. उत्तर प्रदेशाचे गृहमंत्री म्हणून काम करीत असताना, त्यांनी माणुसकीचे दर्शन घडविले. सर्वांनी कायदा पाळला पाहिजे हे खरे. परंतु कायद्याची अंमलबजावणी करताना माणुसकीच्या भावनेने काम केले पाहिजे, असे त्यांनी ठरविले. लोकांचा जमाव पांगविण्यासाठी पोलिसांनी एकदम लाठीचा वापर न करता, प्रथम जमावावर पाण्याचे फवारे सोडावेत, हे त्यांनीच ठरविले होते.
पोलीस हा जनतेचा सेवक आहे, असे समजून स्वत:ला कमी न लेखता पोलिसांनी काम करावे यासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले. अशा सुधारणा करीत असताना कोणाचे मन दुखावले जाणार नाही, कोणाचा अपमान होणार नाही, पण काम मात्र चोखपणे बजावले जाईल, असा त्यांचा दृष्टिकोन असे. सरकारी कारभार सुधारण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. चांगले काम करण्यासाठी ते प्रोत्साहन देत. कोणाचे दडपण किंवा वशिलेबाजीचा त्यांच्यावर परिणाम होत नसे.
नि:पक्षपातीपणा हा त्यांचा मोठा गुण होता. म्हणूनच शास्त्रीजी अधिकाऱ्यांना, जनतेला आपले वाटत. त्यांनी धनाची कमाई केली नाही, पण जनतेचा विश्वास, प्रेम मात्र भरपूर कमावले, हेच त्यांचे मोठेपण.
जय जवान! जय किसान!
भारत एक स्वतंत्र राष्ट्र म्हणून १५ ऑगस्ट १९४७ रोजी अस्तित्वात आले. पं. नेहरू देशाचे पंतप्रधान झाले. देशाचा कारभार पाहू लागले. त्यासाठी त्यांना कर्तबगार आणि विश्वासू माणसांची गरज भासू लागली. म्हणून पं. नेहरूंनी शास्त्रीजींना दिल्लीला बोलावून घेतले.
शास्त्रीजींच्या आयुष्यात नव्या पर्वाला सुरवात झाली. राष्ट्रीय राजकारणात त्यांचा उदय झाला. काँग्रेस पक्ष संघटनेत त्यांनी अनेक महत्त्वाच्या पदावर काम केले.
त्यांनी देशभर दौरा केला. त्यांना कामाचा कंटाळा नसे. तासन्तास ते काम करीत असत. देशभरातील काँग्रेसजन त्यांच्याकडे आदराने पाहात असत. पं. नेहरूंचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास होता. त्यांच्या अनुभवाचा फायदा देशाला मिळावा म्हणून पं. नेहरू त्यांच्यावर अनेक महत्त्वाच्या जबाबदाऱ्या सोपवीत असत.
काही काळाने शास्त्रीजी देशाचे रेल्वेमंत्री झाले. मंत्री म्हणून काम करताना त्यांनी स्वत:वर काही बंधने घालून घेतली होती. त्यामुळे सर्वांशी त्यांचे चांगले संबंध निर्माण झाले होते.
रेल्वेमंत्री म्हणून काम करीत असताना त्यांनी जनतेसाठी रेल्वे खात्यात अनेक सुधारणा केल्या. त्यामुळे रेल्वेचा कारभार सुधारू लागला. पण अधून-मधून लहान-मोठे अपघात होत असत.
एकदा दोन मोठे अपघात झाले. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी रेल्वेमंत्रिपदाचा राजीनामा दिला.
या राजीनाम्यामुळे पक्षात आणि देशात शास्त्रीजींची प्रतिमा एकदम उजळून निघाली. निवडणुकीनंतर ते पुन्हा वाहतूक खात्याचे मंत्री झाले. खाते कोणतेही असो, शास्त्रीजी तेथे सचोटीने काम करीत, त्यांनी अनेक खात्यांचा कारभार चोखपणे बजावला.
देशातील फुटीर वृत्तीला आळा घालण्यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केले. देशाची अखंडता टिकविण्यासाठी त्यांनी एक आचारसंहिता तयार केली.
आतापर्यंत देशात त्यांनी खूप नाव कमावले होते. अनेक क्षेत्रात त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटविला होता. नेपाळ या शेजारी राष्ट्रांशी मित्रत्वाचे आणि विश्वासाचे संबंध निर्माण करण्यात ते यशस्वी ठरले होते. देश आणि परदेशात असे यशस्वीपणे काम करीत असता, काँग्रेस पक्षाचे काम करण्यासाठी त्यांनी मंत्रिपद सोडले होते. त्यांनी सत्तेची कधी अभिलाषा धरली नाही; परंतु सत्तापदेच त्यांच्याकडे चालून येत असत. पं. नेहरूंचे निधन झाले आणि शास्त्रीजी भारताचे पंतप्रधान बनले. सत्तेचा वापर देशाहितासाठी आणि सामान्य जनतेसाठी करणार, जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन, सर्व बाजूंचा सारासार विचार करून निर्णय घेणार, असे त्यांनी ठरविले. . त्यांच्यासमोर अनेक आव्हाने होती. देशाची परिस्थिती कशी आहे, देशापुढे कोणत्या अडचणी, प्रश्न आहेत याची त्यांना पूर्ण जाणीव होती. सर्वांच्या सहकार्याने अडचणीतून मार्ग काढून देशाला प्रगतिपथावर नेण्याचे त्यांनी आश्वासन
दिले.
देशाच्या संरक्षण यंत्रणेचे आधुनिकीकरण, संरक्षणसिद्धतेसाठी अनेक उपाययोजना, त्यासाठी परदेशातून मदत मिळविणे, अन्नधान्याची टंचाई दूर करणे, महागाई आटोक्यात ठेवणे, अशा महत्त्वाच्या प्रश्नांना त्यांनी हात घातला. शेजारी देशांशी तसेच जगातल्या इतर देशांशी मित्रत्वाचे, शांततेचे संबंध निर्माण करण्यासाठी त्यांनी पावले उचलली. यासाठी त्यांनी जगातील अनेक देशांचा दौरा केला. भारतही शांतताप्रिय राष्ट्र आहे. पण कोणी आम्हाला कमजोर समजू नये, असेही त्यांनी सांगितले. जगातल्या अनेक देशांनी शास्त्रीजींच्या शांततामय धोरणाला पाठिंबा दिला. आपला शेजारी पाकिस्तान या देशाशी शांततेचे, मित्रत्वाचे संबंध असावेत यासाठी त्यांनी पाकिस्तानला भेट दिली.
पाकिस्तानशी मैत्रीचे संबंध निर्माण व्हावेत म्हणून शास्त्रीजी प्रयत्न करीत होते. मात्र, त्याचा पाकिस्तानवर काहीही परिणाम होत नव्हता. भारत आमच्यावर आक्रमण करणार, असा कांगावा पाकिस्तान करीत होते.
भारताला कोंडीत पकडून भारतावर आक्रमण करावे आणि काश्मिर जिंकून घ्यावे, असा पाकिस्तानचा विचार होता. पण ‘घी देखा लेकीन बडगा नही देखा' हे पाकिस्तानला माहित नव्हते. भले भारताकडे आधुनिक शास्त्रे नसतील, तरी एकदा का भारतीय लोक त्वेषाने पेटले, तर पाकिस्तानला पळता भुई थोडी होईल. याकडे त्यांनी डोळेझाक केली होती. पाकिस्तान हळूहळू भारताच्या कुरापती काढू लागला. काही प्रश्न, विवाद असतील तर ते शांततेने मिटवू, असे शास्त्रीजी पाकिस्तानला सांगत होते.
शेवटी पाकिस्तानने अविचार केला. त्यांनी भारतावर आक्रमण केले. शास्त्रीजींनी जशास तसे उत्तर देऊन पाकिस्तानी आक्रमण परतून लावायचा निर्धार केला. भारतीय सैन्याला शत्रूचा प्रतिकार करण्याचे आदेश दिले. भारतीय सैनिकांनी पाकिस्तानची दाणादाण उडविली. या काळात भारतीय लोकांना आणि लढणाऱ्या सैनिकांना प्रोत्साहन देण्यासाठी, त्यांचा देशाभिमान जागृत करण्यासाठी शास्त्रीजींनी "जय जवान, जय किसान' अशी घोषणा दिली.
सारा देश सैनिकांच्या पाठीशी उभा राहिला. सर्व देशात चैतन्य पसरले. याच शक्तीच्या बळावर भारताने युद्धात पाकिस्तानला चारी मुंड्या चीत केले. पाकिस्तानचा मोठा भूभाग ताब्यात घेऊन एकतर्फी युद्धबंदी जाहीर केली. पाकिस्तानचा युद्धात दारुण पराभव झाला. सर्व जगात त्याची नाचक्की झाली आणि मग पाकिस्तानचे डोळे उघडले. शास्त्रीजींच्या नेतृत्वाखाली भारताला देदीप्यमान विजय मिळाला. भारतवासीयांनी शास्त्रीजींचा जयजयकार केला.
पुढे भारत आणि पाकिस्तान यांच्यात रशियातील ताश्कंद येथे १० जानेवारी १९६६ रोजी शांतता करार झाला. पण शास्त्रीजींना विजयाचे सुख लाभले नाही. त्याच रात्री ताश्कंद येथे त्यांचे दुःखद निधन झाले.
विजयाच्या तेजाने तळपणारा भारतीय तारा अकस्मात अंतर्धान पावला. लालबहादूर शास्त्री 'भारतरत्न' ठरले. अशा शास्त्रीजींना आमचे शतशः प्रणाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत