pandit jawaharlal nehru information in marathi
information 1 600 words
काही व्यक्तिमत्त्वेच लोकोत्तर असतात. पंडित जवाहरलाल नेहरू हे त्यांच्यापैकीच एक होत. त्यांनी भारताच्या इतिहासातील काही सोनेरी पाने लिहिली आहेत. पंडित नेहरू हे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान होत. त्यांच्यामुळे पंतप्रधानपदाला ऐश्वर्य प्राप्त झाले असे म्हणता येईल. पंडितजींचा जन्म अलाहाबाद येथे १४ नोव्हेंबर १८८९ ला एका काश्मिरी ब्राह्मण कुटुंबात झाला. त्यांचे वडील मोतीलाल नेहरू हे प्रसिद्ध वकील होते. त्यांच्या आईचे नाव स्वरुपराणी होते.
जवाहरचे बालपण राजपुत्राप्रमाणे ऐश्वर्यात, लाडाकोडात गेले. त्यांचे घर आनंदभवन' ही किल्ल्यासारखी प्रचंड वास्तू होती. पुढे हे घर देशासाठी लढणाऱ्या क्रांतिकारकांना देऊन टाकण्यात आले. त्याचे स्वराज्यभवन ' असे नाव ठेवण्यात आले.
pandit-jawaharlal-nehru-information-in-marathi |
जवाहरचे प्राथमिक शिक्षण घरीच झाले. पढील शिक्षणासाठी त्याला १९०५ मध्ये लंडनजवळ असलेल्या हरो येथील पब्लिक स्कूलमध्ये पाठवण्यात आले. पुढे केंब्रिज येथे त्यांनी तीन वर्षे शिक्षण घेतले. येथे त्यांनी विज्ञान शाखेतील पदवी घेतली. या काळात त्यांनी खूप अभ्यास केला, खूप मित्र जोडले, खूप वाचन केले. १९१२ ला ते बॅरिस्टर झाले व भारतात परतले. पण ते वकिलीत रमले नाहीत.
१९१६ मध्ये त्यांचे कमला कौल यांच्याशी लग्न झाले. याचवर्षी लखनौ येथे काँग्रेसच्या अधिवेशनामध्ये त्यांना गांधीजींचे दर्शन घडले आणि त्यांची पावले गांधीजींच्या मार्गावरून वाटचाल करू लागली. 'रॉलट अॅक्ट ' विरुद्धच्या सत्याग्रहात नेहरूंनी गांधींबरोबर भाग घेतला, आनंदभवनकडे पाठ फिरवली. मोतीलालनाही गांधींची मते पटू लागली आणि नेहरू पितापुत्रांनी ऐष आरामी राहणी सोडून दिली आणि असहकारितेच्या चळवळीत उडी घेतली.
१९२९ साली जवाहरलाल काँग्रेसचे अध्यक्ष बनले. लखनौ, फैजपूर येथीलही काँग्रेसचे ते अध्यक्ष बनले. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी अनेकवेळा तुरुंगवास भोगला. तुरुंगात त्यांनी लिहिलेले 'भारताचा शोध', 'आत्मकथा ', ' जागतिक इतिहासाचे दर्शन' असे ग्रंथ फार प्रसिद्ध आहेत. जवळ जवळ ३० वर्षे त्यांचा स्वातंत्र्य लढ्यात सहभाग होता. १९४५ साली सुभाषबाबूंच्या आझाद हिंद सेनेच्या नेत्यांवरील खटला पंडित नेहरूनी चालविला.
१५ ऑगस्ट १९४७ ला भारताला स्वातंत्र्य प्राप्त झाले आणि पंडित नेहरू भारताचे पहिले पंतप्रधान बनले. स्वराज्याची सूत्रे त्यानंतर १७ वर्षे त्यांच्या हाती होती, हे भारताचे भाग्य होय. या काळात भारताच्या समृद्धीसाठी व उज्ज्वल भविष्यासाठी त्यांनी सतत प्रयत्न केले. भारताच्या संरक्षणाचा पाया भक्कम करण्यासाठी त्यांनी जे प्रचंड औद्योगिक साम्राज्य उभे केले, त्याचा लाभ १९७१ मधील भारत-पाक युद्धाच्यावेळी दिसून आला. अशा त-हेची दूरदृष्टी त्यांनी नेहमी बाळगली.
नेहरूनी देशाला विज्ञाननिष्ठा दिली. भाक्रानानगल, दामोदर व्हॅली यासारखी प्रचंड धरणे बांधली. त्यांना ते विज्ञान युगातील तीर्थस्थाने ' असे म्हणत. भारताचे पंतप्रधान होताच सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आंतरराष्ट्रीय, आरोग्य, संरक्षण अशा सर्व क्षेत्रात नवनव्या कल्पना अंमलात आणण्यासाठी त्यांनी कार्यक्षम माणसे नेमली आणि राजकीय क्षेत्रात निष्ठा, चारित्र्य, कळकळ इत्यादि गुणांनी आपली चांगलीच छाप पाडली. काश्मीरबाबतचा तंटा, चीनची भारतावरील चढाई इत्यादि अपयश पचवूनही ते जीवनाच्या अंतिम क्षणापर्यंत देशाच्या उन्नतीसाठीच झटत राहिले.
देशाबरोबरच ते विश्वाचीही चिंता करीत होते. 'पंचशील' ही नेहरूंनी जगाला दिलेली देणगी आहे. निरनिराळ्या देशांमधील भांडणे थांबून आंतरराष्ट्रीय पातळीवर शांतता नांदावी यासाठी ते प्रयत्नशील होते. सोविएत रशियाबरोबर मैत्रीपूर्ण संबंध निर्माण करण्यात त्यांनी पुढाकार घेतला. नोव्हेंबर १९८६ मध्ये भारत व रशिया यांच्यात अण्वस्त्रे न बाळगण्याबाबत दिल्ली करार झाला. यामागे अणु-युद्धाच्या धोक्यापासून जगाचा बचाव
करण्याचा उदात्त हेतू होता.
जगातील अनेक देशांना त्यांनी भेटी दिल्या. १९६१ मध्ये 'यूनो' च्या आमसभेत भाषण दिले. त्यांनी आपल्या कारकिर्दीमध्ये देशाला आंतरराष्ट्रीय प्रतिष्ठा मिळवून दिली. विश्वबंधुत्त्वाचा पुरस्कार करणारा नेता, असा परदेशी लोकांकडूनही त्यांचा गौरव केला जातो. 'जागतिक शांतता निर्माण करु शकणारा एकमेव नेता' अशी त्यांची प्रतिमा तयार झाली होती. या जागतिक कीर्तीच्या शांतताप्रिय नेत्याला १९५५ मध्ये 'भारतरत्न' अशी पदवी देण्यात आली. लोकशाहीवर श्रद्धा, राजकारणात धर्मनिरपेक्षता, जनहितांची कळकळ, त्याग, भावना अशा अनेक गोष्टी त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एकवटलेल्या होत्या. त्याचबरोबर मुलांचे 'चाचा नेहरू ' हा त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा एक लोभस पैलू होता.
मुलांच्या मेळाव्यात ते आनंदाने रंगून जात. लहान मुले ही राष्ट्राची अनमोल देणगी असते, असे त्यांचे मत होते. त्यामुळे मुलांचे कल्याण साधणारे अनेक उपक्रम ते राबवीत असत. अशा या नवभारताच्या शिल्पकाराचे २६ मे १९६४ रोजी निधन झाले. एक थोर विज्ञानाचा उपासक, आंतरराष्ट्रीय कीर्तीचा नेता स्वर्गवासी झाला. एका भाग्यशाली युगाचा अस्त झाला. त्यांनी आपले अंतिम इच्छा पत्र लिहून ठेवले होते. “माझ्या देहाचे दहन करा आणि त्यातील मूठभर रक्षा गंगेत विसर्जित करावी आणि उरलेली राख विमानातून माझ्या भारतभूवर विखरुन टाकावी.' ही त्यांची अखेरची इच्छा अत्यंत श्रद्धापूर्वक पूर्ण करण्यात आली. भारतमय झालेले पंडित नेहरू हे स्वप्न अखेर विलयाला गेले.
information 2 2400 words
काश्मीरचे कौल नेहरू झाले काश्मीर हा भारताने आपल्या मस्तकी धारण केलेला सुंदर आणि सुबक परिसर जणू काही भारताचा नयनमनोहारी असा असा मुकुटच म्हणावा लागेल. इतकं काश्मीरमधील निसर्गसौंदर्य अप्रतिम आहे.
सुगंधी केशराच्या शेतावरून वाहणारा गंधवारा आणि इथली चिनार वृक्षांची गर्द बने व त्यांची दाट सुखावणारी सावली. त्याच्यानैसर्गिक सौंदर्यात भर घालणाऱ्या इथल्या दऱ्या आणि दऱ्याखोऱ्यात फुलणारी रंगीबेरंगी विविध फुले. या फुलांचा दरवळणारा सुवास काश्मिरवासियांची मने अजून ताजीतवानी करतो. इथल्या उंचसखाल भूमीवरचे निळे मोकळे आकाश आणि सोबतीला झेलम नदीचा शांत, संथ पाण्याचा परिसर. या झेलम नदीच्या पाण्याच्या स्वच्छ आरशात ज्यावेळी काश्मीर आपलेच प्रतिबिंब न्याहाळते तेव्हा ते हरखून जाते कारण चांदीचा रंग घेऊन ओढयाचे पाणी डोंगरदऱ्यातून खळाळत धावते.
या खळखळत्या पाण्यासारखाच उत्साह आणि सुंदरतेचे लेणे लाभलेल्या काश्मीरच्या धरतीची लेकरेही त्याच सौंदर्याचे, उत्साहाचे वरदान घेऊन जन्माला येतात. काश्मीरचे असेच एक राजकौल घराणे. घराचे सौंदर्य केवळ सुकुमारतेचेच वरदान घेऊन जन्माला येथे आले नव्हते तरपांडित्याचा आणि व्यवहार कौशल्याचा वारसा या घराण्याला होता. या घराण्याला सद्गुणांचे जणू जन्मजात देणेच लाभले होते म्हणा ना ! पंडित राजकौल हे संस्कृत आणि फारसी भाषेचे व्युत्पन्न पंडित होते. त्यावेळी दिल्लीच्या फरूखशिअर बादशहाच्या दरबारातील मानाचे पान म्हणून पंडित राजकौल यांचे नाव घेतले जायचे.
राजकौल यांच्या कौल घराण्याला शाही दिल्लीत राहाण्यासाठी दिलेले आलिशान भवन होते. एका सुंदर खळाळत्या कालव्या शेजारी हे घर होते. कालवा म्हणजे नहर बरं का! दिल्लीकडील लोक छोट्या कालव्याला नहर म्हणतात आणि या नहराशेजारी राजकौल राहात होते पण पुढे त्यांचे राजकौल हे नाव बदलून लोक त्यांना 'नेहरु' कधी म्हणून लागले हे कोणाला कळलेच नाही इतके नेहरु नाव अंगवळणी पडले.कौल घराण्याचे नामांतर नेहरू झाले ते असे. फरूखशिअर बादशहाच्या मर्जीतील मानाचे मनसबदार म्हणून राजकौल यांना लौकिक होता. त्यांची जहागीरीही होती. कौल म्हणजेच हे नेहरू घराणे. सर्व लोकांच्या आदराचे स्थान होते. राजमान्यतेबरोबर या घराला लोकमान्यताही होती.
पुढे या देशावर इंग्रजी राजवट आली. आपल्या देशावर पारतंत्र्याचे जाळे टाकणाऱ्या इंग्रजांना हटविण्यासाठी या देशात १८५७ चा स्वातंत्र्यसंग्राम झाला. या स्वातंत्र्य समरात दिल्लीच्या शेवटच्या बादशहाने म्हणजेच बहादुरशहा जफरने राष्ट्रप्रेमाने प्रेरित होऊन उडी टाकली होती . त्या स्वातंत्र्य समरात अवघी दिल्ली पेटली . अनेक कत्तली झाल्या. रक्ताचे पाट वाहिले. आणि अवघी दिल्ली बेचिराख झाली.
दिल्लीचा शहेनशहा बहादूरशहा जफर याचा इंग्रजांनी पराभव केला आणि तो बेघर झाला. राजकौलाचे नाव सांगणारे नेहरू घराण्याचा आणि दिल्लीचा संबंध जवळ जवळ संपलाच. नेहरू घराणे दिल्लीहून आगऱ्याला रवाना आले. दिल्ली सोडण्यापूर्वी राजकौल म्हणजेच नेहरु यांच्या घराण्यातील गंगाधर नेहरू हे दिल्लीला कोतवाल म्हणून काम पहात होते. कोतवाल गंगाधर नेहरु यांचा संसार सुखाचा झाला. पुढे त्यांना तीन मुले झाली. मोठा बन्सीधर नेहरू, मधला नंदलाल नेहरू. धाकटा मोतीलाल नेहरु.
त्यावेळी दिल्लीची सल्तनत चाकरमानी झाली होती. कोतवाल गंगाधर नेहरू यांचा मोठा मुलगा बन्सीधर नेहरु हाताशी आला. मोठा झाल्यावर तो न्यायालयात काम करु लागला. मधल्या नंदलाल नेहरूला खतडी नावाच्या संस्थानचे दिवाणपद मिळाले. तो मोठ्या खुशीने हे काम करीत होता. त्याचसुमारास कोतवाल गंगाधर नेहरू आपल्या दिल्लीच्या कोतवालीच्या नोकरीतून निवृत्त झाले होते.
बादशहा फरूखशिअर याच्या दरबारातील पंडित राजकौल यांच्या मानसन्मानाच्या कथा गंगाधरपंतांनी ऐकल्या होत्या. दिल्लीचा शेवटचा बादशहा बहादूरशहा जफर झाला.पणइंग्रजांविरुध्द लढताना त्याच्या हालअपेष्टांच्या, वेदनांच्या व्यथाही गंगाधरपंतांनी ऐकल्या होत्या.१८५७ च्या स्वातंत्र्य समरात हरलेल्या दिल्लीच्या असहाय्य वेदनाही त्यांनी ऐकल्या होत्या. इंग्रज सैनिकांनी पेटवलेल्या दिल्लीच्या आकाशाला भिडणाऱ्या ज्वालाही कोतवाल गंगाधर नेहरुंनी पाहिल्या होत्या. नंतर त्यांनी दिल्ली सोडली तरी त्यांना आग्रयातही त्या दरबारच्या ऐकिवातील आठवणी सतावू लागल्या. आग्रा येथे स्थायिक झालेल्या गंगाधर नेहरूंचा या आठवणी काढणे हाच आनंदाचा ठेवा होता. थोडक्यात हेच त्यांचे आनंद निधान होते.
मोठा हळूहळू बन्सीधर आणि दुसरा नंदलाल यांचे कर्तृत्व आकाराला येत होते पण आकस्मिकपणे एक वाईट घटना घडली ती म्हणजे गंगाधर नेहरू यांचे निधन झाले. त्यावेळी त्यांची पत्नी गरोदर होती.गंगाधर पंतांच्या निधनानंतर अवघ्या तीनच महिन्यांनी म्हणजे ६ मे १८६१ रोजी गंगाधर नेहरूंच्या विधवा पत्नीच्या पोटी बाळ जन्माला आले त्यांचे नाव मोतीलाल ठेवण्यात आले कारण गंगाधर नेहरूंची तशी इच्छा होती. अशाप्रकारे पित्याचे छत्र जन्मतःच हरपलेले गंगाधर नेहरुंचे तिसरे अपत्य म्हणजे मोतीलाल नेहरु होय.
भाग्यशाली पितापुत्र मोतीलाल नेहरूंच्या शिक्षणाची जबाबदारी दोन मोठ्या भावांवर पडली. मोतीलाल नेहरू जन्मत:च हुषार, कल्पक, कुशाग्र बुध्दिचे होते. त्यांची इच्छाशक्ती जबरदस्त होती. शालेय व महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण करुन मोतीलाल वकिलीच्या परीक्षेत प्रथम आले. उत्तर प्रदेशाची वकिली करण्यासाठी मोतीलाल अलाहाबाद येथे गेले.
बघता बघता अलाहाबाद येथे मोतीलाल नेहरूंच्या वकिलीने जोर धरला. अलाहाबादमध्ये ते लोकप्रिय व नावाजलेले वकील म्हणून ओळखू जाऊ लागले. उत्तम वकील म्हणून मोतीलाल नेहरूंचे नाव दिल्ली, मुंबई, कलकत्याच्या कोर्टातही गाजू लागले. इंग्रज सरकारचाही मान नेहरु ठेवीत. काही वर्षातच त्यांचा विवाह स्वरुपराणी नामकमहिलेशी झाला. स्वरूपराणी खूप आतिथ्यशील होती. नेहरुंचे घर नेहमी कलाकार, साहित्यिकांनी गजबजलेले असे. मोतीलाल नेहरू यांचे घर बड्या बड्यांचे भारतीय संस्थानिक, इंग्रज अधिकाऱ्यांचे आतिथ्य करणारे घर होते.
मोतीलाल आणि स्वरूपराणी हे आतिथ्यशील असेच जोडपे होते.
१४ नोव्हेंबर १८८९ या दिवशी मोतीलालना एक अपत्य झाले त्याचे नाव जवाहर ठेवण्यात आले. नेहरुंच्या पायगुणाने त्यांच्या जन्मानंतर दोनच दिवसांनी मोतीलाल नेहरू यांनी उच्च न्यायालयातील एक खटला जिंकला.
जवाहरचे बा लपण जवाहर खूप लाडा कौतुकात वाढत होता. त्याचा सांभाळ करायला हुषार दाया होत्या. छोटा जवाहर सगळ्यांचाच लाडका होता.
लहानपणी जवाहर हट्टी व खेळकर होता. जवाहरलला शिकवायला मुन्शी मुबारक अली नावाचे एक विद्वान शिक्षक घरी येत. ते जवाहरला नितीबोधपर कथा सांगत तसेच त्याची आई व मावशीही रामायण महाभारतातील गोष्टी सांगे. जवाहरनेही वकील व्हावं अशी मोतीलालजींची इच्छा होती. यासाठी जवाहरलला शिकवण्यासाठी त्यांनी एफ्.टी. ब्रुक नामक शिक्षकाची नेमणूक केली होती. त्यांनी जवाहरलला वाचनाची आणि विज्ञानाची गोडी लावली. जवाहरचं बरंचसं शिक्षण घरीच झालं.
मोतीलालजींनी नेहरुला लहानपणी पोहायला, घोड्यावरुन रपेट करायला शिकवलं तसंच त्याला व्यायाम व योगासनं करण्याचीही गोडी लावली. छोटा जवाहर दिवसेंदिवस गोंडस दिसू लागला. बुध्दिमत्तेची चमक त्याच्या चेहऱ्यावर झळकू लागली.
शालेय व महाविद्यालयीन शिक्षण १९०५ साली १६ व्या वर्षी जवाहर इंग्लंडमधील 'हॅरो स्कूलमध्ये जाऊ लागला. श्रीमंतांची मुले इथे शिक्षण घेत असत. या शाळेत जवाहर एक बुध्दिमान विद्यार्थी म्हणून ओळखू जाऊ लागला. याच शाळेत त्याला त्याच्या बुध्दिमत्तेबद्दल, चांगल्या अभ्यासाबद्दल त्याला गॅरिबाल्डी नेत्याचा चरित्रग्रंथ बक्षीस देण्यात आला.
पुढे ट्रिनिटी कॉलेजमधून पदवी घेऊन १९१० साली ते बाहेर पडले. इनरटेंपल या इंग्लंडच्या विद्यापीठात त्यांनी वकिलीचा अभ्यास सुरु झाला आणि १९१२ मध्ये बार अॅट लॉ उत्तीर्ण होऊन ते बॅरिस्टर झाले.
शिक्षण चालू असताना ते सतत इतर वाचन करीत होते. केंब्रिजला तर ते समाजवादाकडे आकर्षित झाले त्याचबरोबर भारताकडेही त्यांचे लक्ष होते. ते स्वदेशाच्या विचाराने तात्काळ मायदेशी परतले. नेहरूंवर पश्चिम संस्कृतीचा पगडा अजिबात बसला नाही. पुढे आय.सी. एस. होऊन त्यांनी बुध्दिमत्तेची चुणूक दाखवली.
राजकारणाचा प्रभाव इ.स. १९१२ सालातील गोष्ट. बिहारमधील बांकीपूर गावात कै. गोपाळकृष्ण गोखल्यांचं एके दिवशी व्याख्यान होतं. गोपाळकृष्ण गोखले एक मोठे देशभक्त अशी त्यांची ख्याती नेहरुंनी ऐकली होती म्हणून आवर्जून ते त्यांच्या व्याख्यानाला गेले. त्यांच्या देशप्रेमाने नेहरु भारावून गेले. त्यांच्या व्याख्यानाचा सखोल परिणाम नेहरुंच्या मनावर झाला. त्यांनी त्याचक्षणी राजकारणात प्रवेश करण्याचे ठरवले. १९१६ साली होमरुलची चळवळ सुरु झाली.
तेव्हा जवाहरलाल नेहरु अवघे २७ वर्षाचे होते. काँग्रेसची अधिवेशनं भरु लागली. हिंदुमुस्लीम ऐक्याचा ठराव संमत झाला. मवाळ आणि जहाल पक्ष एकत्र आले. लोकमान्य टिळक आणि म. गांधींची भाषणे अनेकठिकाणी होत होती. नेहरुंची आणि लो. टिळकांची भेट झाली. त्यांच्याही देशप्रेमाने नेहरु प्रभावित झाले. ते अधिकच राजकारणात समरस होऊ लागले. होमरुल चळवळ संपली नि १९१९ साली जालियनवाला बाग चळवळ सुरु झाली. या चळवळीने आता उग्र रुप धारण केले होते. नेहरुंनी जालियनवाला बागेतील हत्याकांडाचा अहवाल तयार केला आणि सरकारची चांगलीच कानउघाडणी केली.
इ.स.१९२० साली नेहरुंनी आपला वकिलीचा व्यवसाय सोडून दिला आणिस्वतःला देशकार्याला वाहून घेतलं. नेहरु घराण्याची प्रतिष्ठा आणि बुध्दिमत्तेच्या जोरावर जवाहर खरं तर खूप श्रीमंत होऊ शकला असता पण नेहरूंनी तो मोह टाळला. देशप्रेमासाठी व देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी संपत्तीचा त्याग केला. ब्रिटीशांनी केलेले कायदे मोडून त्यांच्याशी असहकार पुकारणं हे गांधीजीचं धोरण होतं. १९२० साली गांधीजींनी सत्याग्रह मोहिम सुरु केली. नेहरूंनीही त्यांना साथ दिली. साऱ्या नेहरु कुटुंबाने या मोहिमेला वाहून घेतलं.
आपले स्वप्न जवाहर पूर्ण करणार असे मोतीलालजींना वाटू लागले आणि खरोखरच जवाहरची वाटचाल त्याच दिशेने होती.
इ.स.१९२३ साली तें काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस झाले आणि त्यामुळे त्यांना संघटनात्मक कार्याचा अनुभव मिळू लागला. ह्याच वर्षी त्यांनी पंजाबांतील नाभा संस्थानांत प्रवेश केला. व तेथील शिखांवर घडलेल्या अत्याचाराची माहिती मिळवली. पण त्यांना अटक करण्यांत आली आणि काही काळ कारावासही भोगावा लागला.
१९२७साली ते ऑल इंडिया ट्रेड युनियनचे अध्यक्ष निवडले गेले. याच वर्षी मद्रास येथे अधिवेशनांत त्यांनी देशस्वातंत्र्याचं ध्येय जाहीर केलं.
१९२९ साली जवाहर काँग्रेसचे अध्यक्ष झाले. १९१६ ते १९३१ या काळांत जवाहरलाल आणि गांधीजी यांचे राजकीयसंबंध अधिकच जवळचे झाले. याच वर्षी नेहरुंनी नागरिकांच्या मूलभूत हक्कांची सनद सम्मत केली.
१९३०साली कायदेभंगाच्या चळवळीत भाग घेतल्यामुळं जवाहरलालना कैद झाली. तिथूनसुटून आल्यावर सरकारनं त्यांना शिक्षणमंत्री पद देण्याचा प्रयत्न केला, पण नेहरूनी ते नाकारले. आपल्या देशसेवेच्या कार्यापासून ते ढळले नाहीत. जगाच्या न्यायासनासमोर ब्रिटिश साम्राज्य अपराधीच १९४०साली वैयक्तिक सत्याग्रहांत भाग घेतल्याबद्दल नेहरूंना पुन्हा एकदां अटक करण्यांत आली.
त्यावेळी कोर्टासमोर केलेल्या भाषणांत नेहरू म्हणाले, “न्यायाधीश महाराज, मी आपणांसमोर तुमच्या दृष्टीनं गुन्हेगार या नात्यानं उभा आहे. पण जगाच्या न्यायासनासमोर मात्र ब्रिटिश साम्राज्यच आज अपराधी म्हणून उभं आहे !'
क्विट इंडिया चळवळ १९४२ साल उजाडलं. हिंदी स्वातंत्र्याच्या चळवळीचा दैदिप्यमान इतिहास सुरू झाला, 'भारत छोडो' चं आंदोलन सुरू झालं आणि जनतेचा प्रतिकार उग्र रूप धारण करूं लागला. गांधीजींनी करेंगे या मरेंगे' हा एकच महामंत्र लोकांना दिला आणि काही काळ तरी जहाल आणि मवाळ हे शब्दच ऐकू येईनासे झाले, दहशतवादी आणि सत्याग्रही, दोघेही एकाच जिद्दीनं सरकारशी झुंज देऊ लागले. ह्या चळवळीच्या पहिल्याच दिवशी म्हणजे ९ ऑगस्टला महात्मा गांधी, पं. नेहरू वगैरे पुढायांना अटक करण्यात आली. त्यामुळे आगीत तेल ओतल्याप्रमाणं झालं. सारा देश तळापासून ढवळून निघाला.
काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत 'क्वीट इंडिया' ची एकच घोषणा आकाशामध्ये दुमदुमू लागली. 'ब्रिटिशांनो, चले जाव!' चे पडसाद उमटूं लागले. ह्या सुमारास नेहरूंना परत अटक करण्यात आली नि त्यांना अहमदनगरच्या किल्लयांतठेवण्यात आले. आतापर्यंत त्यांनी नऊ वेळां अटक आणि अकरा वर्ष तुरुंगवास भोगला होता. ह्यावेळी ते आपल्या क्रांतिकारक जीवनांतील अखेरचा खडतर कारावास भोगत होते.
शेवटी ब्रिटीश सरकारला शहाणपण सुचलं. लोकांचा प्रक्षोभ पाहून त्यानं १९४५साली सर्व पुढाऱ्यांना सोडून दिलं. प्राण पणाला लावून ब्रिटीश साम्राज्यशाहीशी झुंज देणारे हे सारे नेते जेव्हां बाहेर आले तेव्हां लोकांच्या आनंदास पारावार राहिला नाही. त्यांनी गगनभेदी जयजयकार केला आणि गुलाल उधळून व पुष्पमाला बहाल करून आपल्या वीरांचं स्वागत केलं. भारत स्वतंत्र झाला - लवकरच १९४७ साल उजाडलं. पंधरा
ऑगस्ट या दिवशी बारा वाजता हिंदुस्थानव पाकिस्तान या दोन देशांना स्वातंत्र्य मिळाल्याचं जाहीर करण्यांत आलं.
१५ ऑगस्ट १९४७! सोन्याच्या अक्षरांनी लिहून ठेवण्यासारखा दिवस!- त्या दिवशी भारताला स्वातंत्र्य मिळालं. ज्या एका उदात्त ध्येयासाठी असंख्य क्रांतीकारकांनी अतोनात कष्ट सहन केले, कारावास भोगले आणि प्रसंगी प्राणाचं मोलही दिलं त्याचं चीज झालं होतं. आणि याच दिवशी स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान म्हणून पंडित जवाहरलाल मोतिलाल नेहरू यांची नेमणूक करण्यात आली.
पंतप्रधानपदाची धुरा पंडित नेहरूंनी आपल्यावरील जबाबदारी पूर्णपणे ओळखून देशाचा कारभार बघायला सुरुवात केली. पंतप्रधान झाल्यावर त्यांच्या एकूण धकाधकीच्या राजकीय जीवनाला सुरवात झाली. हा थोर पंतप्रधान विचारांनी आणि कृतीने पुरोगामी होता. अंध श्रद्धेपेक्षा बुद्धिवादावर भर देणारा आणि कर्मठपणापेक्षा माणुसकीला जपणारा असा हा पंतप्रधान जिथं जिथं त्यांना अन्याय दिसला, अपमान आढळला आणि फसवणूक जाणवली तिथं तिथं ते वाघाच्या तडफेनं पंतप्रधान असताना तुटून पडले आणि माणुसकीच्या रक्षणासाठी त्यांनी जिवाचं रान केलं. ते निर्भिड बाण्याचे पंतप्रधान होते.
त्यांना दलित आणि पीडीत जनतेबद्दल मनापासून सहानुभूति वाटत असे, दुःखितांचे अश्रू पाहून नेहरुंच्या मनांत कालवाकालव होत असे. नेहरूंनी त्यांच्या दुःखाचं मूळच नष्ट करण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी त्यांनी 'नियोजना'ची कास धरली. निरनिराळ्या योजना आखल्या आणि देशांतील श्रमशक्तीचा योग्य वापर करून देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न केला. जगाच्या राजकारणालाही आपल्या स्वतंत्र विचारांची देणगी पंतप्रधान नेहरूंनी दिलेली आहे. प्रत्येक देशाचा सार्वभौम अधिकार मान्य करणारं पंचशीलेचं तत्त्वज्ञान हे देखील नेहरूंनी जगाला दिलेलं एक महान् असं तत्त्वज्ञान होय.
तुरुंगात असताना लेखन वाचनाचा छंद पंडित जवाहरलाल नेहरू हे जसे थोरराजकारणी होते तसेच श्रेष्ठ लेखकही होते. जॉन गंथर नांवाच्या एका अमेरिकन पत्रपंडितानं, जगांतील श्रेष्ठ अशा दहा इंग्रज ग्रंथकारांमध्ये त्यांची गणना केली आहे. . पंडितजींनी आपलं बरंचसं लेखन तुरुंगामधेच केलेलं आहे. ब्रिटीश सरकारनं त्यांना अटक करून जवळ जवळ आठदहा वर्षाची सक्तीची विश्रांती दिली म्हणून तर हे शक्य झालं.
त्यांना वाचनाचा दांडगा नाद, अहमदनगरच्या तुरुंगांत असते वेळी तीन वर्षांच्या मुदतीत त्यांनी जवळ जवळ एक हजार पुस्तक वाचून काढली. तुरुंगामधील वास्तव्यांत त्यांनी मोठमोठ्या ग्रंथाचं वाचन केलं, त्यावर चिंतन केलं आणि आपले विचार लेखनबद्ध केले. म्हणूनच त्यांना 'ग्लिप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी', 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' या सारखे महान् ग्रंथ लिहिता आले. नेहरुंची साहित्यसंपदा पंडित नेहरूचं लिखाण अतिशय सुबोध असं आहे.आपुलकी आणि जिव्हाळा हा त्यांच्या लेखन शैलीचा गुण आहे. ते भाषेचे शिल्पकार आहेत. शब्दांचा योग्य वापर कसा करावा हे त्यांना फार चांगलं कळलं होतं.
कल्पनांची आतषबाजी किंवा शब्दांचा फापटपसारा त्यांच्या लेखनात कुठंही आढळणार नाही. त्यांचे आत्मचरित्र तर जगामधील थोर वाङमयात गणलं जातं!
'ग्लिंप्सेस ऑफ वर्ल्ड हिस्टरी' म्हणजे जगाच्या इतिहासाची झलक आणि 'डिस्कव्हरी ऑफ इंडिया' म्हणजे भारताचा शोध. पहिला ग्रंथ त्यांनी पत्रात्मक पद्धतीनं लिहिला आहे. ह्या ग्रंथामधून निरनिराळ्या पत्राद्वारे त्यांनी जगाचा इतिहास आपल्या प्रिय कन्येला समजावून दिला आहे. इंदिरेला जी गोडी प्राप्त झाली आहे तीच गोडी आणि तेंच वात्सल्य नेहरूंच्या प्रत्येक ग्रंथात दिसून येतं.
भारताचा शोध' हा त्यांचा ग्रंथ म्हणजे आपल्या दिव्य संस्कृतीचा इतिहासच ! त्यामध्ये त्यांनी भारतीय संस्कृतीची बैठक आणि मोठेपण यांचं विश्लेषण केलेलं आढळतं आपल्या आत्मचरित्रामध्ये त्यांनी स्वत:चाच इतिहास वर्णन केला आहे.
ह्या तीन ग्रंथांशिवाय सोव्हिएट रशियावरील त्यांचा विवेचक ग्रंथ आणि व्याख्यानांचे व स्फुट लेखांचे संग्रह ही पुस्तकं आहेतच. याशिवाय अनेक गौरव ग्रंथांत त्यांनी लिहिलेले लेख,अनेक लेखकांच्या पुस्तकांना त्यांनी लिहीलेल्या प्रस्तावना, राष्ट्रीय संयोजन समितीच्या कामकाजांवर केलेली टिपणं ही व वेळोवेळी के लेली भाषणं अशी आणखी किती तरी वाङमयीन सामुग्री अद्यापि पुस्तक रूपानं एकत्रित होऊन प्रसिद्ध व्हावयाची आहे. अगदी अलिकडे त्यांचं ‘बंच ऑफ लेटर्स' (पत्रसंग्रह) नावाचं नवीन पुस्तक प्रसिद्ध झालेलं आहे.
अलाहाबाद येथून प्रसिद्ध होणाऱ्या नॅशनल हेरॉल्डमध्ये त्यांनी अविरत आणि भरपूर लेखन केलेलं आहे.
कवी मनाचे नेहरु नेहरु वृत्तीनं तर कवीच होते. निसर्गाचं त्यांना अतिशय वेड होतं. निसर्गाच्या सान्निध्यात ते सुखावून जात. हिरवीगार डोलणारी शेतं, दऱ्याखोऱ्यातून, टेकड पहाडातून खळाळणारे झरे, आकाशात उडणारे पक्षी सारे सारे त्यांना विलोभनीय वाटे. त्यांना फुलं खूप आवडत पण लाल गुलाबाची टप्पोरी कळी त्यांना खूप भावत असे.
पटकन ते आपल्या कोटाच्या खिशात ती खोवत. मुलांचे चाचा लहान मुलं तर त्यांना अतिशय प्रिय. कितीही महत्त्वाचं काम असो अथवा मनात कितीही गहन विचार चाललेला असो, लहान मूल समोर दिसलं की नेहरूंची कळी खुललीच, हातातलं काम बाजूस ठेवून त्या मुलाला जवळ घेत, त्याचे गाल प्रेमाने दाबत, गालांचे पापे घेऊन त्यांना खाऊ देत. गुबगुबीत गालांची छोटी छोटी मुलं पाहून नेहरु एकदम खुष होऊन जात. मुलांना ही हे चाचा खूप आवडत.
लहान मुलांवरील त्यांच्या निष्कपट प्रेमामुळं ते भारतांतीलच नव्हे तर साऱ्या जगांतील मुलांचे "चाचा' बनले होते. गांधीजींनाही नेहरुंबद्दल आत्मविश्वास ३० जानेवारी १९४८ साली गांधीजींचा वध झाला. जवळ जवळ तीस वर्षांच्या सहवासांत महात्मा गांधी आणि पंडित नेहरू यांच्यामध्ये पितापुत्राचं नातं निर्माण झालं होतं. दोघांमधे प्रेमाचे नाते निर्माण झाले. याला कारण एकच. दोघांनाही देशाची चिंता होती.दोघेही कट्टर देशभक्त होते. देशभक्तीच्या या समान दुव्यामुळंच गांधीजीनी नेहरूना सावरून धरलं आणि नेहरूंनी त्यांना वडिलापेक्षाही अधिक मान दिला. म्हणूनच 'माझ्या मागून जवाहरच या देशाचा कारभार पाहिल, त्याच्या हाती देश सुरक्षित राहिल' असे उद्गार गांधीजींनी आपल्या मरणापूर्वी काढले होते आणि ते खरे
झाले.
. देशाचे शांतिदूत पंडित नेहरूंना तर प्रत्यक्ष शांतिदूत असंच म्हटलं जाई. शांतिदूत म्हणजे शांततेचा पुरस्कार करणारी व्यक्ति. जगामधे शांतता नांदावी, कुठंही लढाई झगडा होऊ नये अस नेहरूंना नेहमी वाटे. कारण लढाईच्या काळात देशामध्ये किती गडबड गोंधळ होतो, देशविकासाची कामं किती खोळंबतात आणि त्याचा परिणाम म्हणजे देशात दारिद्य येतं हे नेहरूंनी ओळखलं होतं. म्हणूनच ते जागतिक शांततेचा सतत पुरस्कार करीत राहिले. म्हणूनच रशिया आणि अमेरिका या दोन देशांनी त्यांना, "शांतिदूत'चा बहुमान दिला.
अशा रीतीने भारताच्या इतिहासात पंडित जवाहरलाल नेहरूंचं स्थान अढळ आहे. त्यांनी आपल्या विचारांनी आणि कृतींनी भारतीय जनमानसावर प्रभाव टाकला आणि आपलं स्वतःचे वेगळेपण जगापुढे दाखवलं.
नेहरूंना देवाज्ञा २७ मे १९६४ रोजी त्यांचं निधन झालं.
बुधवारी सकाळी त्यांच्या पाठीत कळ आली आणि दुपारी दोन प्रहरी त्यांचे देहावसन झालं. अगदी शांत आणि सुहास्य वदनानं ते मृत्यूला सामोरे गेले. एक तेजस्वी व्यक्तिमत्व त्या दिवशी लोप पावलं. स्वतंत्र भारताचा एक झुंजार नेता आणि जागतिक शांततेचा महान् पुरस्कर्त्याला देवाज्ञा झाली.
१५ ऑगस्ट १९४७ पासून जीवनाच्या अखेरपर्यंत ते ह्या देशाचे पंतप्रधान म्हणून काम पाहत होते. अगदी मृत्यूच्या आदल्या रात्रीपर्यंत त्यांनी ह्या देशाची सेवा केलेली आहे. नेहरूनी दाखविलेल्या मार्गानं वाटचाल करणं आणि त्याचं अपुरं राहिलेलं ध्येय पूर्ण करणं हेच आपलं कर्तव्य. "चाचा नेहरू अमर
रहे !"
कोणत्याही टिप्पण्या नाहीत