shivaji maharaj information in marathi
महाराष्ट्राचा इतिहास
फार-फार वर्षांपूर्वी महाराष्ट्राची भूमी ही दंडकारण्य म्हणून ओळखली. जायची. पण जसजसा माणसांचा वावर वाढू लागला, तस-तशी ही भूमी बहरू लागली. बाळसे धरू लागली आणि कालांतराने दंडकारण्याचा महाराष्ट्र झाला. या भूमीत संस्कृती रूजू लागली. कला, विद्या, शास्त्रे, शौर्य आणि धर्माने महाराष्ट्राची भरभराट झाली.
सातवाहन राजापासून यादव राजापर्यंत अनेक राजघराण्यांनी महाराष्ट्रात प्रजेच्या कल्याणाचा राज्यकारभार केला. राजांचा पराक्रम, संताची भक्ति गंगा, शेतकऱ्यांनी पिकविलेल्या धान्यराशींनी आणि तरुणांच्या शौर्याने महाराष्ट्र भूमी एक नंदनवन म्हणून उदयाला आली. ___ महाराष्ट्राच्या वैभवाच्या बातम्या पार दिल्लीपर्यंत पोहोचल्या. महाराष्ट्रातील देवगिरीच्या यादवांचे राज्य खूप वैभवशाली आहे, अशी कीर्ती अनेक परकीय सुलतानांच्या कानी गेली; आणि इथेच घात झाला. चंद्र-सूर्याला ग्रहण लागावे तसे झाले.
shivaji-maharaj-information-in-marathi
विंध्य पर्वताच्या बाजूने धुळीचे लोट उठले. परकीय सुलतानांच्या टोळधाडी महाराष्ट्रावर येऊन आदळल्या. त्यांच्या घोड्यांच्या टापांनी सारी भूमी रेंदाळून निघाली. लुटालूट, जाळपोळीने घरेदारे भस्मसात झाली. अनेकांची मुंडकी धडावेगळी झाली. महाराष्ट्र भूमी जणू बेचिराख झाली.
महाराष्ट्राच्या भूमीवर सुलतानी सत्ता राज्य करू लागल्या. प्रजा पोरकी झाली. गुलामीचे, हलाखीचे जीवन त्यांच्या वाट्याला आले. महाराष्ट्रावरील सुखाचा, वैभवाचा सूर्य मावळला. सारा महाराष्ट्र पारतंत्र्याच्या भयाण काळोख्या अंधारात बुडून गेला. जणू सूर्य कधी उगवणारच नव्हता. दुःखाचे, गुलामीचे जीवन कधी संपणारच नव्हते, अशी महाराष्ट्राची अवस्था झाली.
प्रजा निराश झाली. त्यांच्या आशा करपून गेल्या. पारतंत्र्याचा, दुःखाचा हा काळ कधी संपणार याची वाट पाहू लागली. तोपर्यंत सुलतानांच्या राज्यात महाराष्ट्रभूमी पोळून, होरपळून निघत होती. महाराष्ट्राचे रूपांतर जणू उजाड भूमीत झाले होते.
प्रजेच्या छळाला तर सीमा नव्हती. जुलूम, जबरदस्ती, कापा-कापी याला ऊत आला होता. आता या दुःखातून, या पारतंत्र्यातून आपली सुटका कोण करणार! प्रजा अशा तारणहाराची वाट पाहू लागली.
शिवरायांचा जन्म झाला
सगळीकडे आशा निराशेचा खेळ चालू होता. अशा वातावरणात दि. १९ फेब्रुवारी १६३० या शुभ दिवशी किल्ले शिवनेरीवर छ. शिवाजी महाराजांचा जन्म झाला आणि सगळीकडे शुभशकून होऊ लागले. दाही दिशा उजळून निघाव्या तशा महाराष्ट्राच्या आशा-आकांक्षांना पालवी फुटू लागली.
छ. शिवाजी महाराजांच्या वडिलांचे नाव शहाजीराजे. ते निजामशाहीतील एक पराक्रमी सरदार होते. आपल्या पराक्रमाच्या आणि शौर्याच्या बळावर ते निजामशाही - आदिलशाहीचे शूर सरदार म्हणून ओळखले जायचे.
छ. शिवाजी महाराजांच्या मातेचे नाव जिजाबाई. त्या सिंदखेडच्या जाधवराव या सरदार घराण्यातील लखूजी जाधवरावांच्या कन्या होत्या. शहाजीराजांशी त्यांचा विवाह झाला आणि त्या भोसले घराण्याच्या लक्ष्मी बनून वावरू लागल्या.
जिजाबाईंना सुलतानशाहीचे काळे रूप दिसत होते. कापाकापी, लुटालूट, देवालयांचा विध्वंस, आगीचे प्रलय पाहून आणि ऐकून त्यांना खूप दुःख होत होते. त्यांना अशा सुलतानशाहीचा तिटकारा येऊ लागला होता. आपल्या पोटी शूर, पराक्रमी पुत्र जन्माला यावा आणि त्याने महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करावी अशी त्यांची इच्छा होती. ___शिवरायांचा जन्म झाला आणि जिजामातेच्या आशा-आकांक्षा जागृत झाल्या. शिवराय वीरपुरुष होतील अशाप्रकारे जिजामाता त्यांना वाढवू लागल्या. शिवराय इकडे तिकडे धावू लागले. खेळू लागले. रात्र झाली की, मातेच्या कुशीत शिरून गोष्टी ऐकू लागले. जिजामाता त्यांना महाभारत, रामायण, मारुतीच्या कथा सांगू लागल्या.
दिवसा ते सवंगड्याबरोबर खेळू लागले. मातींचे किल्ले, गड, हत्ती, घोडे बनवून लुटूपुटूच्या लढाया करू लागले. जिजामाता त्यांच्या बाललीलांकडे कौतुकाने पाहू लागल्या.
शहाजीराजे नेहमीच लढाया आणि मोहिमात गुंतलेले असायचे. शिवरायांना घडविण्याची सर्व जबाबदारी जिजामातांवर येऊन पडली. शहाजीराजांनी त्यांच्यासाठी पुण्यात लालमहाल नावाचा भव्य प्रासाद बांधला. शिवराय, जिजामाता त्या भव्य प्रासादात राहू लागले. शिवरायांना युद्धकलेचे आणि राज्यकारभाराचे शिक्षण देण्याची शहाजीराजांनी व्यवस्था केली होती. ___पुण्याचा कारभार शिवरायांच्या नावाने सुरू झाला. मातोश्री जिजाबाई आणि शिवरायांचे आपल्या जहागिरीकडे बारकाईने लक्ष होते. मातोश्री जिजाबाईंचे शिवरायांच्या शिक्षणाकडेही लक्ष होते. शिवराय थोड्याच दिवसात लिहायलावाचायला शिकले. ते कुशाग्र आणि चौकस बुद्धीचे होते. __राज्यकारभारातील प्रत्येक गोष्ट जिजामाता शिवरायांना जवळ बसवून शिकवत असत. एखाद्या प्रकरणाचा न्यायनिवाडा करणे, गुन्हेगाराला शिक्षा देणे, चांगल्या कामगिरीबद्दल कोणाचे कौतुक करणे, नवीन बेत आखणे, शस्त्रे-दारुगोळ्याची तपासणी करणे, गैरशिस्तीबद्दल चौकशी करणे, थोरामोठ्यांचा आदर सत्कार करणे, अशा गोष्टी शिवराय प्रत्यक्ष शिकत होते.
शिवराय जिजामातांना अनेक प्रश्न विचारीत असत. देव-देवता, थोर पराक्रमी युगपुरुषांच्या कथा जिजामाता शिवरायांना सांगत असत.
आपले लोक, आपला मुलूख, आपला धर्म, देवळे यांची अशी दैन्यावस्था का झाली? हे हळूहळू शिवरायांना समजू लागले. 'शिवबा, ही दैन्यावस्था पाहून तुला बरे वाटते का?' असा प्रश्न जिजामाता शिवरायांना विचारायच्या. जिजामातांना सर्वजण 'आईसाहेब' असे म्हणत असत.
असे सुसंस्कार होत असताना शिवराय युद्धशास्त्रात निपुण होत होते. तलवारीचे हात, धनुर्विद्या, दांडपट्टा, घोडेस्वारी अशा कलेत शिवराय हळूहळू पारंगत झाले.
महाभारत, रामायण, भागवत यातील पराक्रमी वीर शिवरायांना सारखे आठवायचे. भीम, अर्जुन, श्रीकृष्ण, अभिमन्यू यांच्या मूर्ती त्यांच्या नजरेसमोर सतत यायच्या. थोर पुरुषांचा सहवास त्यांना आवडायचा. अशाप्रकारे शिवरायांच्या मनात भक्ती आणि शक्तीचा संगम घडून येत होता. ___अशा संस्कारांनी शिवराय घडत होते. वाढत होते. राजकारणाचे धडे गिरवीत होते. तरुण सवंगडी जमवीत होते. आपला मुलूख हिंडून बघत होते. सुलतानांची जुलूमशाही, अन्याय, अत्याचार पाहत होते. त्वेषाने त्यांचे रक्त सळसळू लागले होते. अशा प्रकारे शिवराय राजाला आवश्यक त्या सर्व गोष्टी आत्मसात करीत होते.
स्वाभिमान जागृत झाला
सूर्याचे तेज कोणी कोंडून ठेवू शकेल काय? शिवराय तसेच सूर्यासारखे प्रखर तेजस्वी होते. हे तेज निराळेच आहे, हे शहाजीराजांनी ओळखले. शिवबांचा जन्म वेगळ्याच कारणासाठी झाला आहे. हे त्यांनी जाणले. साऱ्या दक्षिणेची जहागिरी शिवबांना दिली. तरी शिवबा सुलतानांना शरण जाणार नाही की, त्यांच्या गुलामगिरीत राहणार नाही याची जाणीव शहाजीराजांना झाली होती. ___शिवराय आणखी थोडे मोठे होताच ते आपल्या सहकाऱ्यांबरोबर सहााद्रीच्या दऱ्याखोऱ्यात फिरू लागले. महाराष्ट्राचे बळ सहाद्रीत आहे. येथील मावळ्यांना एकत्र करून निष्ठेने त्यांना आपलेसे केले तर, सुलतान, बादशहालाच काय पण, कोणालाही हा महाराष्ट्र अजिंक्य आहे, हे ध्यानी घेऊन ते कामाला लागले. थोड्याच काळात सारा मावळ प्रदेश शिवरायांना मानू लागला.
मावळातले जवान, काटक, चिवट तरुण शिवरायांनी आपल्याभोवती गोळा केले. त्यांची नावे तरी किती सांगावीत? जणू सारे मावळातले जवान शिवरायांच्या पाठीशी उभे राहिले. ती सारी दोस्तसेना लालमहालात आली. जिजामाता त्यांनाही आपल्याच मुलांप्रमाणे वागवू लागल्या. त्यांना उपदेश करू लागल्या. माया, प्रेम देऊ लागल्या.
आपल्या सवंगड्यांना घेऊन शिवराय घोडदौड करायचे, हत्यारांचे हात करायचे. डोंगर-दऱ्या, घाट, चोरवाटा, गडकिल्ले हिंडून पहायचे. हळूहळू हे सवंगडी शिवरायांच्या जीवाला जीव देण्यास तयार झाले. वाटेल तो त्याग करण्यास सिद्ध झाले. शिवराय म्हणजे त्यांना जणू शिवाचा अवतार भासू लागले. तर दिल्लीचा बादशहा आणि दक्षिणेतले सुलतान राक्षसासारखे दिसू लागले. राज्य शिवरायांनीच करावे असे त्यांना वाटू लागले. __ गुप्त खलबते होत होती. स्वराज्याचे मनसुबे रचले जात होते. पुण्याभोवतालची खडान्खडा माहिती शिवरायांनी करून घेतली होती. चोरवाटा, हत्यारे, दारुगोळा, बादशाही फौजेचे तळ, त्यांचे सैन्य, त्यांची ठाणी, त्यांचे पहारे हे सर्व त्यांना माहीत झाले होते. बादशहाच्या मुलखातून आपलाच असलेला मुलूख हिसकावून घेऊन, स्वराज्याचा पाया घालायचा होता.
शिवराय सर्वांशी गोड बोलत. प्रसन्नपणे हसत. रागावत नसत. परंतु एकदा मात्र शिवराय फारच संतापले. परस्त्रीयांना मातेसमान मानणाऱ्या शिवरायांच्या जहागिरीत एका स्त्रीवर अत्याचार झाला होता. ही खबर कानी पडताच कोणाचाही मुलाहिजा न ठेवता शिवरायांनी त्या गुन्हेगाराची रीतसर चौकशी केली. तो खरोखर दोषी आहे हे दिसताच, तो गावचा पाटील आहे हे विसरून शिवरायांनी त्याचे हात-पाय तोडण्याची शिक्षा फर्मावली. सगळीकडे जाहीर केले की, असा गुन्हा जर परत कोणी केला, तर त्याला यापेक्षाही भयानक शिक्षा दिली जाईल. त्या घटनेने लोकांना शिवरायांचा धाक वाटू लागला, तसेच त्यांच्या न्यायीपणाने लोक खूष झाले. प्रजा त्यांच्यावर पूर्वीपेक्षाही जास्त प्रेम करू लागली.
असे चालले असताना संतमंडळी लोकांना धर्माची आणि कर्तव्याची शिकवण देत होती. क्षात्रतेजाला जागृत करीत होती. _आणि एकीकडे महाराष्ट्रावर पाच सुलतानी सत्ता बळजबरीने राज्य करीत होत्या. प्रजेवर अत्याचार, जुलूम करीत होत्या.
शिवरायांना हे अत्याचार संपवायचे होते. जणू पाच अजगरांच्या विळख्यातून महाराष्ट्राला बाहेर काढायचे होते. परंतु त्यावेळी जिवाला जीव देणाऱ्या मावळ्यांशिवाय शिवरायांकडे काय होते ? सुलतानाकडे लाखोंच्या फौजा होत्या. प्रचंड दारुगोळा, शस्त्रास्त्रे होती. सर्व गड, किल्ले त्यांनी गिळले होते. सारा महाराष्ट्र आपल्या टाचांखाली रेंदाळून ठेवला होता. म्हणजेच सुलतानांच्या अफाट सामर्थ्यापुढे शिवरायांचे सामर्थ्य कितीतरी तोकडे होते.
सुलतानांच्या तोफांनी विजयनगरच्या नऊलाख फौजेचा चुराडा अवघ्या चार घटकात केला होता. अशा सुलतानी सत्ता, सामर्थ्यापुढे शिवरायांचे बळ कितीसे टिकणार? आणि तरीही शिवरायांनी एकच निर्धार केला होता. "मी स्वराज्याची स्थापना करीन! ही पवित्र भूमी परकीयांच्या हातातून सोडवीन. तेही या माझ्या निष्ठावंत सवंगड्यांच्या ताकदीवर." ____ हा विश्वास शिवरायांना आला कोठून ? हे बळ त्यांच्या अंगी आले कसे? प्रचंड आत्मविश्वास, प्रखर तळमळ, ज्वलंत अभिमान, स्वकीयांचे प्रेम ही शिवरायांची बलस्थाने होती. तीच त्यांची शक्ती होती. तेच त्यांचे सामर्थ्य होते.
तोरण्यावर भगवा फडकला शिवराय आपल्या मावळ्या सवंगड्यांसह सह्याद्रीच्या दऱ्या-खोऱ्यात हिंडत होते. विश्वास आणि कष्टाशिवाय राज्य आणि विद्या प्राप्त होत नसते, हे शिवराय जाणून होते. अढळ निष्ठा, अचूक, अविरत प्रयत्न आणि त्याग एकत्र आला तर शिवभारत निर्माण व्हायला कितीसा वेळ लागणार! आता मात्र झोकून द्यायलाच हवे, हाच विचार शिवरायांनी केला. __ स्वराज्याचे तोरण बांधायला एक तरी किल्ला आपल्या हाती हवाच. शिवरायांनी असा गड हेरून ठेवला होता. तोरणा उंच, बळकट आणि कठीण. भक्कम तट आणि बाजूने खोल दऱ्या. झुंजार माच्या. आणखी काय हवे! शिवाय तेथे शत्रूचे फारसे भय नव्हते. आणि एके दिवशी शिवराय आपल्या सवंगड्यानिशी तोरणागडावर दाखल झाले. 'हर, हर, महादेव' अशी गर्जना करीत त्यांनी स्वराज्याचा भगवा फडकावला. गडावर मावळ्यांचे चौक्या, पहारे बसले. तोरणा स्वतंत्र झाला. उण्यापुऱ्या साडेतीनशे वर्षानंतर स्वराज्याचा उष:काल झाला. नगारे आणि शिंगांच्या आवाजाने सह्याद्रीची दरी खोरी धुमली. स्वतंत्र शिवराय, स्वतंत्र मावळे, स्वतत्र भगवा झेंडा, महाराष्ट्राच्या भूमीत तोरण्याच्या रूपाने स्वातंत्र्य अवतरले. तेथील सुलतानी सत्ता उखडून फेकून देण्यात आली. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली. ____स्वराज्याचे तोरण बांधले शिवरायांनी आणि त्यांन: गडाची गहणी केली. गडाच्या दुरुस्तीस सुरुवात झाली आणि आई भवानी पावली. बुरुजाचे काम करीत असता धनाने काठोकाठ भरलेले हंडे सापडले. मोठे धन हाताशी आले. आनंदाची लाट तरळून गेली. जगदंबा भवानी शिवरायांवर प्रसन्न आहे. हे राज्य व्हावे ही तिचीच इच्छा आहे. हे धन तिनेच दिले आहे. याची सर्वांना खात्री पटली. हे धन स्वराज्याचे. महादेवाच्या चरणीच ते खर्च होणार. स्वराज्याच्या कार्यासाठीच ते उपयोगात येणार. जवळच अर्धवट बांधलेला किल्ला शिवरायांनी हेरला. तोरण्यावर मिळालेले धन नवा किल्ला बांधण्यासाठी वापरले आणि राजगड स्वराज्याच्या सेवेत दाखल झाला. उरलेले धन शस्त्रे, दारूगोळा, नवीन फौजेची उभारणी, शिबंदी यासाठी खर्च करण्यात आले.
मग शिवराय थांबलेच नाहीत. त्यांची पावले भराभर पडू लागली. मावळ खोऱ्यातील एक-एक किल्ला ते घेऊ लागले. तसा त्याभोवतालचा प्रदेश आपोआपच स्वराज्याच्या अमलाखाली आला. ___परंतु लवकरच ही बातमी विजापूरच्या आदिलशहाला समजली. आधी त्याने याकडे दुर्लक्ष केले. पण त्याचबरोबर मावळप्रांतातील लोकांकडे कडक फर्माने रवाना केली. शिवरायांची साथ सोडून शेतसारा, कर बादशाही अधिकाऱ्याकडे जमा करावा. नाहीतर एकेकाची मुंडकी धडावेगळी केली जातील असा दम भरला.
सुलतानाचे असे फतवे पाहून सर्वांच्या अंगाला कापरे भरले. जे लोक बादशहाचे ऐकत नाहीत, त्याच्या घरादाराची राखरांगोळी होते हे लोकांना माहीत होते. अशावेळी शिवरायांनी सर्वांना धीर दिला. शिवरायांच्या अशा दिलाशाने प्रजेच्या मनातील भीती दूर झाली. त्यांनी बादशाही फर्माने टरटरा फाडून चुलीत घातली. शेतसारा ते स्वराज्याच्या खजिन्यात भरू लागले. । असे सर्व चालू असता स्वराज्याची सर्व जबाबदारी शिवरायांच्याच खांद्यावर पडली होती.
याचवेळी शिवरायांची कसोटी पाहणारा प्रसंग घडला.
स्वराज्याला लागूनच जावळी प्रांत होता. तेथील सरदार चंद्रराव मोरे मरण पावले. राज्याला वारस उरला नाही. बादशहा जावळी प्रांत गिळंकृत करील अशी भीती होती. अशा कठीण प्रसंगी शिवराय मदतीला धावले. जावळीच्या सरहद्दीवर चौक्या-पहारे बसवून त्यांनी जरब बसविली. मोऱ्यांच्या वंशातील एक मुलगा निवडून त्याला गादीवर बसविले. नवे चंद्रराव मोरे जावळीचे सरदार झाले. बादशहाच्या घशात जाणारा जावळी प्रांत केवळ शिवरायांच्या मदतीमुळे, दूरदृष्टीमुळे वाचला.
आपण केलेल्या मदतीमुळे नवे चंद्रराव मोरे भविष्यात आपणाशी प्रेमाने आणि विश्वासाने वागतील, असा हेतू मनाशी बाळगून शिवरायांनी हे कार्य पार पाडले होते. यावेळी शिवराय होते अवघे सोळा वर्षांचे. एवढ्या लहान वयात केवढे हे शिवरायांचे धाडस. केवढी त्यांची दूरदृष्टी.
जावळीचा तिढा सोडवून शिवराय परत आले. त्यांच्यापुढे कितीतरी मोठी राजकारणे उभी होती. विजापूरच्या आदिलशहाने कोंढाणा किल्ल्यावर नवीन अधिकारी मियाँ रहीमची नेमणूक केली होती. हा मियाँ रहीम भविष्यात त्रासदायक ठरेल हे शिवरायांनी जाणले होते. शिवरायांना तर कोंढाणा हवा होता. पण ते शक्य होते काय?
स्वराज्यावरील पहिले संकट
राजगडाच्या बरोबर समोर, सहा कोसावर कोंढाणागड उभा होता. तो कसा घ्यायचा? त्याच्यावर कशी चढाई करायची, हे खूपच अवघड काम होते. आता शक्ती आणि युक्तीचा प्रयोग करावा, असा बेत शिवरायांनी आखला.. _ आपले विश्वासू साथीदार मुदगलांना शिवरायांनी आपल्या मनातील बेत सांगितला कोंढाण्याची खडान्खडा माहिती मुदगलांना होती. कोंढाणा घेणे म्हणजे चेष्टा नव्हती. सहा महिने लढले तरी कोंढाणा हाती लागणे कठीण. आता युक्तीने काम केल्याशिवाय कोंढाणा हाती लागणार नाही. हे शिवरायांनी आणि मुदगलांनी ओळखले. ____ अवघड कार्य पार पाडण्यासाठी जबर इच्छाशक्ती असावी लागते. शिवरायांकडे तर ती होतीच. तशा युक्तीच्याही चार गोष्टी त्यांना माहीत होत्या. त्यांनी मुदगलांच्या कानात काहीतरी सांगितले, आणि मुदगल लागले की कामाला. मुदगल गडावर गेले. गडकऱ्याशी असे गुळमट बोलू लागले की गडकरी पार विरघळला. त्याच्यावर मुदगलांनी जशी मोहिनी घातली. त्याला भुलवून, फितवून, डाव टाकून मुदगलांनी आपली माणसे घातली गडावर आणि कोंढाणा न लढताच आयताच स्वराज्यात सामील झाला. त्यावर स्वराज्याचा भगवा झेंडा फडकू लागला.
एवढे करून शिवराय थांबले नाहीत. त्यांनी त्याचवेळी आदिलशाही आमदानीतील शिरवळचा सुभानमंगळ किल्लाही युक्तीने ताब्यात घेतला. कोंढाणा तर गेलाच, पण सुभानमंगळही शिवरायांनी ताब्यात घेतला, हे पाहन मियाँ रहीम आपलीच दाढी आणि डोक्याचे केस ओढून कपाळही बडवू लागला.
हा शिवरायांना आवरायचे तरी कसे? शिवरायांना पकडले तर शहाजीराजे खवळतील आणि काय सांगावे मोगलांना जाऊन मिळतील. मोगल तर विजापूरचे राज्य. घशात घालायला टपलेलेच. अशा प्रश्नांनी विजापूरच्या आदिलशहाला भीती वाटू लागली.
म्हणून आता शहाजीराजांना प्रथम कपट करून कैद करावे म्हणजे, शिवराय आपोआप शरण येतील, असे आदिलशहाला वाटू लागले.
आणि एकेदिवशी आदिलशहाच्या कपटी काव्याने शहाजीराजे कैद झाले. त्यांना साखळदंड घालून विजापूरच्या बंदीखान्यात डांबण्यात आले. त्यावेळी इकडे राजगडावर जिजामाता, शिवराय आणि इतर मंडळी नव्या मसलती करण्यात मग्न झाली होती. आणखी नवे किल्ले कसे जिंकायचे याची गुप्त खलबते चालली होती.
परंतु शहाजीराजांना आदिलशहाने कैदेत टाकले, ही बातमी राजगडावर येताच राजगडावर अवकळा पसरली. सर्वजण चिंतेत बुडाले. शहाजीराजांच्या जीवाला धोका आहे, याची भीती सर्वांना वाटू लागली. चिंता वाढवणारी आणखी एक खबर राजगडावर आली. आदिलशहाने फत्तेखानाला मोठी फौज देऊन, स्वराज्याचा समाचार घेण्यासाठी पाठवले. या बातमीने राजगडावरील काळजीत आणखी भर पडली.
आता काय करायचे? स्वराज्यावरील हे भयाण संकट कसे थोपवायचे? असा प्रश्न सर्वांना पडला. शरण जायचे? चुकलो क्षमा करा म्हणायचे? स्वराज्य घ्या पण शहाजीराजांना सोडा असे सांगायचे, का माघार घ्यायची? छे, छे. हा डाव मांडला तरी कशाला? अशा विचारांनी शिवरायांच्या मनात जणू गोंधळ घातला. तोपर्यंत फत्तेखान मोठी फौज घेऊन स्वराज्याच्या सरहद्दीपर्यंत आलाही होता.
विचार करायला वेळ तरी होता काय ? बस ठरले. शिवरायांनी निर्धार केला. काय होईल ते होवो. फत्तेखानाशी झुंजायचे. हे राज्य व्हावे ही श्रींचीच इच्छा असेल तर, फत्तेखानाची फौज पाला पाचोळ्यासारखी उडून जाईल. मग तर शहाजीराजे सुटतील आणि स्वराज्य जागच्या जागी राहील. ठरले तर. झुंजायचे. खानाशी दोन हात करायचे. शिवरायांचा निर्धार पक्का झाला.
फत्तेखान जीव घेऊन पळाला फत्तेखानाचे संकट स्वराज्यावर चालून आले. प्रचड सैन्य, दारूगोळा, घोडदल, अफाट शस्त्रास्त्रे घेऊन आलेल्या फत्तेखानाला खरे तर खूप अवघड वाटत होते. त्याला आपल्या ताकदीचा गर्व चढला होता.
फत्तेखानाची प्रचंड फौज पुरंदरच्या पायथ्याशी येऊन थडकली. शिवराय आणि त्यांच्या शे-पाचशे मावळ्यांनी पुरंदरावर लढाईची पक्की तयारी केली होती. फत्तेखान, मुसेखान असे कितीतरी मातब्बर सरदार प्रचंड फौज घेऊन पुरंदरचा गड चढू लागले. त्यांना गड चढण्याचा बिलकूल अनुभव नव्हता. कसेतरी चढत ते पार मेटाकुटीला आले होते.
फत्तेखानाची फौज माऱ्याच्या टप्प्यात येताच पुरंदरच्या तटावरून शिवरायांच्या मावळ्यांनी मोठ्या दगड-धोंड्यांचा त्यांच्यावर वर्षाव सुरू केला. कोणी गोफणी फिरवून खानाच्या शिपायांची डोकी फोडू लागले. वरून येणाऱ्या दगडांनी खानाच्या फौजेचा चेंदा-मेंदा होऊ लागला. तर धनुष्यातून आलेल्या बाणांनी फत्तेखानाच्या सैन्याची चाळण झाली. प्रेतांचा खच पडू लागला.
तेवढ्यात शिवरायांचे मावळे अचानक येऊन गड चढणाऱ्या खानाच्या फौजेवर तुटून पडले. रणकंदन सुरू झाले. खानाच्या सैन्याची शिरे धडावेगळी होऊ लागली. तो हंगामा पाहून फत्तेखानाची फौज लढण्याचे सोडून, वाट फुटेल तिकडे पळू लागली. मावळे पळणाऱ्यांना कापून काढीत होते. आपल्या फौजेची ती दुर्दशा पाहून फत्तेखानही स्वत:चा जीव वाचविण्यासाठी पळाला. शिवरायांच्या मूठभर मावळ्यांनी खानाच्या प्रचंड फौजेचा दणदणीत पराभव केला. खानाचे वाचलेले थोडे सैनिक आणि स्वतः फत्तेखान धुळीने माखलेले तोंड लपवीत मान खाली
घालून विजापूरकडे पळाला. ____मात्र शिवरायांचे खंदे वीर बाजी पासलकर या लढाईत धारातीर्थी पडले. ते पाहून शिवरायांना खूप दुःख झाले.
शिवरायांवर पाठविलेला फत्तेखान आपले पराभवाने काळे झालेले तोंड घेऊन, जेव्हा विजापूरच्या आदिलशाही दरबारात आला, तेव्हा आदिलशहासमोर मोठा प्रश्न उभा राहिला. शिवराय काही असे-तसे नाहीत, हे त्याला कळून चुकले. तसेच शिवराय दिल्लीच्या मोगलांना जाऊन मिळाले तर आपली आदिलशाही बुडणारच, ही भीती त्याला वाटू लागली. शेवटी त्याने शहाजीराजांना शिवरायांनी जिंकलेले किल्ले परत देण्याच्या अटीवर कैदखान्यातून मुक्त केले.
शिवरायांचा राज्यकारभार
शिवरायांना प्रजा आता, 'राजे' असे संबोधू - लागली. शिवरायांनी आपल्या गड-कोटाची व्यवस्था चांगली लावून दिली होती. त्यांचे लक्ष चौफेर होते. स्वराज्याची सर्व अंगे सारखीच मजबूत करण्याकडे त्यांनी लक्ष दिले. सैन्य, गड-किल्ले, शस्त्रे, शेती, देवस्थाने, न्याय, वसुली, हेरखाते अशा अनेक गोष्टीत, इतक्या लहान वयातही राजांनी बारीक लक्ष घातले होते. प्रजेला स्वराज्य आपल्या प्रिय घरासारखे वाटले पाहिजे, असे त्यांना वाटत होते. यासाठी अहोरात्र त्यांची धडपड चालली होती.
राज्य स्थापून लढाया करणे एवढेच राजांचे उद्दिष्ट नव्हते. शेती समृद्ध व्हावी म्हणून ते प्रयत्न करीत होते. काही ठिकाणी त्यांनी लहान-लहान धरणे बांधली, राजे शेतकऱ्यांना शेतीत वेगवेगळी पिके घेण्यासाठी प्रोत्साहन द्यायचे. त्यांना सरकारी जमिनी द्यायचे. सारावसुली, सरकारी मदत याची चांगली व्यवस्था राजांनी ठेवली होती. स्वराज्य आणि लोकांचे संसार अशा प्रयत्नातून समृद्ध होत होते.
कायदा न करताही स्वराज्यात गोहत्याबंदीझाली होती. कोणीही यावे आणि शेतकऱ्याला लुटावे अशी बेबंदशाही आता उरली नव्हती. शेती, गावकी, न्यायदान, सरकारी कामकाज, सज्जनांचा सत्कार अशा सर्व कार्यात राजे शिस्तीने राज्यकारभार करीत होते.
स्वराज्यात शिस्तीचा आणि नेकीचा कारभार सुरू होता. प्रजेला चोख न्याय मिळत होता. कोणावरही अन्याय झालेला शिवरायांना खपत नसे. अपराध्यांना कडक शिक्षा दिली जात होती. मारामाऱ्या, लुटालूट होत नव्हती. प्रजेला तर स्वराज्य म्हणजे रामराज्य वाटू लागले होते.
प्रजा निर्भयपणे जगत होती. शिवरायांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी कोणत्याही दिव्याला तोंड द्यायची तयारी केली होती. अनेक निष्ठावंत लढवय्ये सैनिक स्वराज्यासाठी कोणताही त्याग करायला सिद्ध होते.
शिवरायांना आता कोणाचीच भीती वाटत नव्हती .राजे आता स्वराज्याच्या हितासाठी
हालचाली करायला मोकळे होते. अनेक महत्त्वाची कामे त्यांच्यासमोर होती. आपल्या अनेक कार्यांना थोरा-मोठ्यांचा आशीर्वाद घ्यायला राजे चुकत नव्हते. सर्व कार्यात त्यांना प्रजेचा मनापासून पाठिंबा होता. प्रजेचे आशीर्वाद शिवरायांना खूप मोलाचे वाटत होते. शिवराय प्रजेचे होते. प्रजा शिवरायांची होती.
सागरात स्वराज्याचे आरमार
कोणत्याही बलाढ्य शत्रूशी सामना करायला शिवराय आता पुढे झाले होते. त्यांनी मोठी कामगिरी पार पाडायचे ठरविले. याचकाळात शिवरायांना पुत्ररत्नाचा लाभ झाला. बाळाचे नाव संभाजीराजे असे ठेवण्यात आले. प्रजेला खूप आनंद झाला. सर्वजण त्यांना प्रेमाने शंभूराजे असे म्हणू लागले.
'शिवरायांना राजगडावरून समोर कोंढाणा गड दिसत होता. वडिलांच्या सुटकेसाठी त्यांनी कोंढाणा गड आदिलशहाला दिला होता. कोंढाणा स्वराज्यात असलाच पाहिजे असे त्यांना वाटत होते. आणि राजांनी डाव मांडला.
मावळ्यांच्या रणगर्जना उठल्या. वीर तानाजी मालुसरे, शेलारमामा आदी मावळे सज्ज झाले. हर हर महादेव आणि जगदंबा भवानीच्या जय जयकारांनी आसमंत दणाणून गेला. स्वराज्याचे सैनिक कोंढाण्यावर चालून गेले. स्वराज्याचा त्रिशूल सुलतानशाहीत घुसला. कोंढाणा काबीज झाला; परंतु या रणकुंडात वीर तानाजी धारातीर्थी पडले. स्वराज्याचा मोलाचा मोहरा कामी आला. शिवरायांना आनंदाबरोबर खूप दुःखही झाले. 'गड आला, पण सिंह गेला,' असे ते उद्गारले. कोंढाण्याचे नाव तेव्हापासून सिंहगड झाले.
शिवरायांचे मर्द मावळे. आदिलशाही आणि मोगली मुलखात धुमाकूळ घालू लागले. सारे कोकण काबीज करण्याची राजांची इच्छा होती. त्यासाठी भक्कम आणि उत्तम आरमाराची गरज होती. राजे सागराची शक्ती ओळखून होते. सागर, सह्याद्री आणि मावळे यांच्या सामर्थ्यावर महाबलवंत स्वराज्य उभे करायचे होते.
राजांनी आपल्या निष्ठावंत सहकाऱ्यांना एकएक कामगिरी वाटून दिली. राजे स्वत:ही कोकणात उतरले. एक-एक गड स्वराज्यात दाखल होऊ लागला. सगळीकडून विजयाच्या बातम्या येऊ लागल्या. मावळ्यांच्या पराक्रमाने सागरालाही उधाण आले. राजांनी स्वराज्याचे पहिले लढावू आरमार उभे केले. स्वराज्याच्या लढावू नौका सागरावर तरंगू लागल्या. त्यावरील भगवे ध्वज राजांच्या पराक्रमाची साक्ष देत होते. दर्यासारंग स्वराज्याच्या आरमाराचे प्रमुख झाले. अनेक नवी ठाणी जिंकून स्वराज्यात सामील करण्यात आली. विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग ही स्वराज्याची ठाणी बळकट झाली.
राजांनी अनेक लढावू जहाजे बांधून घेतली. त्यावर निष्ठावंत सैनिकांची नेमणूक केली. सागरावर स्वराज्याच्या भगव्या ध्वजाची जरब बसली. त्याचवेळी प्रतापगड बांधून पूर्ण झाला होता. अशा प्रकारे राजे स्वराज्याचा विस्तार करीत होते. प्रत्येक ठिकाणी त्यांचे बारकाईने लक्ष होते. _ 'स्वराज्य हे माझे आहे.' अशी स्वराज्यातील लोकांची भावना व्हावी, यासाठी राजे रात्रंदिवस झटत होते. स्वराज्याची मजबूत पायाभरणी करून त्यावर कर्तृत्वाचा कळस चढविण्यासाठी शिवराय सज्ज झाले होते.
अफजलखानाचे महासंकट
आदीलशाही दरबारात खबरीवर खबरी येत होत्या. आज हा मुलख जिंकला उद्या तो गड जिंकला . नंतर त्यांनी कोकणावर ताबा मिळवला. असे करता करता शिवराय आपले राज्य पण जिंकतील , अशी भीती आदिलशहाला वाटु लागली.
शिवरायांना विरूद्ध लढण्यासाठी अफजलखानाने पैजेचा विडा उचलला. युद्ध करण्यासाठी प्रंचड प्रमाणात सैन्य, दारूगोळा, तोफा आणल्या होत्या. युद्धासाठी येताना अफजलखानाने वाटेत असलेली देवळे, घरदारे नष्ट केली . हे सर्व करताना त्याला अंहकार आला होता, म्हणुन तो शिवाजीला तर मी चुटकीसरशी पकडीन असे बोलु लागला होता. स्वराज्यावरील हे महासंकट पाहून अनेकांची धाबी दणाणली. आता शिवराय काही करू शकत नाही असे काहींना वाटु लागले . इकडे शिवराय अफजलखानाशी लढा कसा द्यावा यावर विचार करू लागले. त्यांनतर त्यांनी शक्ती, युक्ती यांचा वापर करून शत्रुला हरवायचे ठरवीले. आपण अफजलखानाला खूप घाबरलो आहोत व शरण येऊ इच्छीतो असे भासविले.
खानाला ते खरेच वाटले. खान शिवरायांना भेटण्यास प्रतापगडाच्या पायथ्याशी आला. प्रचंड सैन्य आणि मोठा लवाजमा बरोबर होताच. ___ एका शामियान्यात खान आणि शिवरायांची भेट झाली. धिप्पाड शरीराच्या खानाने कपटाने शिवरायांना बगलेत दाबून त्यांच्या कुशीत खंजीर खुपसण्याचा प्रयत्न केला. परंतु शिवराय सावध होते. त्यांना अशा संकटाची कल्पना होती. ते तयारीनिशी आले होते. _शिवरायांनी झटकन आपली मान खानाच्या बगलेतून सोडविली. लपवलेला बिचवा कचकन खानाच्या पोटात खुपसला. खानाची आतडी बाहेर आली. 'दगा... दगा...' खान ओरडला.
तेवढ्यात शिवरायांच्या एका जीवाला जीव देणाऱ्या मावळ्याने खानाचे शीर धडापासून वेगळे केले. खान मरण पावला आणि मग मावळ्यांनी गनिमीकाव्याने खानाच्या प्रचंड फौजेला कापून काढले. काही वाचलेले सैनिक जीव घेऊन पळाले. शिवरायांच्या हाती प्रचंड खजिना, हत्ती, घोडे, दारूगोळा लागला. शिवरायांनी स्वराज्यावरील महासंकट दूर केले.
सिद्दी जोहर चालून आला
खान मेला! शिवरायांनी खानाचा कोथळा काढला. आदिलशाही फौज कापून काढली. शिवरायांनी सारी दौलत लुटली, खजिना फस्त केला. अशा बातम्यांनी विजापूरचा आदिलशाही दरबार हादरला. शिवरायांच्या विजयाने सारा हिंदुस्थान आश्चर्यचकित झाला. एखाद्या प्रचंड पहाडाला भुईसपाट करावे तशी नवलाईची गोष्ट घडली होती.
या घटनेने आदिलशाहीवर तर जणू आकाशच कोसळले होते. येणाऱ्या बातम्यांनी आदिलशहाचे काळीज फाटत होते. शिवरायांनी पार कोल्हापूरपर्यंत मजल मारली आणि त्यांनी पन्हाळाही काबीज केला. या बातम्यांनी आदिलशाही दरबारात संतापाची लाट उसळली.
या शिवरायांना आवरावे कसे, असा आदिलशहाला प्रश्न पडला. राजांच्या पराक्रमाचा डंका जिकडे-तिकडे वाजत होता. नेताजी पालकर आणि मराठी फौजा बादशाही मुलखात धुमाकूळ घालीतच होत्या. अखेर आदिलशहाला उपाय सापडला. सिद्दी जोहर या काळ्याकभिन्न, धिप्पाड, पराक्रमी, बलाढ्य सरदाराला प्रचंड, सैन्य, तोफा, दारूगोळा देऊन शिवरायांचे पारिपत्य करण्यासाठी पन्हाळगडाकडे पाठविले.
आल्या आल्या सिद्दीने पन्हाळगडाला वेढा घातला. त्याची ताकद अफाट होती. राजे पन्हाळ्यावर सिद्दीच्या वेढ्यात अडकून पडले. कोणीच माघार घेत नव्हते. दोन महिने होऊन गेले
तरी सिद्धी वेढा आवळून उभा होता. गडावरचे अन्न-धान्य चारा-पाणी संपू लागले. शिवरायांपुढे मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले. काय करावे ? शरण जावे ? छे, शक्य नाही.
राजांनी विचारविनिमय केला. गनिमीकाव्याने निसटून जाण्याचे ठरविले. एके रात्री जीवाला जीव देणारे निवडक मावळे साथीला घेऊन राजांनी गड सोडला. राजे शत्रूच्या गुहेतून बाहेर पडले. पण तेवढ्यात सिद्दीला शिवराय निसटून गेल्याची बातमी समजली. त्याने ताबडतोब शिवरायांच्या पाठलागावर मोठे सैन्य रवाना केले.
राजांचे प्राण पुन्हा संकटात आले. मावळ्यांनी पावनखिंडीत सिद्दी जोहरच्या सैन्याची वाट अडवून धरली. जीवाच्या शर्थीने मावळे शत्रूशी लढत होते. जीवावर उदार होऊन धारातीर्थी पडत होते. काहीच्या अंगावरचे मांस शत्रूने केलेल्या घावांनी लोंबत होते. घावांनी कित्येकांचे देह रक्तबंबळ झाले होते. आपले धनी शिवाजीराजे विशाळगडावर सुखरूप पोहोचेपर्यंत लढायचे अशी त्यांची जिद्द होती. ते शत्रूला इंचभरही पुढे सरकू देत नव्हते.
तेवढ्यात विशाळगडावरून तोफा धडाडल्या. शिवराय सुखरूप पोहोचल्याची ती निशाणी होती. राजे सुखरूप पोहोचल्याचा उरलेल्या सर्वांना आनंद झाला. आता आपल्याला मरण आले तरी चालेल असे मावळ्यांना वाटत होते. थोड्याच वेळात बाजीसह अनेक मर्द मावळे झालेल्या मरणप्राय जखमांनी धरणीवर कोसळले. धारातीर्थी पावन झाले. शिवरायांच्या स्वराज्यात असे खंदे वीर होते म्हणूनच स्वराज्याचा वृक्ष बहरत होता. फोफावत
होता.
शाईस्तेखान पळाला मर्द मावळ्यांच्या बलिदानाने दुःखी झालेले राजे राजगडावर आले. जिवावरच्या अनेक संकटातून वाचून आलेल्या शिवरायांना पाहून माता जिजाऊंना खूप आनंद झाला. काही काळ विश्रांती घेऊन राजे पुन्हा कामाला लागले. पन्हाळ्याच्या वेढ्याच्या वेळी ज्यांनी शत्रूला मदत केली, त्यांचा राजांनी पुरता बीमोड केला. ज्यांनी आपला जीव धोक्यात घालून स्वराज्याला मदत केली, पराक्रम गाजविला अशांचा राजांनी मोठी बक्षिसे देऊन गौरव केला. ज्यांनी आपल्या जीवाचे स्वराज्यासाठी बलिदान केले, त्यांच्या बायकामुलांचे अश्रू पुसून त्यांच्या उदरनिर्वाहाची चोख व्यवस्था केली. जमिनी, इनाम दिले.
याचवेळी मोगल सरदार, औरंगजेबाचा मामा शाईस्तेखान पुण्याच्या लालमहालात मुक्काम ठोकून होता. स्वराज्याच्या मुलखात त्याचे सैन्य धुमाकूळ घालीत होते. प्रजेला सळो-की-पळो करून सोडीत होते. राजांचे लक्ष शाईस्तेखानाकडे गेले. त्याची फौज अफाट होती. शस्त्रे, दारूगोळा, तोफा, हत्ती, घोडे असा मोठा सरंजाम होता. ____ म्हणून शिवरायांनी एक युक्ती केली. निवडक मावळ्यांना घेऊन अंधाऱ्या रात्री राजे बेधडक लालमहालात प्रवेशले. राजांनी शाईस्तेखानाला बरोबर गाठले. राजांनी एकच वार केला. तेवढ्यात सगळीकडे हलकल्लोळ उडाला. ते पाहून राजे आले तसे बिनबोभाट निसटले. राजांना वाटले खान मेला; पण खानाचे नशीब जोरावर होते. खानाची फक्त हाताची बोटेच तुटली होती. प्राणावर आले पण बोटावर निभावले.
खान घाबरला. शिवराय आले केव्हा आणि गेले केव्हा, याचा त्याला आणि त्याच्या लाखभर फौजेला पत्ताही लागला नाही. खानाने शिवरायांची धास्ती घेतली. तीन दिवसात तो जीव घेऊन लालमहालातून पळाला.
स्वराज्याचा सूर्य आता तेजाने तळपत होता. आदिलशाही आणि दिल्लीच्या मोगल सरदारांची शिवरायांनी दाणादाण उडविली होती. औरंगजेब संतापाने थरथरत होता. अखेर त्याला उपाय सुचला. त्याने शौर्यशाली, पराक्रमी अशा मिा राजे.जयसिंह यांना अफाट, प्रचंड फौज, लवाजमा देऊन शिवरायांवर पाठविले. आणि स्वराज्यावर पुन्हा नवे संकट ओढवले.
मिर्जा राजे जयसिंहाची मोगल सेना स्वराज्यावर तुटून पडली. राजांचे मर्द मावळे तुफानी हल्ला चढवून पराक्रम गाजवीत होते; पण एवढ्या प्रचंड ताकदीच्या शत्रूपुढे त्यांचा निभाव लागत नव्हता. शेवटी दूरदृष्टीचा विचार करून राजांनी मिझा राजे जयसिंहाशी तह केला. अनेक किल्ले, गड आणि स्वराज्याचा काही मुलूख औरंगजेबाच्या घशात गेला. नको त्या अटी पाळणे भाग पडले.
औरंगजेबाच्या अटीप्रमाणे शिवराय आणि बालशंभूराजे औरंगजेबाला भेटण्यासाठी आगऱ्याला गेले. तेथे औरंगजेबाने महाराजांच्या अपमान तर केलाच. पण त्यांच्या निवास स्थानाबाहेर चौकी-पहारेही बसवले. औरंगजेब कपटाने आपला जीव घेणार हे राजांनी ओळखले. __राजांनी युक्ती केली. आजारी असल्याचे भासविले. गरिबांना मिठाई-अन्नदान करायला सुरुवात केली. पहाऱ्यात शिथिलता आली आणि महाराजांनी बाळशंभूराजांसह आपली कपटी अजगराच्या विळख्यातून सुटका करून घेतली. राजे पुन्हा महाराष्ट्रात सुखरूप परतले. स्वराज्याचा सिंह निसटला हे पाहाताच औरंगजेब भयंकर संतापला.
थोडीफार विश्रांती घेऊन राजे पुन्हा मनाने, शरीराने ताजेतवाने झाले. ते पुन्हा कामाला लागले. मोगलांनी तहात घेतलेले किल्ले आणि मुलूख लढून त्यांनी परत मिळविला. अनेक मोगली ठाण्यावर छापे घालून अमाप धन-दौलत मिळविली.
स्वराज्याचा रीता झालेला खजिना पुन्हा संपत्तीने काठोकाठ भरून टाकला.
गेलेला मुलूख परत मिळाला. गड-किल्ले पुन्हा स्वराज्यात आले. स्वराज्याचा मोठा विस्तार झाला. चारी दिशांच्या शत्रूला शिवरायांनी खडे चारले. शक्तीने आणि युक्तीने महाराजांनी शत्रूला पाणी पाजले. अत्याचारातून महाराष्ट्र मुक्त करून राजांनी स्वराज्याची स्थापना केली होती. अशा शिवप्रभूना, युगपुरूषाला राज्याभिषेक करून इतर राजसत्तांची 'राजा' म्हणून मान्यता मिळवायची, असे राजांच्या सहकाऱ्यांना वाटू लागले.
तयारीला सुरुवात झाली. रायगडाला राजधानीचा मान देण्यात आला. रत्नजडित सुवर्ण सिंहासन बनविण्यात आले. .
"क्षत्रिय कुलावंतस सिंहासनाधिश्वर श्री शिवछत्रपती महाराजांचा विजय असो.” ही ललकारी घुमली. महाराजांवर पुष्पवर्षाव झाला. गडावरच्या तोफा कडाडल्या. शिवराय छत्रपती झाल्याचा संदेश तोफांनी दशदिशांना पाठविला.
माता जिजाऊँना खूप आनंद झाला. असा अलौकिक पुत्र आपल्या पोटी जन्मला म्हणून त्या कृतार्थ झाल्या.
जाणत्या राजांचे स्वर्गारोहण
साडेतीनशे वर्षांच्या प्रदीर्घ अंधाऱ्या कालखंडानंतर, शिवरायांच्या रूपाने महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने राजपद प्राप्त झाले. जनता जनार्दनाने शिवरायांना 'जाणते राजे' हा मानाचा किताब बहाल केला.
स्वराज्यातील प्रजेला शिवरायांनी सुलतानाच्या, बादशहाच्या मगरमिठीतून मुक्त केले. कोणाबद्दलही दुजाभाव त्यांनी कधी दाखविला नाही. सर्वांना त्यांनी समानतेने वागविले. सर्व प्रजा त्यांच्या राज्यात सुख-समाधानाने राहात होती. .
राज्याभिषेकाचा आनंददायी सोहळा पार पडला. जिजामातांचे स्वप्न साकार झाले. हिंदवी स्वराज्याची स्थापना हे जिजामातांचे ध्येय, स्वप्न होते. ते स्वप्न महाराजांनी प्रत्यक्षात आणून मातेच्या डोळ्याचे पारणे फेडले. आपले जीवन सार्थकी लागले हे पाहून आपले कर्तव्य संपल्याची जाणीव जिजामातांना झाली. वय झालेले होते. थोड्याच दिवसात जिजामाता निजधामाला गेल्या. शिवरायांना आपल्यावर दु:खाचा डोंगर कोसळल्यासारखे झाले. जिजामाता फक्त राजांच्या आई नव्हत्या. कठीण समयी मोलाचा सल्ला देणाऱ्या, सतत स्फूर्ती देणाऱ्या, राजकीय जाणकार अशा सर्व काही होत्या. जिजामातांच्या कर्तव्याने त्या इतिहासात अमर झाल्या.
दुखाचा काही काळ लोटल्यानंतर महाराज पुन्हा आपल्या कर्तव्याकडे वळले. त्यांनी अनेक मोहीमा काढल्या. शत्रूने डोके वर काढले की, राजांनी त्याला तेथल्या तेथे ठेचावे, असे अनेकदा घडले. भल्या भल्या शत्रूला महाराजांनी पाणी पाजले. शत्रूवर जरब आणि दरारा बसविला. काही वर्षातच महाराजांनी मोठा मुलूख स्वराज्याला जोडला. शिवरायांचे वैभवी राज्य म्हणून 'स्वराज्य', सर्वत्र ओळखले जाऊ लागले. हे यश प्राप्त करण्यासाठी शिवरायांनी आपल्या रक्ताचे पाणी केले. ___ काळ पुढे सरकत होता. मोहिमावर मोहीमांनी लढायांनी शिवरायांनी शत्रूला नामोहरम केले होते. स्वराज्यातील प्रजेवर अन्याय होऊ नये, त्यांच्या तक्रारीचे निवारण तेथल्या तेथे व्हावे, राज्यकारभार शिस्तीने चालावा, या सर्वांसाठी महाराजांनी अष्टप्रधानमंडळ नेमले. त्यांच्याकडे वेगवेगळी खाती देऊन प्रजेला त्वरीत न्याय मिळवून देण्याची व्यवस्था केली. प्रजेच्या कल्याणासाठी आयुष्यभर झटणारे शिवप्रभू खरे तर लोकशाही राज्यव्यवस्थेचे आधुनिक प्रणेतेच म्हणायला हवेत. स्वराज्याची घडी व्यवस्थित बसली. सर्वांचे मनोरथ पूर्ण होत होते.
__परंतु अखंड परिश्रमाने, दगदगीने महाराजांची प्रकृती बिघडू लागली. आता आपले फार दिवस राहिले नाहीत. हे त्यांनी ओळखले. त्यांनी सर्वांना जवळ बोलावून घेतले. “आम्ही गेल्यावर सर्वांनी
एक दिलाने या स्वराज्याचे प्राणपणाने रक्षण करावे, हीच आमची शेवटची इच्छा आहे.” असे त्यांनी सर्वांना सांगितले.
एवढे बोलून शिवरायांनी डोळे मिटले ते कायमचेच; आणि शिवरायांनी स्वर्गारोहण केले. ते साल होते इ.स. १६८०. महाराष्ट्राचे तारणहार, कीर्तिवान, नीतिवान, प्रजाहितदक्ष जाणते राजे स्वर्गलोकी गेले. अशा शिवप्रभूच्या चिरंतन स्मृतीला आमचे लाख, लाख प्रणाम.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत